
Crime : मुलाचे बरेवाईट करतील या धास्तीने वडिलांची आत्महत्या; सासरच्यांविरोधात गुन्हा
अकोला : आपली सून, तिचा भाऊ व इतर नातेवाईक आपल्या मुलाचे बरेबाईट करतील, अशी धास्ती घेतल्याने ६७ वर्षीय सासऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी मृतक वृद्धाच्या मुलाने पोलिसात धाव घेत वडिलाच्या मृत्यूला कारणीभूत असलेली त्याची पत्नी, मेहुना व सासू-सासऱ्याविरूद्ध आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी तक्रार दिली. त्या तक्रारीवरून खदान पोलिसांनी १२ मे रोजी गुन्हा दाखल केला आहे.
मनोहरराव शंकरराव धोत्रे (रा. गायत्री नगर खदान) यांनी १८ नोव्हेंबर २०२२ रोजी त्याच्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणी सखोल तपासाअंती १२ मे रोजी पोलिसांनी भांदविचे कलम ३०६, ३४ नुसार मनोहरराव धोत्रे यांची सून रूपाली धोत्रे, तिचा भाऊ मलकापूर शिवसेना तालुका प्रमुख व एमएनवाय संस्थेचा सचिव दीपक चांभारे, सेवानिवृत्त नायब तहसीलदार रमेशराव चांभारे व एमएनवाय संस्थेच्या अध्यक्षा मंदाकिनी चांभारे यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी पंकज मनोहरराव धोत्रे यांचा आरोप आहे की, त्यांचे लग्न बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील सेवानिवृत्त नायब तहसीलदार रमेशराव चांभारे यांच्या मुलीसोबत ८ मे २०१५ रोजी झाले होते. वर्षभरानंतर पत्नीचा भाऊ दीपक चांभारे याने धोत्रे कुटुंबियांच्या इच्छेविरूद्ध बहिणीच्या चुलत नणंदेसोबत लग्न केले होते. त्यामुळे दोन्ही कुटुंबामध्ये वाद सुरु झाले.
काही दिवसानंतर चुलतबहिणीलाही तिचा पती,सासू सासरे त्रास देत असल्याने तिने पती दीपक चांभारे, सासूसासरे यांच्याविरूद्ध शारिरिक व मानसिक त्रासाची तक्रार दिल्याने खदान पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. त्याचा राग मनात ठेऊन पंकजची पत्नी व तिचे नातेवाईक पंकजला व त्याच्या वडिलांना त्रास देत होते.
तुम्हाला पाहून घेतो, तुमच्यावर खोट्या केसेस टाकतो, अशा वागणुकीमुळे वडिल मनोहरराव धोत्रे हे नेहमी दहशतीखाली वावरत होते. सून व तिचा भाऊ आपल्या मुलाचे बरेवाईट करतील अशी त्यांना भीती वाटायची. त्यांची भीती व त्रासाला कंटाळून आपल्या वडिलांनी आत्महत्या केली असा आरोप पंकज मनोहरराव धोत्रे यांनी केला आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हे दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे.