राष्ट्रीय महामार्ग निर्मितीसोबतच जलसमृद्धीही 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 नोव्हेंबर 2019

  • "बुलडाणा पॅटर्न'चे महत्त्व सांगणाऱ्या पुस्तकाचे प्रकाशन 
  • नदी खोलीकरणामुळे पुराचा धोका टळला 
  • अतिशय दुष्काळी क्षेत्रात पावसाच्या पाण्याची साठवणूक 
  • "बुलडाणा पॅटर्न' सर्वाधिक चांगले काम मानतो 

नागपूर : बुलडाणा जिल्ह्यात पथदर्शी व नावीन्यपूर्ण काम झाले. येथे राष्ट्रीय महामार्ग विकासाबरोबरच जलसंवर्धन व जलसमृद्धीचे ध्येय साधता आले. महामार्ग विकासाबरोबरच जलसंवर्धनाचे काम व त्यातून निर्मित बहुआयामी जलसमृद्धीचे कार्य साध्य करण्यात आले. या कामासाठी कोणत्याही भू-संपादनाची गरज पडली नाही. राज्य सरकारला एक पैसाही खर्च करावा लागला नाही. आम्ही हे काम फुकट करून दिले. हा उपक्रम आता देशपातळीवर राबवणे गरजेचे आहे, असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. 

ऍग्रोव्हिजन फाउंडेशनतर्फे रेशीमबाग मैदानावर आयोजित "ऍग्रोव्हिजन' कृषी प्रदर्शनात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राष्ट्रीय महामार्गाचे मुख्य अभियंता विनय देशपांडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे माजी मुख्य अभियंता बाळासाहेब ठेंग उपस्थित होते. यावेळी राष्ट्रीय महामार्ग विकासासोबतच जलसमृद्धी आणि जलसंवर्धन आदर्श अभिसरणातून खास "बुलडाणा पॅटर्न'वर कार्यशाळा, बाळासाहेब ठेंग यांचे विशेष सादरीकरण आणि पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. 

नदी खोलीकरणामुळे पुराचा धोका टळला. अतिशय दुष्काळी क्षेत्रात पावसाच्या पाण्याची साठवणूक झाली. पाण्याचे संवर्धन झाले. माझ्या कारकिर्दीत आजवर वरळी-सी-फेस, हाय-वे आदी अनेक कामे झाली. मात्र, "बुलडाणा पॅटर्न' सर्वाधिक चांगले काम मानतो. बुलडाणा जिल्ह्याची ओळख दुष्काळी म्हणून होती. येथील पिके आणि पशुधन तर सोडा माणसेही पाण्यावाचून तडफडत होती. मात्र, येथे राष्ट्रीय महामार्ग विकासाचे 491 किमी लांबीचे 12 प्रकल्प मंजूर करण्यात आले. यावर केलेल्या कल्पक कार्यातून बुलडाणा जिल्ह्यात विनाखर्चाने सुमारे 55.10 लाख घनमीटर (5510 टीसीएम) अतिरिक्त भूपृष्ठीय जलसाठे निर्माण झाले. या समृद्ध जलसाठ्यामुळे 10 हजार टीसीएम एवढे वार्षिक योगदान भूजलसाठ्यांसाठी पुनर्भरणातून होणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले. 

जिल्हाधिकाऱ्यांचे सहकार्य नाही

हा प्रकल्प राबविण्यासाठी बुलडाणा आणि अकोला जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने या प्रकल्पाला सहकार्य केले. मंजुरी प्रदान केली. मात्र, वाशीमच्या जिल्हाधिकाऱ्यांनी अद्याप मंजुरी दिली नसल्याची खंत गडकरी यांनी व्यक्त केली. मुजोर नोकरशाहीचे अनेक किस्से हे जनता रोजच बघते, भोगते. मात्र, खुद्द केंद्रीय मंत्र्यांच्या प्रस्तावालाच केराची टोपली दाखवणारे हे बहाद्दर जिल्हाधिकारी कोण? याची चांगलीच चर्चा रंगली होती. कमिशनखोरी, रॉयल्टी बुडणे आदी कारणांमुळेच वाशीमच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या लोकोपयोगी कामाला मंजुरी दिली नसल्याचे म्हटले जाते. 

