बीएसस्सी नर्सिंगची शैक्षणिक पदांची जाहिरात रद्द

file photo
file photo

नागपूर : बीएसस्सी नर्सिंग कॉलेजमध्ये प्राचार्य, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापकाच्या पदभरतीची मार्च 2019 मध्ये जाहिरात प्रकाशित करण्यात आली. परंतु, ही जाहिरात रद्द करण्यासंदर्भातील आदेश नुकतेच वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाने काढले. यामुळे 13 वर्षांपासून राज्यातील चार बीएसस्सी नर्सिंग महाविद्यालयांमध्ये कार्यरत ट्यूटरच्या तोंडाला पुन्हा पाने पुसण्याचा प्रकार झाला असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली. सुश्रुषा वैद्यकीय उपचाराचा अविभाज्य अंग आहे. हे मनुष्यबळ तंत्रशुद्ध असावे म्हणून राज्य सरकारने 2006 मध्ये मेडिकलमधील जनरल नर्सिंग अभ्यासक्रम (जीएनएम) रद्द करून बीएसस्सी नर्सिंग अभ्यासक्रम सुरू केला. अभ्यासक्रमाचा दर्जा वाढवताना येथे कार्यरत पाठ्यनिर्देशक अर्थात ट्यूटरचा दर्जा वाढवून प्राचार्य, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापकांची पदे निर्माण करणे गरजेचे होते. परंतु, सरकारने 13 वर्षे बीएसस्सी नर्सिंगच्या पदांच्या आस्थापनेचा पाळणा हलवत ठेवला. एकप्रकारे पदभरती थंडबस्त्यात ठेवण्याचे कारस्थान राबवण्यात आले. वर्षानुवर्षे सेवा देणाऱ्या ट्युटर्सचे दुखणे "सकाळ'ने प्रकाशित केले. त्याचा पाठपुरावा केला. यामुळे 12 मार्च 2019 शैक्षणिक पदे निर्माण करून पदभरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली. यामुळे वर्षानुवर्षे शैक्षणिक पात्रता असलेल्या "ट्यूटर्स'ना मानाचे प्राध्यापक पद मिळेल, असा विश्‍वास निर्माण झाला. परंतु, पुन्हा एकदा या प्रकरणात वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाने जाहिरात रद्द करून मिठाचा खडा टाकण्याचे काम केले. न्यायालयाचा हवाला देत ही जाहिरात रद्द करण्यात आली. मात्र, यापूर्वी न्यायालयात वारंवार वैद्यकीय शिक्षण विभागाने पदे भरण्यासाठी दिलेले शपथपत्र खोटे ठरले. दरवर्षी आरोग्य विद्यापीठ पदभरतीअभावी राज्यातील औरंगाबाद, मुंबई, पुणे आणि नागपूर या चारही बीएसस्सी नर्सिंग महाविद्यालयांची मान्यता रद्द करण्याचे इंजेक्‍शन देते, मात्र पुन्हा खोटे शपथपत्र दिल्यानंतर प्रवेश स्वीकारण्यास मान्यता देते. 200 विद्यार्थ्यांचे प्रवेश धोक्‍यात येतात. परंतु, याचे शासनाला काहीही देणेघेणे नसल्याचे सांगण्यात आले.
कुणी घ्या प्राचार्य, कुणी प्राध्यापक
बीएसस्सी नर्सिंग महाविद्यालयात "ट्यूटर' असलेल्या शिक्षकांना सेवाज्येष्ठतेनुसार सरस्वतीपूजनाला गूळ फुटाणे वाटतात, तसे पदांचे तोंडी वाटप करण्याचा प्रकार राज्यातील चारही बीएसस्सी नर्सिंग कॉलेजमध्ये 13 वर्षांनंतरही सुरूच आहे. कुणी प्राचार्य तर कुणी उपप्राचार्य तर कुणी सहयोगी प्राध्यापक असे अस्थायी पद घेऊन इमानेइतबारे काम करीत आहेत. यातील डझनभरापेक्षा जास्त ट्यूटर पद मिळेल याच प्रतीक्षेत निवृत्त झाले. परंतु, आस्थापनेवर आणण्याचा वैद्यकीय शिक्षण विभागाचा खेळ थांबलेला नाही. यंदा प्रवेश प्रक्रियेच्या वेळी 200 विद्यार्थ्यांना फटका बसण्याची भीती आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com