दोन महिन्यांच्या विरहानंतर अमरावतीत पुन्हा सुरू झाला लव्ह बर्डसचा चिवचिवाट

सकाळ वृत्तसेवा | Tuesday, 2 June 2020

भरीसभर म्हणून तोंडाला मास्क लावून ओळख लपविण्याची सोयही कोरोनाने करून दिली आहे. या बळावर प्रेमीयुगुलांचा मुक्तसंचार आता शहरातील गल्लीबोळांतून दिसू लागला आहे.

अमरावती : लॉकडाऊनमुळे इतर जनजीवन तर ठप्प होतेच, त्याचबरोबर प्रेमीयुगुलांच्या चोरीछिपे भेटीही बंद होत्या. कारण उद्याने बंद होती, मंदीरे बंद होती. आणि घराबाहेर पडण्याचे बहाणेही नव्हते. त्यामुळे दोन महिन्यांच्या दीर्घ विरहानंतर प्रेमीजन एकमेकांना भेटत आहेत. विरहाने प्रेम वाढते म्हणतात, त्यामुळे या भेटींमध्ये एकमेकांवर प्रेम तर बरसतेच आहे, त्याचबरोबर रुसवेफुगवेही आहेत, तक्रारीही आहेत. त्या दूर करण्यासाठी प्रेमीयुगुलांची लगबग वाढू लागली आहे. भरीसभर म्हणून तोंडाला मास्क लावून ओळख लपविण्याची सोयही कोरोनाने करून दिली आहे. या बळावर प्रेमीयुगुलांचा मुक्तसंचार आता शहरातील गल्लीबोळांतून दिसू लागला आहे. लॉकडाउनचे नियम शिथिल होताच प्रेमीयुगुलसुद्धा आपापल्या घरट्यांतून बाहेर निघण्यास सुरुवात झाली. मात्र सर्वच शहर खुले झाल्यामुळे एकांतवास शोधता शोधता या लव्हबर्डसची पार दमछाक होत आहे.
कोरोना आणि त्यानंतरचा लॉकडाउन सर्वांसाठी गेमचेंजर ठरला. कधी नव्हे एवढा काळ नागरिकांना आपल्या घरातच डांबून राहावे लागले. संपूर्ण व्यवहार ठप्प झाले असतानाच प्रेमी युगुलांची मात्र चांगलीच पंचाईत झाली. संचारबंदीमुळे बागबगिचे तर सोडाच साधे गल्लीत सुद्धा भेटण्याची सोय उरली नाही. लॉकडाउनच्या फेऱ्यात अडकून गेल्या दोन महिन्यांपासून एकमेकांपासून दूर राहिलेल्या प्रेमियुगुलांना आता हा विरह सहन करणे कठीण झाले होते. त्यामुळे लॉकडाउनच्या शिथीलतेची त्यांना प्रतीक्षा होती. प्रतीक्षेचा काळ आता संपल्याने त्यांच्या चेह-यावर वेगळीच रौनक आली आहे. चित्रपटगृहे व अन्य भेटण्याची ठिकाणे बंद असली तरी लव्हबर्डना अनेक पर्याय आहेत. अनेकांनी शहरातील दुर्लक्षित परिसर, विरळ वस्तीमधील गल्ल्यांमध्ये आपल्या प्रेमाचा इजहार सुरू केला आहे. बगीचे अद्याप सुरू झाले नसले तरी प्रेमी युगुलांच्या घिरट्या मात्र सुरू झाल्या आहेत. अनेकांनी लॉकडाऊन शिथिलतेच्या पहिल्याच दिवशी आंब्याचा रस, शीतपेयांच्या पार्सलचा आधार घेतला.

सविस्तर वाचा - सावधान! स्वच्छतागृह ठरत आहेत धोकादायक
रेडरोझने केले प्रपोझ
शहरात लॉकडाऊन उठविण्यात आल्यानंतर नागरिकांची एकच गर्दी होत आहे. सकाळपासूनच जो तो रस्त्यांवर, गल्लीबोळांमध्ये येत असल्याने प्रेमी युगुलांची मात्र चांगलीच पंचाईत होत आहे. भेटवस्तुंची दुकाने अद्याप उघडलेली नसल्याने काहींनी रेडरोझ देऊन आपल्या साथीदाराला इंप्रेस केले.