भारिप-बमसंच्या आंदोलनाचा पुढील टप्पा ‘घंटानाद’

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 मार्च 2018

शिष्यवृत्ती, शेतकऱ्यांच्या मागणीसाठी आंदोलनाचा पुढील टप्पा म्हणून राज्यातील सर्व तहसील कार्यालयापुढे ता. 3 एप्रिल 2018 रोजी दुपारी 12 ते 3 यावेळेत घंटानाद करण्यात येणार आहे. 

अकोला - कोरेगावा भीमा दंगलप्रकरणात संभाजी भिडे यांना अटक करण्याच्या मागणीसाठी भारिप बहुजन महासंघाच्या वतीने मुंबईत महामोर्चा काढला होता. आता या व शिष्यवृत्ती, शेतकऱ्यांच्या मागणीसाठी आंदोलनाचा पुढील टप्पा म्हणून राज्यातील सर्व तहसील कार्यालयापुढे ता. 3 एप्रिल 2018 ला दुपारी 12 ते 3 यावेळेत घंटानाद करण्यात येणार आहे. 

भारिप-बमंसच्या मुंबईतील आंदोलनानंतरही भिडे यांना अटक करण्यात आली नाही. मुख्यमंत्र्यांनी अॅड. प्रकाश आंबेडकर यांना चर्चेसाठी बोलाविले. त्यातून कोणताही तोडगा निघाला नसल्याचे दिसून येते. उलटपक्षी मुख्यमंत्र्यांनी भिडे यांच्याविरुद्ध कोणताही पुरावा नसल्याचे विधिमंडळात सांगून त्यांना क्लिनचिट दिली. परिणामी भारिप-बमसंने आंदोलन आणखी तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. संपूर्ण राज्यभर या आंदोलनाच्या पुढच्या टप्प्यात सरकारला झोपेतून जागे करण्यासाठी 3 एप्रिलला सर्व तहसील कार्यालयांपुढे घंटानाद करण्यात येणार असल्याची माहिती भारिप-बमसंच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीतर्फे देण्यात आली. 

प्रमुख मागण्या -

१) भीमा कोरेगाव हल्ल्याचे मुख्य सूत्रधार संभाजी भिडे यांना त्वरित अटक करावी. 

२) भीमा कोरेगाव हल्ला प्रकरणातील बहुजन बांधवांवरील सर्व गुन्हे मागे घ्यावेत. 

३) आेबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी विद्यार्थ्यांना 100 टक्के शिष्यवृत्ती द्यावी.

४) एससी-एसटी विद्यार्थ्यांची थकित शिष्यृत्ती तत्काळ अदा करावी. 

५) टीआयएसएस विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात. 

६ ) शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करा. 

Web Title: Agitation for scholarship and farmers right in akola