शेतमालाचे ‘व्हॅल्यू ॲडिशन’ करा - सुधीर सावंत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 डिसेंबर 2016

अमरावती - शेतमालावर प्रक्रिया करून त्याचे मूल्य वाढविण्यावर भर दिला पाहिजे, असे प्रतिपादन माजी खासदार व निवृत्त ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी आज, सोमवारी केले.

अमरावती - शेतमालावर प्रक्रिया करून त्याचे मूल्य वाढविण्यावर भर दिला पाहिजे, असे प्रतिपादन माजी खासदार व निवृत्त ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी आज, सोमवारी केले.

शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या ११८व्या जयंतीनिमित्त श्री शिवाजी कृषी महाविद्यालय, कृषी व्यवस्थापन तंत्रज्ञान यंत्रणा (आत्मा) आणि कृषी विभागातर्फे श्री शिवाजी कृषी महाविद्यालयात निर्यातक्षम फलोत्पादन कार्यशाळा व पुष्पप्रदर्शनाचे उद्‌घाटन झाले. त्या वेळी श्री. सावंत बोलत होते. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲड. अरुण शेळके अध्यक्षस्थानी होते. डाळिंब उत्पादक संस्थेचे उपाध्यक्ष विवेकानंद अतकरे, महाऑरेंजचे अध्यक्ष श्रीधर ठाकरे, उपविभागीय कृषी अधिकारी अनिल खर्चान, संस्थेचे उपाध्यक्ष महादेव भुईभार, सचिव व्ही. जी. भांबूरकर, प्राचार्य नंदकिशोर चिखले याप्रसंगी उपस्थित होते. शेतकऱ्यांनी अधिक उत्पन्न मिळविण्यासाठी समूह शेती चळवळीच्या स्वरूपात राबविली पाहिजे तसेच मार्केटिंगसाठी प्रयत्न केले पाहिजे. मार्केट वाढविण्याशिवाय पर्याय नाही, असे सावंत म्हणाले. ॲड. अरुण शेळके यांनी भाषणातून संस्थेमार्फत कृषी क्षेत्रात राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली.

भाऊसाहेबांनी शिक्षण, शेतीसोबतच खेळालादेखील प्राधान्य दिले. खाशबा जाधव धोतरावर स्पर्धेत धावले होते, त्याच धर्तीवर श्री शिवाजी शिक्षण संस्था स्वतःचे ऑलिम्पियाड भरविते, असे गौरवोद्‌गार ॲड. शेळके यांनी काढले. संचालन प्रा. वीरेंद्र डेरे यांनी केले. समन्वयक पी. डी. देशमुख यांनी आभार मानले. संस्थेचे स्वीकृत सदस्य अरविंद मंगळे, सांगोळे, जामोदे यांसह प्राचार्य अमर घारफळकर, गंगाधर पुसतकर, डॉ. योगेश साबळे आदी कार्यक्रमाला उपस्थित होते. निवृत्त कर्नल काळे यांनी महाविद्यालयाला द्राक्षाची कलम भेट दिली. दुसऱ्या सत्रात विवेकानंद अतकरे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: agriculture goods value addition