वकिलावर कुऱ्हाडीने घातले सपासप घाव

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 डिसेंबर 2018

नागपूर : ज्युनियर वकिलाने कुऱ्हाडीचे घाव घालून वयोवृद्ध वकिलावर प्राणघातक हल्ला केला. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, प्रकृती गंभीर आहे. प्राणघातक हल्ल्यानंतर मारेकऱ्यानेही विष प्राशन करून आत्महत्या केली. शुक्रवारी सायंकाळी जिल्हा व सत्र न्यायालयासमोरच्या करोडपती गल्लीत ही थरारक घटना घडली. या रक्तरंजित घटनाक्रमाने न्यायभवन परिसर आज पुन्हा एकदा हादरले.

नागपूर : ज्युनियर वकिलाने कुऱ्हाडीचे घाव घालून वयोवृद्ध वकिलावर प्राणघातक हल्ला केला. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, प्रकृती गंभीर आहे. प्राणघातक हल्ल्यानंतर मारेकऱ्यानेही विष प्राशन करून आत्महत्या केली. शुक्रवारी सायंकाळी जिल्हा व सत्र न्यायालयासमोरच्या करोडपती गल्लीत ही थरारक घटना घडली. या रक्तरंजित घटनाक्रमाने न्यायभवन परिसर आज पुन्हा एकदा हादरले.
सदानंद नारनवरे (62, रा. न्यू सुभेदार ले-आउट) असे मृत्यूशी झुंजत असलेल्या वकिलाचे, तर ऍड. लोकेश भास्कर (34, रा. वडेगाव, तिरोडा, गोंदिया) असे मृत मारेकऱ्याचे नाव आहे. न्यायालयीन कामकाज आटोपल्यानंतर सायंकाळच्या वेळी वयोवृद्ध वकील राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयाच्या गेटसमोर एकत्र येऊन चर्चा करतात. नारनवरेसुद्धा नियमित या ठिकाणी यायचे. शुक्रवारी सायंकाळी नारनवरे आपल्या सात ते आठ वकील मित्रांसोबत बोलत बसले होते. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, सायंकाळी 4.45 वाजताच्या सुमारास मारेकरी भास्कर हा आपल्या दोन ते तीन मित्रांसोबत तिथे आला. प्रारंभी त्याने नारनवरे यांच्यासोबत बाचाबाची केली. भास्करने अचानक लांबलचक दांडा असलेली कुऱ्हाड काढून त्यांच्यावर घाव घालायला सुरुवात केली. भास्करचे मित्र घाबरून पळून गेले. मान, डोके, चेहऱ्यावर कुऱ्हाडीचे घाव बसल्याने नारनवरे रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. त्याच वेळी भास्करने सोबत आणलेले विषारी द्रव्य प्राशन केले.
घटनेनंतर परिसरात थरार निर्माण होऊन आरडाओरड सुरू झाली. घरी परतणाऱ्या वकील मंडळींसह न्यायालयात तैनात पोलिसांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. जखमी आणि मारेकरी दोघांनाही मेयो रुग्णालयात हलविण्यात आले. भास्करचा मृत्यू झाला. नारनवरे मृत्यूशी झुंज देत आहेत.
संशयाने केला घात
घटनेनंतर गोळा झालेल्या वकिलांच्या गोटात सुरू असलेल्या चर्चेनुसार, भास्कर संशयी वृत्तीचा होता. नारनवरे यांचे नेहमीच त्याच्या घरी जाणे-येणे होते. यामुळे नारनवरे यांचे पत्नीसोबत संबंध असावेत, अशी शंका भास्करला होती. वार करण्यापूर्वी भास्करने याच विषयावरून नारनवरे यांना जाब विचारल्याचा प्रत्यक्षदर्शींचा दावा आहे.
भास्करची विक्षिप्त वागणूक
ऍड. नारनवरे हे विधी महाविद्यालयात पदव्युत्तर पदवी विभागात प्राध्यापक होते. निवृत्तीनंतर ते वकिलीकडे वळले. प्रारंभी एका वकिलाकडे काही महिने कामाचा अनुभव घेतल्यानंतर अलीकडेच त्यांनी स्वतंत्र प्रॅक्‍टिस सुरू केली होती. भास्कर यानेसुद्धा अलीकडेच ज्युनियर म्हणून वकिली सुरू केली होती. दोघांचेही नेहमीच एकमेकांकडे जाणे-येणे होते. भास्करची वागणूक विक्षिप्तासारखी असल्याचे वकील मंडळींकडून सांगण्यात आले.
...तर भास्कर वाचला असता
प्रत्यक्षर्शींच्या दाव्यानुसार, भास्करने विष प्राशन केल्याची पोलिसांनाही कल्पना होती. त्यानंतरही त्याला प्रारंभी न्यायालयाच्या आवारातील पोलिस चौकीत नेण्यात आले. त्यानंतर मेयो रुग्णालयाकडे पाठविण्यात आले. तातडीने उपचार मिळाले असते तर त्याचा मृत्यू टाळता आला असता.
सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर
ऍड. खंडाळकर यांचे संशयास्पद मृत्यू प्रकरण, अक्कू यादव, पिंटू शिर्के यांच्या हत्येनंतर वकिलांच्या सुरक्षेचा विषय ऐरणीवर आला होता. आजच्या घटनेनंतर ऍड. विलास राऊत यांच्यासह अन्य सहकारी वकिलांनीही वकिलांच्या सुरक्षेचा विषय उपस्थित केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: advocate attack news