आजनसरा प्रकल्प 19 वर्षांपासून रखडला

file photo
file photo

वर्धा : जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्‍यामधील कोरडवाहू जमीन सिंचनाखाली यावी याकरिता आजनसरा गावाजवळील वर्धा नदीवर सन 2000 मध्ये आजनसरा बॅरेज उपसा सिंचन प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला होता. मात्र, कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध होऊनही काही तांत्रिक त्रुटींमुळे 19 वर्षांपासून या प्रकल्पाचे काम रखडले आहे.
या प्रकल्पाला शासनाकडून 13 एप्रिल 2000 ला 1996-97 च्या दर सुचीनुसार 158 कोटी 21 लाख 43 हजार रुपयांची मूळ प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली होती. परंतु पाच वर्षे निधी न मिळाल्यामुळे या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झाली नव्हती. त्यानंतर नव्याने 2006 ला 208 कोटी 42 लाख 27 हजार रुपये प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली होती. तरीसुद्धा या प्रकल्पाचे काम सुरू होऊ शकले नाही. 2010-11 मध्ये या प्रकल्पाला तांत्रिक कामांकरिता दोन कोटी 62 लाखांची तरतूद करण्यात आली, तर 2011-12 मध्ये दोन कोटी 30 लाख 39 हजार रुपये खर्च करण्यात आले. 2012-13 मध्ये या प्रकल्पाच्या कामासाठी 21 लाख 10 हजार रुपये तरतूद करण्यात आली. त्यापैकी 16 लाख 66 हजार रुपये प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. 2013-14 मध्ये दोन कोटींची तरतूद करण्यात आली, तर 2014-15 मध्ये 10 लाख रुपयांची तरतूद या प्रकल्पासाठी करण्यात आली आहे. शासनाकडून एवढ्या मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद करण्यात आली असली तरी या प्रकल्पाचे काम 19 वर्षांपासून अद्याप रखडले आहे. रखडलेल्या प्रकल्पाचे काम पूर्ण होऊन तालुक्‍यातील शेती सिंचनाखाली यावी, यासाठी लोकप्रतिनिधींकडून पुरेसे प्रयत्न झाले नाही.
याबाबत माहितीच्या अधिकारान्वये लघु पाटबंधारे विभागाकडून माहिती मागविली असता असे निदर्शनात आले की, आजनसरा बॅरेजच्या कामाकरिता आवश्‍यक पाणी उपलब्धता प्रमाणपत्राकरिता मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग, नागपूर यांच्या स्तरावर कार्यवाही सुरू असून, ती अद्याप पूर्ण झालेली नाही. तसेच पर्यावरण मान्यतेचा प्रस्ताव तयार करण्यासाठी सर्वेक्षणाचे काम खासगी यंत्रणेकडून पूर्ण करण्यात आले. मात्र, अद्याप प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.
या प्रकल्पाकरिता अंतिम वनमान्यतेचा प्रस्ताव वनविभागास सादर करण्यात आला. त्या अनुषंगाने कॅट प्लॅन तयार करून त्याकरिता आवश्‍यक 3.68 कोटींचा भरणा वनविभागाच्या खात्यात करण्यात आला आहे. असे असतानाही प्रकल्पाचे काम अद्याप सुरू करण्यात आलेले नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com