esakal | अरे व्वा...पीक कर्ज मिळवणे झाले आता सोपे!
sakal

बोलून बातमी शोधा

Satbara.jpg

पीक कर्जसाठी शेतीचा सातबारा जोडणे आवश्यक आहे. परंतु, लॉकडाउनमुळे तसेच जनसंपर्क टाळणे आवश्यक असल्याने, सातबारा मिळविणे अडचणीचे झाले आहे. त्यामुळे अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने डिजीटल सातबारा व 8 अ स्वीकारण्याचा निर्णय घेतला असून, बाळापूर तहसिलदारांनी सुद्धा तालुक्यातील बँका व सहकारी सोसायट्यांनाही तसे निर्देश दिले आहेत.

अरे व्वा...पीक कर्ज मिळवणे झाले आता सोपे!

sakal_logo
By
अनुप ताले

अकोला : पीक कर्जसाठी शेतीचा सातबारा जोडणे आवश्यक आहे. परंतु, लॉकडाउनमुळे तसेच जनसंपर्क टाळणे आवश्यक असल्याने, सातबारा मिळविणे अडचणीचे झाले आहे. त्यामुळे अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने डिजीटल सातबारा व 8 अ स्वीकारण्याचा निर्णय घेतला असून, बाळापूर तहसिलदारांनी सुद्धा तालुक्यातील बँका व सहकारी सोसायट्यांनाही तसे निर्देश दिले आहेत.

महिनाभरापासून देशात लॉकडाउन करण्यात आले आहे आणि तेव्हापासून सेतूवरील सातबारा विषयक साईट सुद्धा काम करीत नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या आहेत. शिवाय लॉकडाउन तसेच कोरोना संक्रमण रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जनसंपर्क टाळणे आवश्यक असल्याने, तलाट्यांकडूनही मोठ्या संख्येत शेतकऱ्यांना सातबारा उपलब्ध होणे कठीण झाले आहे. परंतु, पीक कर्ज मिळवायचे असेल तर, शेतकऱ्याने कर्ज वितरण संस्था, बँकांमध्ये शेतीचा सातबारा देणे आवश्यक आहे. त्यामुळे या अडचणीवर तोडगा म्हणून, शेतकऱ्यांकडून पीककर्ज मागणी करतेवेळी डिजीटल स्वाक्षरी असलेला सातबारा सुद्धा स्वीकारण्याचा निर्णय जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने घेतला असल्याचे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनंत वैद्य यांनी सांगितले.

बाळापूर तहसिलदारांनी सुद्धा दिले निर्देश
राष्ट्रीयकृत बँका, सेवा सहकारी सोसायटी यांनी शेतकऱ्यांना पीक कर्ज देताना तलाठ्यांनी स्वाक्षरीचे 7/12 व 8 अ चा आग्रह न धरता डिजीटल स्वाक्षरीचा सातबारा, 8 अ स्वीकारावा. पीक कर्जाकरिता नवीन फेरफार प्रतीची मागणी न करता उपलब्ध प्रतीची पाहणी करुन सातबाराशी ताळमेळ घेऊन तीच प्रत ग्राह्य धरावी. बँका, सेवा सहकारी सोसायट्यांनी बोजा संबंधिचे पत्र संबंधित खातेदाराकडे न देता ते ऑनलाइन उपलब्ध ई-हक्क प्रणालीद्वारे संबंधित तलाठी यांचेकडे पाठविण्यात यावा. हीच पोच समजण्यात येईल. तलाठ्यांनी सदर बोजाची नोंद सातबाराला घेतल्यानंतर ऑनलाइन प्रणालीमध्ये बोजाची नोंद संबंधित बँकेला पाहण्याची सुविधा आहे तसेच एक लाख 60 हजार मर्यादेपर्यंत सातबाराला बोजा घेण्याची आवश्यकता नाही, असे निर्देश बाळापूर तहसिलदार यांनी, तालुक्यातील बँका व सेवा सहकारी संस्थांना दिले आहेत.

डिजिटल 7/12, 8 अ याठिकाणी उपलब्ध
संबंधित डिजीटल 7/12 व 8 अ हे महा-ई-सेवा केंद्र, सी.एस.सी. सेंटर, आपले सरकार पोर्टल किंवा संग्राम केंद्र या ठिकाणी उपलब्ध आहेत.

पीक कर्ज वितरण सुद्धा सुरू
सातबारा मिळविण्यासाठीची शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेता, पीक कर्ज वितरणासाठी आम्ही डिजीटल स्वाक्षरीचा सातबारा सुद्धा स्वीकारत असून, खरीप पीक कर्ज वितरण सुद्धा सुरू आहे.
- अनंत वैद्य, मुख्य कार्यकारी अधिकारी, अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अकोला. 

loading image