कोरडवाहू क्षेत्र होतेय हिरवे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 मे 2017

एकूण 22 हजार 529 कामे करण्यात आली. तर कृषी विभागातर्फे जलसंधारणाची 5 हजार कामे झाली. या सर्व कामांचे फलित म्हणजे विभागातील तब्बल दीड लाख हेक्‍टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्यास मदत झाली. शिवाय भूजल पातळी वाढली

नागपूर -  वर्षानुवर्षे रखडलेले प्रकल्प, जलसंधारणाच्या कामांचा अभाव आणि अल्प सिंचनाच्या सोयीमुळे विदर्भात कोरडवाहू क्षेत्र मोठ्या प्रमाणात होते. गेल्या तीन वर्षांपासून राबविण्यात येणारी जलयुक्त शिवार योजना आणि त्याला कृषी विभागाच्या जलसंधारणाच्या कामांची जोड मिळाल्याने कोरडवाहू क्षेत्र लागवडीखाली आल्याने ते आता हिरवे होत असल्याचे चित्र आहे.

विदर्भात जवळपास 40 लाख हेक्‍टर क्षेत्र कोरडवाहू आहे. नागपूर विभागाचा विचार केल्यास एकूण 20 लाख हेक्‍टर क्षेत्र लागवडीखालील असून त्यापैकी 14 लाख हेक्‍टर क्षेत्र कोरडवाहू आहे. एकूण क्षेत्राच्या तुलेनत जवळपास 65 टक्के क्षेत्र कोरडवाहू आणि पावसावर अवलंबून आहे. त्यामुळेच येथील शेती पूर्णपणे निसर्गावर अवलंबून असून दर दोन वर्षांनी बळीराजाला कधी ओल्या तर कधी कोरड्या दुष्काळाला सामोरे जाण्याची वेळ येत आहे. गेल्या खरीप हंगामात अधिक उत्पादनामुळे शेतमाल मातीमोल दराने विकण्याची पाळी आली. जलसंधारणाच्या कामाअभावी भूजल पातळी खालावल्याने पाणीटंचाईला तोंड देण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून सरकारतर्फे राबविण्यात येणाऱ्या जलयुक्त शिवार योजनेमुळे बरेच चांगले बदल घडून येत आहेत.

याअंतर्गत 2015-16 मध्ये नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांमध्ये एकूण 1,077 गावांची निवड करण्यात आली. या गावांमध्ये एकूण 22 हजार 529 कामे करण्यात आली. तर कृषी विभागातर्फे जलसंधारणाची 5 हजार कामे झाली. या सर्व कामांचे फलित म्हणजे विभागातील तब्बल दीड लाख हेक्‍टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्यास मदत झाली. शिवाय भूजल पातळी वाढली. बऱ्याच शेतकऱ्यांना तूर, चना, भाजीपाल्याची लागवड करून उत्पन्न घेणे शक्‍य झाले. यंदा झालेले तुरीचे विक्रमी उत्पादन हे त्याचेच फलित असल्याचा दावा कृषी विभागाने केला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांनी जलसंधारणाचा कानमंत्र तेव्हाच दिला होता. त्यांनी काही यशस्वी प्रयोगदेखील तेव्हा राबविले होते. त्याचीच आता अंमलबजावणी केली जात आहे.

या कामांवर भर
जलसंधारणाच्या कामाअंतर्गत शेततळे, बोडी खोलीकरण, मजगी, ढाळीचे बांध, सिमेंटनाला बांध आणि गाळ काढण्याची 6 हजार कामे करण्यात आली. या सर्व कामांवर जवळपास 316 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला.

पाणीसाठ्यात वाढ
जलयुक्त शिवार आणि इतर जलसंधारणाच्या कामामुळे नागपूर विभागात आतापर्यंत 1 लाख 31 हजार 854 टीसीएम इतकी पाणीसाठ्याची क्षमता निर्माण झालेली आहे. त्यामुळे पिकांना दोन संरक्षित सिंचन दिल्यास सुमारे 77 हजार 247 लक्ष हेक्‍टर क्षेत्रास त्याचा लाभ होईल.

ठळक मुद्दे
- जलसंधारणाची एकूण 27 हजार कामे
- दीड लाख हेक्‍टरला सिंचनाची सोय
- भूजल पातळीत एक ते दीड मीटरने वाढ
- दुबार पीक घेण्यास शेतकऱ्यांना मदत

Web Title: Agriculture takes a new turn in Vidarbha