आंदोलनकर्ता करणार उपोषण मंडपातच लग्न

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 जुलै 2019

अमरावती : लग्न कुणी कुठे करावे हा ज्याचा त्याचा प्रश्‍न असतो. जगात अनेकजण सर्वोच्चशिखरावर, कुणी विमानात, तर कुणी महासागराच्या तळात जावून लग्नाच्या रेशीमगाठी बांधतात. मात्र, अमरावतीत यापेक्षाही एक अनोखा विवाह सोहळा रंगणार आहे. चक्क उपोषणाच्या मंडपातच एक वीज कर्मचारी विवाहबंधनात अडकणार असून उपोषणकर्ते अन्य वीज कर्मचारी वऱ्हाडी राहणार आहेत. विशेष म्हणजे आज, गुरुवारी उपोषणकर्त्या वरमुलाला मंडपातच हळद लावली असून उद्या, शुक्रवारी याच ठिकाणी त्याचे शुभमंगल होणार आहे.

वीज प्रशासनाकडून करण्यात आलेल्या बदल्यांबाबत कर्मचाऱ्यांवर अन्याय झाल्याचा आरोप करीत महाराष्ट्र स्टेट इलेक्‍ट्रीसिटी वर्कर्स फेडरेशनच्या नेतृत्वात वीज कर्मचाऱ्यांचे 9 जुलैपासून विद्युत भवनसमोर उपोषण सुरू आहे. मागण्या मान्य न झाल्याने अद्यापही उपोषण सुरुच आहे. या उपोषणकर्त्यांमध्ये निखील अरुण तिखे हे वीज कर्मचारीसुद्धा आहेत. त्यांचा विवाह उद्या, शुक्रवारी होणार आहे. मात्र, उपोषण लांबल्यामुळे त्यांना घरी जाता येणार नसल्याने उपोषण मंडपातच हळद आणि लग्न असा संपूर्ण सोपस्कार पार पाडण्याचा निर्णय तिखे यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांनी घेतला आहे. त्यांच्या भावी वधू पूजा शेषराव लंगडे यांच्या कुटुंबीयांनीसुद्धा या अनोख्या विवाहाला संमती दर्शविली. निखील तिखे यांच्यासह प्रशांत दंडाळे, मनोहर उइके, राजीव येडतकर, दीपाली ठाकरे, नरेंद्र वंजारी हे सुद्धा उपोषणाला बसले आहेत. आज, गुरुवारी सकाळी 10.30 वाजता हळदीचा कार्यक्रम मंडपातच पार पडला. तसेच उद्या, शुक्रवारी सकाळी 11.02 वाजता तिथीनुसार हा लग्नसोहळा थाटात साजरा करण्याचा चंग वर्कर्स फेडरेशन तसेच तिखे व त्यांच्या नातेवाइकांनी बांधला आहे. या लग्न सोहळ्यासाठी उपोषणकर्त्या कर्मचाऱ्यांनी खास निमंत्रणपत्रिका तयार केली असून त्यामध्ये मुख्य अभियंता व उपमहाव्यवस्थापक (मानव संसाधन) झोन कार्यालय यांच्या आशीर्वादाने हा विवाह सोहळा साजरा होणार असल्याचे नमूद केले आहे.
आमदार, खासदार साऱ्यांनाच आमंत्रण
या अनोख्या विवाह सोहळ्याकरिता जिल्ह्यातील मंत्री, खासदार, आमदार, जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त तसेच अन्य सनदी अधिकाऱ्यांनासुद्धा पत्रिकेद्वारे निमंत्रण दिले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The agitator got married in the fast-moving pamper