अकोला जिल्ह्याच्या हातावर तुरी!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 मे 2018

शेजाऱ्याच्या धान्याने भरली गोदामे

अकोला: तूर आणि हरभरा खरेदीचा पेच वाढत आहे. गोदामे रिकामी नसल्याने शेतकऱ्यांकडील तूर, हरभरा हमीभावाने खरेदी करण्याचे टाळले जात असताना अकोला जिल्ह्यातील गोदामे शेजारी जिल्ह्यातील धान्याने भरली असल्याची माहिती उजेडात आली. याबाबत खासदार आणि आमदारांनी जिल्हा विपणन अधिकार व वखार मंडळाच्या व्यवस्थापकांना सोमवारी धारेवर धरले.

शेजाऱ्याच्या धान्याने भरली गोदामे

अकोला: तूर आणि हरभरा खरेदीचा पेच वाढत आहे. गोदामे रिकामी नसल्याने शेतकऱ्यांकडील तूर, हरभरा हमीभावाने खरेदी करण्याचे टाळले जात असताना अकोला जिल्ह्यातील गोदामे शेजारी जिल्ह्यातील धान्याने भरली असल्याची माहिती उजेडात आली. याबाबत खासदार आणि आमदारांनी जिल्हा विपणन अधिकार व वखार मंडळाच्या व्यवस्थापकांना सोमवारी धारेवर धरले.

अकोला जिल्ह्यातील ७० टक्के शेतकऱ्यांकडील सव्वा दोन लाख क्विंटल तूर आणि ९० टक्के शेतकऱ्यांकडील पाच लाख क्विंटलपेक्षा अधिक हरभरा खरेदी करण्यात आला नाही. याबाबत तेल्हारा आणि आकोट तालुक्यासह जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खासदार व आमदारांना जाब विचारला. त्यामुळे सोमवारी खासदार संजय धोत्रे यांनी जिल्हा विपणन अधिकारी राजेश तराळे आणि वखार मंडळाचे व्यवस्थापक ढवळे यांच्यासोबत शेतकऱ्यांच्या उपस्थितीत शासकीय विश्रामगृहात बैठक घेतली. या बैठकीला आमदार रणधीर सावरकर, प्रकाश भारसाकळे, हरीश पिंपळे, भाजप जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात यांची उपस्थिती होती. यावेळीही अधिकाऱ्यांनी गोदामे रिकामी नसल्याने तूर, हरभरा खरेदी बंद असल्याची माहिती दिली. एकीकडे जिल्ह्यातील ७० टक्के शेतकऱ्यांची तूर व ९० टक्के शेतकऱ्यांकडील हरभरा खरेदीच झाला नाही तरी गोदामे भरली कशी, असा प्रश्‍न आमदार सावरकरांनी उपस्थित केला. त्यावर अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती धक्कादायक होती. जिल्ह्याच्या हातावर तुरी देवून शेजारी जिल्ह्यातील धान्याने गोदामे भरली असल्याने आमदारांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. अकोला जिल्ह्यातील वखार महामंडळाच्या गाेदामांमध्ये बुलडाणा जिल्ह्यातील चिखली, मेहकर, शेगाव, खामगाव या तालुक्यातून  एक लाख १५ हजार क्विंटल तूर साठवण्यात आली. वाशीम जिल्ह्यातील ७५ हजार क्विंटल तूर तर अमरावती जिल्ह्यातील १० हजार क्विंटल तूर अकोल्यातील गोदामांमध्ये ठेवण्यात आल्याने गोदामे भरली आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

सहकारमंत्र्यांचा फोन
खासदार आणि आमदारांसोबत अधिकाऱ्यांची बैठक सूरू असताना सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी फोन करून जिल्ह्यातील तूर व हरभरा खरेदीबाबत माहिती घेतली. त्यांना आमदार सावरकर आणि भारसकाळे यांनी जिल्ह्यातील परिस्थितीबाबत अवगत करून या पेचात मार्ग काढण्याची विनंती केली आहे.

महाबीजची गोदामे
जिल्ह्यातील तूर व हरभरा साठवण्यासाठी खासदार संजय धोत्रे यांनी महाबीजची दोन गोदामे उपलब्ध करून दिली. आकोट आणि दर्यापूर येथील गोदामांमध्ये २० हजार क्विंटल धान्यच साठविता येणार असल्याने महाबीजचे गाेदामे वापरूनही तूर, हरभरा साठवणुकीचा प्रश्‍न कायम आहे.

अधिकाऱ्यांची पोलिस तक्रार
तूर व हरभरा खरेदीत अनियमितता केल्याचा आरोप करीत खासदार आणि आमदारांनी जिल्हा विपणन आणि वखार महामंडळाच्या अधिकाऱ्यांची सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार केली.

Web Title: akola district and tur