कॉंग्रेसचा संकल्प मेळावा झाला आखाडा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 जुलै 2019

नागपूर : पुढील विधानसभा निवडणूक जिंकण्याचा संकल्प करण्यासाठी आयोजित कॉंग्रेस मेळाव्यात आज कार्यकर्ते-पदाधिकारी, पक्षांतर्गत स्पर्धक नेत्यांचेच वाद उघडपणे पुढे आले. उमाकांत अग्निहोत्री यांच्या भाषणादरम्यान एका कार्यकर्त्याने उमेदवारी देताना कार्यकर्त्यांना विचारणा होते काय? असा सवाल केला. माजी शहर कॉंग्रेस अध्यक्ष शेख हुसेन यांनी महिला पदाधिकाऱ्यावर बूथचे पैसे गडप केल्याचा आरोप केल्याने संतप्त महिलेने व्यासपीठावर येऊन धिंगाणा घातला.

पुढील विधानसभा निवडणुकीसाठी तीन महिने शिल्लक असल्याच्या पार्श्‍वभूमीवर शहर कॉंग्रेसतर्फे सिव्हिल लाइन्स येथील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला. माजी मंत्री विलास मुत्तेमवार अध्यक्षस्थानी होते. माजी खासदार नाना पटोले प्रमुख वक्‍ते होते. व्यासपीठावर शहर कॉंग्रेस अध्यक्ष विकास ठाकरे, किशोर गजभिये, ऍड. अभिजित वंजारी, अतुल कोटेचा, माजी शहराध्यक्ष शेख हुसेन, उमाकांत अग्निहोत्री, प्रा. बबनराव तायवाडे, विशाल मुत्तेमवार, युवक कॉंग्रेसचे बंटी शेळके, नगरसेवक सर्वश्री मनोज सांगोळे, रमेश पुणेकर, पुरुषोत्तम हजारे, संजय महाकाळकर, हरीश ग्वालवंशी, नितीन साठवणे, नगरसेविका हर्षला साबळे, जयंत लुटे, रमण पैगवार आदी उपस्थित होते. उमाकांत अग्निहोत्री यांनी पक्ष देईल त्या उमेदवाराचे काम करण्याचे आवाहन करताच, पुढे बसलेल्या एका कार्यकर्त्याने तुम्ही तुमची उमेदवार सोडाल काय? उमेदवारी न मिळाल्याने काम कराल काय? असा सवाल केला. त्याला इतरही कार्यकर्त्यांनी साथ दिली. रमण पैगवार यांनी विजयासाठी परिश्रम घेतले, परंतु बूथवर कुणीच आढळून आले नाही, अशी खंत व्यक्त केली. ऍड. अभिजित वंजारी यांनी कॉंग्रेसच्या दुरवस्थेसाठी स्वार्थी नेते जबाबदार असल्याचे नमूद करीत चाटुकार नेत्यांचे धंदे बंद होणार नाहीत, तोपर्यंत पक्षाला उभारी मिळणार नाही, असे नमूद करीत स्वपक्षातील नेत्यांवरच आसूड उगारला. त्यांचा रोख पूर्व नागपुरातील त्यांच्या प्रतिस्पर्धी नेत्यावर होता. अतुल कोटेचा यांनीही पक्षातील वाईट रीतीवर प्रहार केला. किशोर गजभिये यांनी कॉंग्रेसला 52 जागा मिळाल्या हा योगायोग नाही तर विरोधी पक्षनेतेपदापासून दूर ठेवण्यासाठी भाजपने रचलेले षड्‌यंत्र आहे, असा आरोप केला. अनेक ठिकाणच्या मशीन बदलण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. यावेळी प्रास्ताविकातून शहर कॉंग्रेस अध्यक्ष विकास ठाकरे यांनी कॉंग्रेस पक्ष संपणारा नसून पक्षात खचणारे कार्यकर्ते नाहीत, असे नमूद करीत कार्यकर्त्यांत जोश भरला. त्यांनी पक्षासाठी काम न करणाऱ्या नेत्यांवर टीका केली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akhada assembly of Congress conclave