93 कोटीच्या भरपाईसाठी बियाणे कंपन्यांना नोटीस 

विनोद इंगोले 
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

करार तुम्ही केला; जबाबदार तुम्हीच 
मोन्सटोचे तंत्रज्ञान अपयशी ठरल्याने बोंडअळी आली असा दावा कंपन्या करीत आहे. त्यामुळे मोन्सॅटोवर जबाबदारी निश्‍चीत करुन भरपाई त्यांच्याकडून घ्यावी, असे त्यांचे म्हणणे आहे. परंतू कृषी विभागाने हा दावा फेटाळला. मोन्सॅटो व बियाणे कंपन्यांनी स्वइच्छेने करार केला. बाजारात कंपन्यांनी स्वतःच्या ब्रॅण्डनेमने बियाणे विकले. शेतकऱ्यांना मोन्सॅटोचे नाही तर कंपन्यांच्या ब्रॅण्ड असलेल्या बियाण्याचे बिल मिळाले. परिणामी सर्व जबाबदारी बियाणे कंपन्यांची आहे.

नागपूर  : बोंडअळीच्या नुकसानभरपाईसंदर्भाने शेतकऱ्यांनी केलेल्या 14 लाखापैकी 9 लाख तक्रारींवर सुनावणी पूर्ण झाली आहे. त्याआधारे बियाणे कंपन्यांना 93 कोटी रुपयांच्या भरपाई संदर्भाने नोटीस बजावण्यात आल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. अमरावती विभाग आणि बीड जिल्हा या दोनच भागातील सुनावणी प्रलंबीत असल्याचे सांगण्यात आले. 

बोंडअळीच्या नुकसानभरपाईमध्ये विमा, एनडीआरएफ तसेच बियाणे कंपन्यांचा वाटा समाविष्ट होता. बियाणे कंपन्यांकडून दिल्या जाणाऱ्या मदतीसाठी शेतकऱ्यांकडून कृषी विभागाने नियमानुसार अर्ज भरुन घेतले. तब्बल 14 लाख तक्रार अर्ज प्राप्त झाले. या अर्जावर कृषी आयुक्‍तालयस्तरावरील गुणनियंत्रण संचालकांकडून बियाणे कंपन्यांची सुनावणी घेण्यात आली. 14 लाखपैकी 9 लाख अर्ज त्याआधारे निकाली काढण्यात आले. त्यानुसार एक लाख 55 हजार शेतकऱ्यांना 55 हजार हेक्‍टरचे क्षेत्राकरीता 93 कोटी रुपयांची भरपाई बियाणे कंपन्यांना दयावी लागणार आहे. अमरावती विभागातील अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशीम, यवतमाळ हे पाच तसेच मराठवाड्यातील बीड जिल्हयातील तक्रारीवर सुनावणी बाकी आहे. ती या आठवड्यात पूर्णत्वास जाईल. या सहा जिल्हयातील भरपाई तीन कोटी रुपयांवर जाण्याचा अंदाज आहे.  

असे आहेत भरपाईचे निकष 
गेल्या पाच वर्षातील सरासरी उत्पादन आणि यावर्षीच्या पीक कापणी प्रयोग अहवालातील उत्पादनाचा आढावा घेत हेक्‍टरी मदत दिली जाणर आहे. एखाद्या तालुक्‍याची उत्पादकता 11 क्‍विंटल असेल आणि तालुक्‍यात बोंडअळी आल्याने केवळ 7 क्‍विंटल कापूस झाला असेल तर उर्वरित चार क्‍विंटलला चार हजार 300 रुपये प्रती क्विंटल भरपाई दिली जाईल. 

कंपन्यांना मिळणार महिनाभराची मुदत 
नोटीस बजावल्यानंतर कंपन्यांना भरपाईसाठी एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर त्यांना कृषी आयुक्‍तांकडे अपील करता येणार आहे. आयुक्‍तांनी दावे निकाली काढल्यानंतर कंपन्या पुन्हा न्यायालयात जाण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. 

करार तुम्ही केला; जबाबदार तुम्हीच 
मोन्सटोचे तंत्रज्ञान अपयशी ठरल्याने बोंडअळी आली असा दावा कंपन्या करीत आहे. त्यामुळे मोन्सॅटोवर जबाबदारी निश्‍चीत करुन भरपाई त्यांच्याकडून घ्यावी, असे त्यांचे म्हणणे आहे. परंतू कृषी विभागाने हा दावा फेटाळला. मोन्सॅटो व बियाणे कंपन्यांनी स्वइच्छेने करार केला. बाजारात कंपन्यांनी स्वतःच्या ब्रॅण्डनेमने बियाणे विकले. शेतकऱ्यांना मोन्सॅटोचे नाही तर कंपन्यांच्या ब्रॅण्ड असलेल्या बियाण्याचे बिल मिळाले. परिणामी सर्व जबाबदारी बियाणे कंपन्यांची आहे.

Web Title: agriculture department issues notices seed companies