अहो आश्‍चर्यम! सांस्कृतिक भवनाचे झाले कृषी केंद्र 

उमरेड ः सांस्कृतिक भवनात साठविण्यात आलेले कृषी साहित्य. 
उमरेड ः सांस्कृतिक भवनात साठविण्यात आलेले कृषी साहित्य. 

उमरेड(जि.नागपूर) : सांस्कृतिक भवनाची निर्मिती समाजातील अनेक महत्त्वपूर्ण घडामोंडींसाठी केलेली असते. परंतु, चक्‍क आपतूरच्या सांस्कृतिक भवनात कृषी केंद्र थाटण्याचा प्रताप पदाधिकाऱ्यांनी केला असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. 

पदाचा गैरवापर 
आपतूर येथील बारसूजी देशमुख ले-आउटस्थित शासनाच्या स्थानिक विकास योजनेअंतर्गत 2012 ते 2013 या कार्यकाळात सार्वजनिक सांस्कृतिक भवन हे गावातील जनतेसाठी घरगुती कार्यक्रमासाठी उभारण्यात आले. त्याचा वापर ग्रामस्थांच्या कल्याणासाठी न करता विद्यमान उपसरपंच व त्यांचे चुलतबंधू पंचायत समितीचे तत्कालीन उपसभापतींनी त्यांच्या कार्यकाळात आपसांत संगनमत करून त्यांच्या मालकीच्या कृषी केंद्रासाठी लागणाऱ्या मालाची साठवण करण्यासाठी केली आहे. पदाचा गैरवापर करून सर्रास हा प्रकार होत असल्याचा आरोप गावकरी करीत आहेत. 

आरोप प्रत्यारोप 
अर्जदार भगवान डहाके यांनी माजी उपसभापती गोविंदा इटनकर यांच्या घरी कृषी सेवा केंद्र असल्यामुळे त्यात लागणारे बियाणे व खतांच्या मालाची साठवणूक करण्याच्या उद्देशाने गेल्या काही वर्षांपासून पदाचा गैरवापर करत सांस्कृतिक भवनाचा वापर करीत असल्याची तक्रार केली आहे. त्यांनी बळजबरीने सांस्कृतिक भवनाचा ताबा घेतला असल्याचे तक्रारकर्त्यांचे म्हणणे आहे. या आशयाचे निवेदन खंडविकास अधिकारी, अपर आयुक्त कार्यालय, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत समिती, उपविभागीय कार्यालय उमरेड, तसेच ग्रामपंचायत सचिव/ सरपंचांना सादर केले. यावर संबंधित विभागाने अद्याप काहीही कारवाई केलेली नसून आम्ही माहितीच्या अधिकारांतर्गत माहिती विचारली असता 6 महिन्यांचा कालावधी लोटूनसुद्धा उत्तर मिळाले नसल्याचे अर्जदार भगवान डहाके यांनी सांगितले.यावेळी उपस्थित अंकुश चव्हाण, श्रीहरी कळंबे, शेखर आगलावे, भगवान डहाके व मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते. 

भवन भाडेतत्वावर घेतले 
सार्वजनिक सांस्कृतिक भवनातील पोती ही ज्ञानेश्वरी इटनकर यांच्या मालकीचे असून कृषी केंद्र हे गोविंद इटनकर यांचे आहे. भवन गेल्या चार वर्षांपासून 8 हजार रुपये वार्षिक भाडेतत्त्वावर घेतले आहे. 
-यादव इटनकर, उपसरपंच 

गावकऱ्यांची मंजूरी 
सार्वजनिक सांस्कृतिक भवन हे पडक्‍या अवस्थेत आहे. तसेच या ठिकाणी पावसाळ्यात पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती लागते. म्हणून ते गावकऱ्यांच्या उपयोगाचे नसल्यामुळे आम्ही माझ्या भावाच्या नावाने कृषी केंद्रासाठी वार्षिक आठ हजार रुपये भाड्याने घेतले आहे. करारनामा लिहून देत ग्रामसभेत गावकऱ्यांच्या मान्यतेने मंजुरी मिळालेली आहे. 
-गोविंदा इटनकर, माजी उपसभापती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com