Akola : ओल्या दुष्काळाचे सावट तरी पैसेवारी ५८ पैसे! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

live photo

Akola : जिल्ह्याची नजरअंदाज पैसेवारी जाहीर

अकाेला : यंदा जिल्ह्यात पावसामुळे साेयाबीन, कपाशीसह इतरही पिकांचे अताेनात नुकसान झाले. हाता-ताेंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. अतिपावसामुळे बळीराजा आर्थिक संकटात सापडला असल्यानंतर सुद्धा जिल्ह्याची सरासरी नजरअंदाज पैसेवारी ५८ पैसे जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे अतिवृष्टी, पुरामुळे कंबरडे मोडलेल्या शेतकऱ्यांना पैसेवारीने तुर्तास दिलासा मिळणार नसल्याचे चित्र आहे.

जून, जुलै महिन्यात जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. बाळापूर व अकोला तालुक्यात पावसामुळे शेतीचे सर्वाधिक नुकसान झाले. नदी, नाल्यांचे पाणी शेतात शिरल्याने काही भागातील शेती खरडून गेली. त्यामुळे आधीच हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांचे या नुकसानामुळे कंबरडेच मोडले. अतिवृष्टी, वीज, वादळामुळे जिल्ह्यातील चौघांचा मृत्यू झाला. त्यासोतबच जिल्ह्यातील २२२ घरांचे अंशत: तर दोन घराचे पूर्णत: नुकसान झाले.

शेती पिकांमध्ये कापूस, सोयाबीन, ज्वारी, मूंग, उडीद, भाजीपाला या पिकांना अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका बसला. ऑगस्ट महिन्यात सुद्धा जोरदार पाऊस झाल्याने पुन्हा एकदा शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. आठ ते ११ ऑगस्ट दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे फळ पिकांचे नुकसान झाले. सतत होत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत असतानाच जिल्ह्याच्या नजरअंदाज पैसेवारीने सुद्धा शेतकऱ्यांना निराश केले आहे. जिल्ह्यातील खरीप पिकांची पैसेवारी जिल्हा प्रशासनाने सरासरी ५८ पैसे जाहीर केल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याचा मार्ग तूर्तास खडतर झाला आहे.

पैसेवारीचा संबंध दुष्काळाशी खरीप पिकांची पैसेवारी महसूल विभाग कृषी विभागाच्या मदतीने दरवर्षी जाहीर करत असतो. पैसेवारीचा संबंध दुष्काळासंदर्भात येत असल्यामुळे पर्जन्यमान कमी अथवा अधिक झाल्यानंतर पिकांच्या उत्पादकतेवरील परिणाम पैशाच्या स्वरूपात प्रकट करण्याचे सूत्र आहे. दरवर्षी सप्टेंबर महिन्यात नजरअंदाज, ऑक्टाेबरमध्ये सुधारित व डिसेंबर महिन्यात पिकांची अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात येते. पैसेवारीच्या आधारावर शासन दुष्काळाची परिसीमा ठरवत असते.

प्रत्यक्ष स्थितीमध्ये तफावत पैसेवारी ५० टक्क्याच्या खाली निघाल्यास पीक परिस्थिती गंभीर व ५० टक्क्याच्यावर निघाल्यास पीक परिस्थिती उत्तम हे पैसेवारीचे समीकरण आहे. जिल्ह्यात १०१२ महसूली गावे असून, त्यातील ९९० गावे खरीप पिकांची लागवडी याेग्य आहेत. त्यामुळे यंदा पाहणी करण्यात आलेल्या ९९० गावांमधील नजरअंदाज पैसेवारी सरासरी ५८ पैसे जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे पैसेवारी व प्रत्यक्ष पिकांची स्थिती विपरीत असल्याचे दिसून येत आहे.