अकोला परिमंडळातील साडेपाच हजार शेतकऱ्यांना दिवसा वीज

solar agri pump
solar agri pump

अकोला : सिंचनासाठी पाणी उपलब्ध असूनही केवळ वीज उपलब्ध नसल्याने रात्रीच्या वेळी शेतकऱ्यांना शेतात पाणी देण्यासाठी जावे लागते. या नैराश्‍यजनक वातावरणातही महावितरणच्या अकोला परिमंडळातील तीन जिल्ह्यात 5 हजार 618 शेतकरी दिवसा पिकांना पाणी देत आहेत. हा परिणाम आहे सौर ऊर्ज कृषिपंपांचा आधार मिळाल्याचा.

मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेत सहभागी होण्यासाठी सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना 3 एचपीसाठी 16 हजार 560 रुपये (दहा टक्के) तर अनुसूचित जाती/जमाती गटातील लाभार्थ्यांना 8 हजार 280 रुपये (5 टक्के), तर 5 एचपीसाठी सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना 24 हजार 710 रुपये (दहा टक्के) तर अनुसूचित जाती/जमाती गटातील लाभार्थ्यांना 12 हजार 355 रुपये (5 टक्के) एवढी रक्कम भरायची होती. अकोला परिमंडळाअंतर्गत असणाऱ्या अकोला जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी पैसे भरून एजन्सीची निवड केली आहे, त्यापैकी पहिल्या टप्प्यातील 613 आणि दुसऱ्या टप्यातील 37 शेतकऱ्यांच्या शेतात सौर कृषिपंप बसवण्यात आले आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी पैसे भरून एजन्सीची निवड केली आहे, त्यापैकी पहिल्या टप्यातील 409 आणि दुसऱ्या टप्यातील 503 शेतकऱ्यांच्या शेतात सौर कृषिपंप बसवण्यात आले.

वाशिम जिल्ह्यातील पहिल्या टप्यात 1421 आणि दुसऱ्या आणि तीसऱ्या टप्यात 325 अशी परिमंडळातील एकूण 3380 शेतकऱ्यांच्या शेतात मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेत सौर कृषीपंप बसविण्यात आले आहेत. या अगोदर राबविण्यात आलेल्या अटल सौर कृषीपंप योजनेत परिमंडळाअंतर्गत असणाऱ्या अकोला जिल्हयात 577, बुलढाणा 841 आणि वाशिम जिल्हयात 892 सौर कृषीपंप असे परिमंडळातील तीनही जिल्हयात एकून 2310 सौर कृषिपंप बसविण्यात आले आहेत.


पहिला टप्पा पूर्ण
टप्पा एक, दोन, तीन अशा एकूण तीन टप्यात राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. टप्पा दोन व तीनचे एकत्रीत काम प्रगती पथावर आहे. दुसऱ्या व तीसऱ्या टप्यात परिमंडळाअंतर्गत एकूण 6671 सौर कृषिपंप देण्याचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत प्राप्त झालेल्या 9494 शेतकऱ्यांच्या अर्जांना मंजूर करत त्यांना त्यांचा वाटा भरण्यासाठी कोटेशन पाठविण्यात आले आहे. त्यापैकी 4607 शेतकऱ्यांकडून पैसे भरून एजन्सीची निवड करण्यात आली आहे.


दिवसा सिंचन शक्य
सौरपंपामुळे दिवसा सिंचन शक्य होणार आहे. यात वीजपुरवठा खंडित होण्याचा, विजेच्या कमी दाबाचा प्रश्नच निर्माण होत नाही. विजेचा किंवा डिझेलचा वापर नसल्यामुळे वीजबिलाचा किंवा डिझेलचा खर्च वाचणार आहे. कमीत कमी देखभालीची गरज आहे. विजेची तार तूटून किंवा पोल पडून विद्युत अपघाताचा धोका नाही. सौरकृषिपंपाचे आयुर्मान 25 वर्षे आहे. सौर कृषिपंपाची देखभाल व दुरुस्तीचा कालावधी पाच वर्षे तर सौर पॅनलचा कालावधी दहा वर्षाचा आहे. या कालावधीत सौर कृषिपंप नादुरुस्त झाल्यास दुरुस्ती व देखभालीसाठी निश्चित केलेल्या कालावधीत संबंधित एजन्सी विनामूल्य दुरुस्ती करणार आहे. सौर कृषिपंपाचा 5 वर्षासाठी एजन्सीद्वारे विमा उतरवण्यात आलेला आहे. त्यामुळे सौर कृषिपंपाच्या साहित्याची चोरी झाल्यास किंवा नुकसान झाल्यास लाभार्थी विमा कंपनीकडून नुकसानभरपाईसाठी पात्र ठरेल. विशेष म्हणजे, सौर कृषिपंपासोबत दोन डी.सी. एल.ई.डी बल्ब, मोबाईल चार्जिंग व बॅटरी चार्जिंग पाॅईंटची सुविधा देण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com