Image may contain: 1 person, smiling, closeup
सिंधूताई सपकाळ

ऍग्रोव्हिजनच्या मदतीने घ्या गरुडभरारी 
विदर्भ लवचिक किंवा कमजोर नाही तर कणखर आहे. मी विदर्भाचीच आहे आणि म्हणूनच शेतकऱ्यांसाठी तळमळीने बोलते. शेतकऱ्यांनो, तुम्ही चिमण्या-कावळे बनून उडू नका, थकू नका, थांबू नका तर आत्मविश्वासाने गरुडभरारी घ्या. शेतकऱ्यांचा प्रवास काटेरी असला तरी, पावले उचला. पुढे जा आणि येथे मिळणाऱ्या मार्गदर्शनाचा लाभ घ्या. 
- सिंधूताई सपकाळ, 
ज्येष्ठ समाजसेविका

Image may contain: 5 people, people sitting
महाराष्ट्र बांबू विकास महामंडळाच्या स्टॉलला शेतकऱ्यांसह नागरिकांनी केलेली गर्दी 

बांबूच्या वस्तूंकडे नागरिक आकर्षित

महाराष्ट्र बांबू विकास महामंडळाच्या स्टॉलला शेतकऱ्यांसह नागरिक मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी करीत आहे. मंडळाच्या अटल बांबू समृद्धी योजनेंतर्गत बांबू व्यवसायाला चालना देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार या प्रदर्शनात बांबूपासून केल्या जाणाऱ्या उद्योगाविषयी माहिती दिली जात आहे. यात बांबूपासून तयार होणाऱ्या दैनंदिन उपयोगाच्या वस्तू, मोबाईलचा स्टॅंड, की-चेन, लहान मुलांची सायकल, इथेनॉल, बांबूच्या मुळांपासून तयार होणारे लोणचे, कॅंडी आदी नागरिकांना आकर्षित करीत आहेत. 

Image may contain: food and indoor
बॅटरीवरची चूल

बॅटरीवरची चूल

चुलीवरच्या पदार्थांच्या चवीची खवय्यांना भुरळ आहे. विटांना शेणाचा लेप लावलेल्या आणि त्यात टाकलेले सरपण आपण आजवर पाहात आलो आहोत. याच चुलीची जागा आज बॅटरीवरची चूल घेऊ पाहत आहे. प्रदर्शनात दिसणारी ही मॉडर्न चूल नागरिकांचे लक्ष केंद्रित करीत आहे. इको फ्रेडली असणारी ही चूल एका विशिष्ट प्रकारच्या सरपणावर पेट घेते. बॅटरी एकदा चार्ज केल्यावर दहा दिवस काम करते. विशेष म्हणजे ही चूल वापरायला पोर्टेबल असल्याने कुठेही नेता येते. 

Image may contain: plant, flower and outdoor

फुलांचे आकर्षण

रेशीमबाग मैदानातील ऍग्रोव्हिजन कृषी प्रदर्शनामध्ये फ्रेंड्‌स इंटरनॅशनलने सहभाग नोंदविला आहे. संस्थेतर्फे या ठिकाणी वनस्पती व फूल प्रदर्शन भरविण्यात आले असून यामध्ये गुलाब, एच. टी, फ्लोरी बंडा, मिनीएचर, पॉलीयंथा, इंडियन रोजेस आणि जिमनोस्पर्म, कॅकटस, सॅकुलंट प्रोटॉन्स यासह शेवंती जर्बेरा ऑर्किड, डायान्यस, गॅडीओली, ऍमेरेली, पीटूनिया या मनमोहन हंगामी फुल झाडांचा समावेश आहे. प्रदर्शनाला भेट देणाऱ्यांचे लक्ष या स्टॉलकडे आपोआप वेधल्या जात आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Agro Vision : Water richness along with national highway formation