25 वर्षांनंतर ब्रह्मपुरीत कॉंग्रेसची सत्ता 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

नागपूर - विदर्भातील एका नगरपंचायतीसह दोन नगरपालिकांच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत कॉंग्रेस, भाजप आणि शिवसेनेचे उमेदवार निवडून आले. ब्रह्मपुरी येथे तब्बल 25 वर्षांनंतर भाजपला धूळ चारत कॉंग्रेसचे नगराध्यक्ष विजयी झाले. तर, नेर पालिकेत शिवसेना व मौदा नगरपंचायतीत भाजपचे नगराध्यक्ष निवडून आले आहेत. 

नागपूर - विदर्भातील एका नगरपंचायतीसह दोन नगरपालिकांच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत कॉंग्रेस, भाजप आणि शिवसेनेचे उमेदवार निवडून आले. ब्रह्मपुरी येथे तब्बल 25 वर्षांनंतर भाजपला धूळ चारत कॉंग्रेसचे नगराध्यक्ष विजयी झाले. तर, नेर पालिकेत शिवसेना व मौदा नगरपंचायतीत भाजपचे नगराध्यक्ष निवडून आले आहेत. 

चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी नगर परिषद भाजपचा गड समजला जातो. 25 वर्षांपासून येथे भाजपची एकहाती सत्ता आहे. मात्र, या निवडणुकीत नगराध्यक्षपदासह 20 पैकी 11 जागा कॉंग्रेसला मिळाल्या आहेत. आमदार विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात कॉंग्रेसने एकहाती सत्ता मिळविली. नगराध्यक्षपदी कॉंग्रेसच्या रिता उराडे विजयी झाल्या आहेत. भाजपचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला. विद्यमान पालिकेत कॉंग्रेसचा एकच नगरसेवक होता. अशोक भय्या नऊवरून पाचवर आले. भाजपच्या सदस्यांची संख्या दहावरून तीनवर आली आहे. 

यवतमाळ जिल्ह्यातील नेर नगर परिषदेत शिवसेनेच्या सुनीता पवन जयस्वाल यांनी नगराध्यक्षपदासाठी कॉंग्रेसच्या डॉ. शबीना मिर्झा यांना मात देत तीन हजार मताधिक्‍याने विजय संपादन केला. शिवसेनेचे नऊ, कॉंग्रेसचे चार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तीन, तर अपक्ष दोन उमेदवार विजयी झाले आहेत. गेल्या साडेसात वर्षांपासून नेर नबाबपूर नगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. नागपूर जिल्ह्यातील मौदा नगरपंचायतीवर भाजपने निर्विवाद यश मिळविले आहे. नगराध्यक्षपदी भाजपच्या भारती सोमनाथे निवडून आल्या आहेत. येथे भाजपला सर्वाधिक 8 जागा मिळाल्या. भारती सोमनाथे यांनी कॉंग्रेसच्या रोशनी राजेश निनावे यांचा 128 मतांनी पराभव केला. नगरसेवकाच्या 17 पैकी आठ जागांवर भाजप, कॉंग्रेस पाच, शिवसेना दोन व अपक्ष दोन जागांवर विजयी झाले आहेत. सोमनाथे यांना 2 हजार 573 मते मिळाली; तर कॉंग्रेसच्या रोशनी निनावे यांना 2 हजार 445 मते मिळाली. मौदा नगरपंचायतची निवडणूक नागपूरचे पालकमंत्री व राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासाठी प्रतिष्ठेची होती. 

Web Title: after 25 years Congress the power in brahmapuri