अरे देवा! आता या तालुक्यातही कोरोनाची एंट्री

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 26 May 2020

तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने सर्वत्र खळबळ उडाली. त्यामुळे खबरदारी म्हणून पोलिस विभागाकडून गोकुळ कॉलनीचा मार्ग सिल केला आहे. तसेच तीन दिवस भाजीपाला विक्री बंद राहणार आहे. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा आलेख चढता आहे.

अकोट (जि. अकोला) : अकोट शहरातील अकोला मार्गावरील गोकुळ कॉलनीमध्ये वास्तव्यास असलेले 71 वर्षीय वृद्ध काही दिवसांपासून आजारी असल्याने त्यांच्यावर अकोला येथे उपचार सुरू होते. दरम्यान, त्यांची कोरोना तपासणी सुद्धा करण्यात आली. 25 मे रोजी त्यांचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने सर्वत्र खळबळ उडाली. त्यामुळे खबरदारी म्हणून पोलिस विभागाकडून गोकुळ कॉलनीचा मार्ग सिल केला आहे. तसेच तीन दिवस भाजीपाला विक्री बंद राहणार आहे. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा आलेख चढता आहे.

क्लिक करा- ‘नवतपा’च्या पहिल्याच दिवशी, सूर्याने ओकली आग; अकोल्यात 47.4 विक्रमी तापमान

तीन दिवस भाजीबाजार कडकडीत बंद
पातूर, बाळापूर, तेल्हारा, मूर्तिजापूर या तालुक्यांच्या पाठोपाठ आता अकोटमध्येही कोरोनाची एंट्री झाली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पॉझिटिव्ह आढळलेला रुग्ण हा गोकुळ कॉलनीमधील असल्याने प्रशासनाकडून हा भाग सिल करण्यात आला आहे. याभागात कुणीही आत येणार नाही व बाहेर जाणार नाही अशा सूचना देण्यात आल्या. नगर पालिकेच्या वतीने तातडीने फवारणी केली असून, आरोग्य विभागाकडून परिसरातील नागरिकांच्या नावाची व इतर माहिती घेतली जात आहे. अकोट शहरातील भाजीपाला अडत व विक्री मंगळवारपासून पुढील तीन दिवस कडेकोड बंद करण्यात आली आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील सोनवणे, शहर ठाणेदार संतोष महल्ले परिस्थितीवर लक्ष ठेवून असून, नगर पालिकेचे मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर यांनी शहरातील माहिती घेत नगर परिषदेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना योग्य त्या सूचना देऊन कामी लावले. अकोटचे प्रभारी तहसीलदार राजेश गुरव हेही परिस्थितीचा आढावा घेत आहेत.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola Corona filed in Akot city