भेसळ दारूची चढ्या भावाने सर्रास विक्री

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 मे 2017

पालकमंत्री आणि अबकारी विभागाने जादा दराने दारूविक्री करणाऱ्या दुकानदारांना तंबी दिली होती. मात्र, ती कोणी फारशी मनावर घेतली नाही. एकतर कुठलाच दुकानदार बिल देत नाही. यामुळे तक्रार करणाऱ्याला दावाही ठोकता येत नाही

नागपूर - शहरात मोजकीच दुकाने आणि बिअरबार सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त दारूची विक्री होत असल्याच्या तक्रारी मद्यप्रेमींच्या आहेत. याशिवाय एमआरपीपेक्षा जास्त पैसे आकारून दुकानदार लूटमार करीत असल्याचाही त्यांचा आरोप आहे.

सर्वोच्च न्यायालयाने महामार्ग आणि राज्यमार्ग पाचशे मीटरच्या आता मद्यविक्रीवर बंदी घातली. त्यामुळे एकट्या नागपूर जिल्ह्यातील तब्बल चौदाशे मद्याच्या दुकाने बंद झालीत. यातून बचावलेल्या दुकानांमध्ये मद्यप्रमेंची प्रचंड वर्दळ असते. या गर्दीचा चांगलाच लाभ घेतला जात आहे. काही दुकानांमध्ये ब्रॅण्डेड कंपन्याच्या बाटलीत भेसळ करून दारू विकल्या जात आहे. तीसुद्धा चढ्या भावाने. दुकानदार सर्रासपणे एक बाटलीवर 15 ते 20 रुपये जादा आकारत आहेत. यावर एखाद्याने आक्षेप घेतल्यास घ्यायचे असेल तर घ्या नाही तर परत करा, अशा धमक्‍या दिल्या जातात. भेसळयुक्त दारूबाबत बोलण्याची सोयच नाही. कंपनीने पाठविलेली दारू आम्ही विकतो. त्यात भेसळ करायला आम्हाला वेळ नाही. जी आहे ती मुकाट्याने घ्या नाहीतर चालते व्हा, असेही ग्राहकांना सुनावले जाते.

पालकमंत्री आणि अबकारी विभागाने जादा दराने दारूविक्री करणाऱ्या दुकानदारांना तंबी दिली होती. मात्र, ती कोणी फारशी मनावर घेतली नाही. एकतर कुठलाच दुकानदार बिल देत नाही. यामुळे तक्रार करणाऱ्याला दावाही ठोकता येत नाही. बिला मागितल्यास ते दिलेही जात नाही. दारुबंदीच्या काळात अबकारी विभाग एकदम सक्रीय झाला होता. नियमात बसत नसलेल्या दुकाने तत्काळ बंद करायला लावले. मात्र, भेसळ आणि चढ्या दराने विक्री होत असताना कोणीच अधिकारी कारवाई करीत नसल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. एकूण दारू दुकानदारांवर कोणाचा अंकुश नाही असे चित्र आहे.

Web Title: adulteration in nagpur