स्वातंत्र्यानंतर तब्बल ७० वर्षांनंतर तुमीरकसा गाव झाले प्रकाशमय

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 एप्रिल 2018

अहेरी - तालुक्‍यापासून २२ किमीवर असलेल्या अतिदुर्गम व संवेदनशील भागात वसलेल्या तुमीरकसा गावात देशाच्या स्वातंत्र्यानंतर तब्बल ७० वर्षांनंतर पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या अथक प्रयत्नातून वीज पोहोचली आहे. यामुळे गाव प्रकाशमय झाले आहे. 

अहेरी - तालुक्‍यापासून २२ किमीवर असलेल्या अतिदुर्गम व संवेदनशील भागात वसलेल्या तुमीरकसा गावात देशाच्या स्वातंत्र्यानंतर तब्बल ७० वर्षांनंतर पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या अथक प्रयत्नातून वीज पोहोचली आहे. यामुळे गाव प्रकाशमय झाले आहे. 

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा (डीपीटीसी)अंतर्गत २०१७-१८ या वर्षाकरिता निधी मंजूर करून अहेरी उपविभागातील गावात वीज पोहोचविण्यासाठी पालकमंत्री आत्राम यांनी पुढाकार घेतला. मागील १५ दिवसांपूर्वीच कासमपल्ली व गुर्जा या गावांत वीजजोडणी करण्यात आली. शनिवारी (ता. ३१) अतिदुर्गम व संवेदनशील भागात पहाडाच्या पायथ्याशी असलेल्या तुमीरकसा या  गावात पालकमंत्र्यांचा सूचनेनुसार महावितरण कंपनीचे प्रादेशिक संचालक (नागपूर परिक्षेत्र) भालचंद्र खंडाईत व चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता दिलीप घुगल यांनी वीजजोडणी केली. तसेच जनतेशी संवाद साधला. या वेळी गडचिरोलीचे अधीक्षक अभियंता अशोक मस्के, आलापल्लीचे कार्यकारी अभियंता अमित परांजपे, उपकार्यकारी अभियंता वाशीमकर व कंत्राटदार प्रशांत टिपले उपस्थित होते. तुमीरकसा हे अविकसित गाव असून जाण्यासाठी रस्ता नाही.  पाण्याची सोय नाही. शाळा आहे पण शिक्षक नाही. शेतकऱ्यांना सिंचनाच्या सोयी उपलब्ध नाहीत. अशा कठीण परिस्थितीत या गावात देशाच्या स्वातंत्र्यानंतर तब्बल ७० वर्षांनी विजेचे दर्शन झाले. अवघ्या बावीस घरांची वस्ती असलेल्या या गावातील सर्वच घरांना सौभाग्य योजनेअंतर्गत मोफत वीजजोडणी देण्यात आली.

सर्वांना एक एलईडी बल्ब देण्यात आले. ६३ केव्हीए रोहित्र उभारून २.५ उच्चदाब व ०.९० लघुदाब विजेची व्यवस्था करण्यात आली. शंभर टक्‍के आदिवासी लोकवस्ती असलेल्या या गावातील नागरिकांनी पारंपरिक पोशाख परिधान करून आदिवासी रेला नृत्य सादर केले. ढोल-ताशाच्या गजरात महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांचे स्वागत केले. या वेळी गावचे सरपंच, पोलिस पाटील, प्रतिष्ठित नागरिक तसेच आलापल्ली व भामरागडचे वीज विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

अनेक गावांना प्रतीक्षा
एकीकडे जग संगणक आणि इंटरनेटच्या विश्‍वाशी जोडले जात असताना जिल्ह्यातील अनेक गावांनी अद्याप विजेचा दिवा पाहिलेला नाही. स्वातंत्र्याच्या सात दशकांनंतरही त्यांना अंधारात जगावे लागत आहे. तुमरीकसा येथे वीज आली असली; तरी असे अनेक गावे अद्याप विजेपासून वंचित आहेत. या गावांमध्येही तत्काळ वीज पोहोचविण्याची मागणी महावितरण कंपनीकडे करण्यात आली आहे.

Web Title: aheri vidarbha news tumirkasa village electricity