चला कृषी पर्यटनाला! चार तरुणांचा महत्त्वाकांक्षी उपक्रम

krushi
krushi

राजुरा (चंद्रपूर) : बालपणीचे खेळ, निसर्गाशी मैत्री, नात्यातील गोडवा आणि धमाल मस्ती मजा करायची असेल, तर निश्‍चितच राजुरा तालुक्‍यातील चनाखा येथे उभारलेल्या कृषी पर्यटन केंद्राला भेट द्यावी. रोजच्या धकाधकीच्या जीवनात निवांत मोकळा श्वास घेण्यासाठी व निसर्गाशी दोस्ती करण्यासाठी चार मित्रांच्या भन्नाट संकल्पनेतून हे पर्यटन केंद्र तयार झाले आहे.

बंजर जमिनीवर तयार झालेले हे कृषी पर्यटन केंद्र पर्यटनासोबत शेतकऱ्यांनाही आर्थिक सुबत्ता देणारे आहे. सुशिक्षित तरुणाने अथक परिश्रमातून तयार केलेल्या या केंद्राला राष्ट्रीयस्तरावरही पुरस्कृत करण्यात आले आहे. टाळेबंदीमुळे सध्या ते पर्यटकांसाठी बंद आहे.

परिसरातील सुहास आसेकर हा उच्च शिक्षीत आणि पुण्यात स्थायिक झालेला युवक. येथील त्याचे मित्र रिंकू मरस्कोल्हे, रुपेश शिवणकर व नितीन मुसळे पुण्यात जाऊन सह्याद्रीच्या रांगात भटकंती करायचे. मात्र, दरवर्षी हाच क्रम झालेल्या या चार युवकांनी उत्तम नफा कमवायचे ठरविले. आसपासच्या लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी व विदर्भातील इतर शेतकऱ्यांनी प्रभावित होऊन आपली उन्नती साधावी या हेतूने कृषी व ग्रामीण पर्यटन व्यवसाय त्यांना खुणावू लागला. या चार युवकांनी ही कल्पना प्रत्यक्षात उतरविण्याचा ध्यास मनाशी बाळगून हे केंद्र सुरू केले. तालुक्‍यापासून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या चनाखा या गावात 15 एकर जागेवर कृषी व ग्रामीण पर्यटन केंद्र उभे राहिले.

हिरवीगार शेतशिवारे, वाऱ्यावर डोलणारी पिके, पाटातून वाहणारे पाणी, विविध पक्षी असे विहंगम दृष्य शांत वातावरणात शेतातील मारोशीवर बसून पाहणे आज धावपळीच्या व धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला आवडेल. कृषी पर्यटन ही संकल्पना तशी नवीनच. मात्र आपल्या दैनंदिनीत बुडालेल्या शहरी माणसाला असलेली गावाकडची ओढ आणि चुलीवरच्या जेवणाची इच्छा, यामुळे ही संकल्पना मुळ धरते आहे. जोडीला हुरडा आणि शेतातील ताज्या वांग्याच्या भरताची चव पर्यटकांना आकर्षित करते.

राजुरा हा तसा कापूस आणि सोयाबीन उत्पादक तालुका म्हणून ओळखला जातो. चनाखा येथील अनेक वर्षांपासून पडीत असलेल्या वडीलोपार्जित शेतीची मशागत सुरू केली. त्यात विविध प्रकारच्या झाडांची लागवड करून पारंपरिक पिकांना फाटा देत अद्रक, हळद, हलापिनो मिरची, गर्कीन, बिट, नवरगोल, स्विटकॉन अशी विविध पिकांची लागवड केली. सोबतच शेळीपालन, मत्स्यपालन, मधुमक्षिकापालन असे शेतीपूरक व्यवसाय सुरू केले.

कृषी पर्यटनाच्या दृष्टीने शेतात मचाण, खास ग्रामीण निवारा याशिवाय झोपाळे, साहसी खेळ, आधुनिक टेंटचीदेखील व्यवस्था केली. सध्या जिल्ह्याभरातूनच नव्हे, तर विदर्भातून हजारो पर्यटक थोड्या प्रवेश शुल्कात शेतीचा अनुभव, ग्रामीण खेळ, संस्कृती आणि गावकडच्या रुचकर जेवणाचा आनंद घेत आहेत.
 
सविस्तर वाचा - कोण म्हणतय, चीनवर बहिष्कार टाका, वाचा


खेळण्याची उत्तम व्यवस्था आहे.
बच्चेकंपनी बैलगाडीच्या रपेटीत गुंतली असताना महिला मंडळ संगीतखुर्ची, तळ्यात-मळ्यात आणि पुरुष वर्गाची रंगलेली रस्सीखेच व क्रिकेट सामने हे सगळे कृषी पर्यटनाचा अवर्णनीय आनंद देणारे ठरत आहे. गावाकडच्या भोजनाच्या बेतासाठी आसुसलेल्या खवय्यांना आगमन होताच मिळणारा वाणीचा हुरडा, वांग्याच्या भरीताची मेजवानी सोबतच शेतात पिकल्या मिरचीचा झणझणीत ठेचा, आलू - वांग्याची रस्सेदार भाजी व गोडवरणामुळे आम्हाला पुन्हा एकदा गावाकडे नेले, अशी पर्यटकांची प्रतिक्रिया असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com