चिलगव्हाण येथील आंदोलनाला वाढता पाठिंबा

चिलगव्हाण येथील आंदोलनाला वाढता पाठिंबा

यवतमाळ - महागाव तालुक्‍यातील चिलगव्हाण येथील शेतकरी कुटुंबातील सामूहिक आत्महत्येच्या घटनेला रविवारी (ता.१९) ३१ वर्षे पूर्ण होत आहेत. समाजमन सुन्न करणाऱ्या या घटनेचे स्मरण करीत शासकीय धोरणाचा निषेध म्हणून या दिवशी अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाला समाजातील सर्वच स्तरातून पाठिंबा वाढत आहे. 

नापिकीला कंटाळून चिलगव्हाण येथील शेतकरी साहेबराव पाटील करपे यांनी १९ मार्च १९८६ ला पत्नी व मुलाबाळांसह आत्महत्या केली होती. सत्ताधाऱ्यांकडून शेतकऱ्यांना केवळ आश्‍वासनच मिळत आहेत.

धोरणात्मक निर्णय घेतले जात नसल्याने शेतकरी मरणाला कवटाळने पसंत करीत असल्याचे वास्तव आहे. शासनाचा निषेध नोंदवीत रविवारी (ता.१९) अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार आहे. ग्रामीणच नव्हे, तर शहरी भागांतूनही या आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे. महागाव तालुक्‍यात शहीद भगतसिंग मंडळ, सेना, वकील संघ, सर्वपक्षीय पुढारी सहभागी होणार आहेत. पेरणीबंद आंदोलनाची हाक देणाऱ्या नेर तालुक्‍यातील सातेफळ गावात रांगोळ्या काढण्यात येणार असून, त्यात निषेध म्हणून काळ्या रंगाचा ठिपका राहणार आहे.  शेतकरी युवा संघर्ष सेवा समिती, अखिल भारतीय माळी महासंघ, मराठा सेवा संघ आदी संघटनांचे पदाधिकारी अन्नत्याग आंदोलन करणार आहेत.

कर्जमाफी हा शेतकऱ्यांच्या आत्महत्येसाठी दीर्घकालीन उपाय आहे असे मला वाटत नाही. एखाद्याला दु:ख झाले किंवा जखम झाली की त्यावर फुंकर मारल्यासारखा हा पर्याय आहे
- प्रतीक्षा लोणकर, अभिनेत्री

हवा तुमचाही सहभाग!
आजवर तुम्ही या ना त्या देवासाठी उपवास केला असेल; पण अन्नदात्यांच्या वेदनांमध्ये सहभागी होण्यासाठी आणि सरकारपर्यंत शेतकऱ्यांची हाक पोचवण्यासाठी ‘सकाळ’ने या अन्नत्याग आंदोलनास पाठिंबा दर्शवला आहे. तुम्हीही त्यात सहभागी होणार असाल तर तुमचे नाव, वय, राहण्याचे ठिकाण तसेच व्यवसायाची माहिती आम्हाला ८८८८८०९३०६ या व्हॉट्‌सॲप क्रमांकावर पाठवा. एक संवेदनशील व्यक्ती म्हणून तुम्हीही त्यात नक्कीच सहभागी व्हाल, ही अपेक्षा!

अत्यंत कटू अशी ही आठवण आहे. दुर्दैवाने ३१ वर्षांपूर्वी एका कुटुंबावर अशी वेळ आली होती. त्यांनी स्वत:चे आयुष्यच संपवून टाकले. या घटनेला १९ मार्चला ३१ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे शेतकरी आणि गावातील लोक अन्नत्याग आंदोलन करत आहेत. त्याला माझा पाठिंबा आहे. कितीही प्रतिकूल परिस्थिती असली, तरी आत्महत्या हे त्यावरचे उत्तर असू शकत नाही. त्यावर मात करणे महत्त्वाचे आहे. व्यवस्थेत खूप त्रुटी आहेत. ही व्यवस्था आपणच सगळ्यांनी मिळून बनवलेली आहे. त्यामुळे आपणच ती सुधारण्यासाठी प्रयत्न करू या.
-उपेंद्र लिमये, अभिनेता

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com