सामाजिक बांधीलकी जपतोय साध्या वर्दीतील सैनिक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

नागपूर  : शालेय विद्यार्थ्यांना कराटेचे प्रशिक्षण असो किंवा पुरासारख्या नैसर्गिक संकटात सापडलेला एखादा गरजू व्यक्‍ती असो, साध्या वर्दीतील सैनिक म्हणून ख्याती असलेले अजय मोंढे, हे नेहमीच त्याच्या मदतीला धावतात. अजय यांच्या तालमीत घडलेल्या असंख्य युवा कराटेपटूंनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धांमध्ये पदके जिंकून नागपूर व विदर्भाला नावलौकिक मिळवून दिला आहे. शिवाय त्यांनी स्वत:चा जीव धोक्‍यात टाकून अनेकांचे प्राणही वाचविले.

नागपूर  : शालेय विद्यार्थ्यांना कराटेचे प्रशिक्षण असो किंवा पुरासारख्या नैसर्गिक संकटात सापडलेला एखादा गरजू व्यक्‍ती असो, साध्या वर्दीतील सैनिक म्हणून ख्याती असलेले अजय मोंढे, हे नेहमीच त्याच्या मदतीला धावतात. अजय यांच्या तालमीत घडलेल्या असंख्य युवा कराटेपटूंनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धांमध्ये पदके जिंकून नागपूर व विदर्भाला नावलौकिक मिळवून दिला आहे. शिवाय त्यांनी स्वत:चा जीव धोक्‍यात टाकून अनेकांचे प्राणही वाचविले.
मार्शल आर्टस ट्रेनिंग असोसिएशनमध्ये कराटे प्रशिक्षक असलेले अजय (ब्लॅक बेल्ट 4 डान) अध्यक्ष विपिन हाडकेंच्या मदतीने गेल्या 25 वर्षांपासून ते कराटेपटू घडवित आहेत. असोसिएशनच्या दिघोरी, अयोध्यानगर, उमरेड, वेकोलि, उदासा, कोराडी, वागदरा या भागांमध्ये शाखा असून, तिथे कराटेचे नियमित क्‍लासेस चालतात. स्वत: अजय दिघोरी येथील ज्योती हायस्कूलमध्ये कराटेचे धडे देताहेत. या ठिकाणी दररोज तीनशे ते चारशे युवक-युवती कराटेचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेतात. त्यांच्या मार्गदर्शनात तयार झालेल्या आशीष चाफेकर, ऋषिकेश तिमांडे, देवराव टेकाम, प्रीती भानोसेसारख्या असंख्य कराटेपटूंनी देशविदेशातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी बजावून विदर्भाला नावलौकिक मिळवून दिला आहे. लवकरच दिल्ली येथील तालकटोरा स्टेडियममध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेतही त्यांच्या शिष्यांची आणखी एक बॅच सहभागी होत आहे.
अजय यांचे अनेक कराटेपटू शिष्य आज अर्धसैनिक दल, आर्मी व पोलिस विभागामध्ये कार्यरत असून, देशसेवा करीत आहेत. मुलांना कराटे प्रशिक्षण देण्यासोबतच त्यांनी सामाजिक बांधीलकीदेखील जपली आहे. महापूर व आगीसारख्या नैसर्गिक घटनांच्या वेळी जीव धोक्‍यात घालून त्यांनी अनेकांचे जीव वाचविले आहेत. शिवाय राष्ट्रीय आपदा निवारण दल (एनडीआरएफ) व सेनादलासह अग्निशमन विभागाला मदतीचा हात दिला आहे. प्रहार संस्थेतही त्यांनी काही काळ सेवा दिलेली आहे. कुही तालुक्‍यातील खलासना गावातील नदीला आलेल्या पुरात एक जण अडकल्यानंतर अग्निशमन विभागाचे कर्मचारी त्याला वाचविण्यासाठी जायला तयार नव्हते. मात्र, अजय यांनी कसलाही विचार न करता हिंमत करून दोरीच्या मदतीने त्याला सहीसलामत बाहेर काढून जीव वाचविला होता. त्यांच्या या धाडसाचे सरपंच व गावकऱ्यांनी त्यावेळी कौतुक केल्याचे अजय यांनी सांगितले.
अलीकडच्या काळात मोठ्या शहरांमध्ये तरुणींवर अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. अशावेळी कराटेचे प्रशिक्षण घेतलेल्या मुली टोळक्‍यांचा धैर्याने सामना करून सहज स्वत:चे संरक्षण करू शकतात. शिवाय दुसऱ्यांचाही जीव वाचवू शकतात. भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रत्येक मुलीने कराटेचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेणे काळाची गरज आहे.
- अजय मोंढे, कराटे प्रशिक्षक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ajay Monde news