पालकमंत्री बच्चू कडू हे आव्हान स्वीकारतील काय?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 जानेवारी 2020

सर्वसामान्यांची जाण असलेले पालकमंत्री म्हणून बच्चू कडू अकोला जिल्ह्याला लाभले आहे. पालकमंत्री म्हणून नियुक्ती झाल्यानंतर प्रथमच ते अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. मात्र, त्यांच्यापुढे या जिल्ह्यातील रखडलेल्या विकास कामांचे मोठे आव्हान असणार आहे. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर जिल्ह्याच्या विकासाची चिंता सर्वसामान्यांना लागली होती. त्यांची चिंता दूर करीत पालकमंत्री विकासाचा अनुशेष दूर करतील का, असा प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

अकोला : सर्वसामान्यांची जाण असलेले पालकमंत्री म्हणून बच्चू कडू अकोला जिल्ह्याला लाभले आहे. पालकमंत्री म्हणून नियुक्ती झाल्यानंतर प्रथमच ते अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. मात्र, त्यांच्यापुढे या जिल्ह्यातील रखडलेल्या विकास कामांचे मोठे आव्हान असणार आहे. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर जिल्ह्याच्या विकासाची चिंता सर्वसामान्यांना लागली होती. त्यांची चिंता दूर करीत पालकमंत्री विकासाचा अनुशेष दूर करतील का, असा प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

अर्धवट राहिलेल्या या प्रकल्पांचा पेच नवनियुक्त पालकमंत्री बच्चू कडू त्यांच्या काम करण्याच्या आगळ्यावेगळ्या शैलीमुळे सोडवतील, अशी अपेक्षा सर्वसामान्य अकोलेकरांना आहे. करण्यासारखे खूप काम आहे, पण त्यांना प्राधान्याने वाहतूक, सिंचन आणि आरोग्याशी संबंधित प्रश्‍न सोडविण्याचे आव्हान पेलतानाच अकोलेकरांची सांस्कृतिक भूखही भागवावी लागणार आहे.

महामार्गाचे चौपदरीकरण
सन 2015 मध्ये राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे भूमिपूजन झाले. तेव्हापासून या मार्गाचे काम पुढे सरकू शकले नाही. हीच परिस्थिती अकोला-अकोट मार्गाची आहे. भविष्यात पालकमंत्र्यांना याच रस्त्याने वारंवार प्रवास करावा लागणार आहे. या रस्त्याने आजही नागरिक धूळ खात ये-जा करीत आहेत. त्यांची व्यथा पालकमंत्री म्हणून जाणून घेत या दोन्ही मार्गाचे काम मार्गी लावावे, अशी अपेक्षा अकोलेकरांची आहे.

Image may contain: plant, tree, grass, mountain, bridge, sky, outdoor and nature
नियोजित सामाजिक न्याय भवनाची जागा

सिंचन प्रकल्प
अकोला जिल्ह्यात 2017 मध्ये ‘बळीराजा संजीवनी’ योजनेतून जिल्ह्यातील सात प्रमुख सिंचन प्रकल्पाचे अर्धवट कामे पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. यातील दोन सिंचन प्रकल्पांतच यावर्षी पाणी अडविता आले. उर्वरित प्रकल्पांची कामे पूर्ण करून जिल्ह्यातील सिंचनाचा अनुशेष कधी दूर होणार? विशेष म्हणजे, ही सर्व प्रकल्प खारपाणपट्ट्यातील आहे. त्यामुळे त्याला विशेष महत्त्व आहे.

विमानतळ विस्तारिकरण
विमानतळ विस्तारिकरणासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने त्यांची जागा दिली. आता शासनाला विस्तारिकरणासाठी आणखी काय हवे आहे? पालकमंत्री म्हणून या प्रश्‍नात बच्चू कडू यांनी विशेष लक्ष देवून हा प्रश्‍न मार्गी लावावा. शिवसेना आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनीच हा प्रश्‍न उचलून धरला आहे. त्यामुळे या पक्षाकडून राज्यमंत्रीपद व पालकमंत्री पद मिळाल्यानंतर विमानतळाचा प्रश्‍न प्राथमिकतेने सोडविला जाईल, अशी अपेक्षा आहे.

Image may contain: sky, tree, plant and outdoor
अर्धवट अवस्थेतील सांस्कृति भवन

सांस्कृतिक, सामाजिक न्याय भवन
अकोला शहराचे सांस्कृतिक वैभव वाढविण्यासाठी रखडलेल्या सांस्कृतिक भवनाचा प्रश्‍न सोडविण्याचे आव्हान पालकमंत्री बच्चू कडू यांच्यापुढे आहे. त्यासोबतच गेली कित्तेक वर्षांपासून सामाजिक न्याय भवनाचा प्रश्‍न या जिल्ह्यात सोडविता आला नाही. आता तर जागेचाही प्रश्‍न निकाली निकाला तेव्हा पालकमंत्री म्हणून बच्चू कडू यांच्या कार्यकाळात या दोन्ही भवनाचा प्रश्‍न सोडविला जाईल, अशी अपेक्षा आहे.

Image may contain: sky, tree and outdoor
उद्घाटनाच्या प्रतिक्षेत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल.

सुपर स्पेशालिटी
अकोला जिल्ह्यातीलच नव्हे तर पश्‍चिम विदर्भातील अकोला, वाशीम, बुलडाणा या तीन जिल्ह्यातील रुग्णांसाठी वरदान ठरू शकणारे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सूसज्य होण्याचा प्रतीक्षेत आहे. महागडे यंत्र अद्याप पडून आहेत. येथील कर्मचारी नियुक्तीचा प्रश्‍न अद्याप निकाली निघाला नसल्याने हा प्रश्‍न सोडवून घेण्याचे आव्हान पालकमंत्री म्हणून बच्चू कडू यांच्यापुढे आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola devlopment is the challange for bacchu kadu