शेतकऱ्यांनी चक्क विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना कोंडले (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 नोव्हेंबर 2019

- फळ पीक विम्याच्या रकमेसाठी आक्रमक भूमिका
- साडे सहा तासानंतर विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून दखल
- लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे

अकोला : अस्मानी संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना सुलतानी जाचालाही सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या अकोट तालुक्यातील फळबाग शेतकऱ्यांनी विमा रक्कम मिळत नसल्याच्या कारणाने विमा कंपनीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना त्यांच्याच कार्यालयात कोंडून ठेवले.

 

गौरक्षण रोडवरील न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या कार्यालयात शुक्रवारी अकोट तालुक्यातील पणज, रुईखेड आणि बोचरा परिसरातील शेतकऱ्यांनी आंदोलन करताना हे टोकाचे पाऊल उचलले. साडे सहा तासानंतर विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून आठवडाभरात दावे निकाली काढण्याचे लेखी आश्‍वासन मिळाल्यानंतर शेतकऱ्यांनी रात्री आठ वाजता आंदोलन मागे घेतले.

गतवर्षीही दुष्काळाचा फटका
यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीन, मूग, उडीद, कापूस, तूर पिकासोबतच फळबागांचेही अतोनात नुकसान झाले. अकोट तालुक्यातील पणज मंडळातील केळी उत्पादकांनीही त्याचा फटका बसला. गतवर्षीही दुष्काळाचा फटका शेतकऱ्यांना बसला होता. या फळबाग शेतकऱ्यांनी सन 2018-19 मध्ये फळ पीक विमा काढला होता. मात्र केळीची पाने सुकली आणि वाढीच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण झाला. परिणामी केळी पिकाचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे दावा करून नुकसान भरपाईची मागणी केली. शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही दिले होते. विम्याची 1 लाख 76 हजार रुपये मंजूर करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती.

35 शेतकऱ्यांचा संयम शुक्रवारी सुटला
काहींना दाव्यापोटी पहिला हप्ता मिळाला. मात्र नंतर उर्वरित रक्कमच मिळाली नाही. विम्यापासून वंचित राहिलेल्या 35 शेतकऱ्यांचा संयम शुक्रवारी सुटला. त्यांनी थेट अकोला येथील गौरक्षण रोडवरील न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीचे कार्यालय गाठलले. अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांना प्रतिसाद न मिळाल्याने अखेर त्यांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांना कोंडून ठेवत कार्यालयातच ठिय्या दिला. या आंदोलनात प्रदीप ठाकूर, विकास देशमुख, अनिल रोकडे, मनोज बोचे, प्रवीण शेंडे, गणेश राऊत, संतोष जायले, केशव जायले, मंगल मालवे, सोनु भरदे, गजानन सावरकर, कैलास बारब्दे, चंद्रजीत बारब्दे, संतोष पंडील, मधुकर जायले, अंकुश जायले, प्रमोद शेळके, सागर इंगळे, श्रीकृष्ण जायले, पिंटू जायले आदी शेतकरी सहभागी झाले होते.

विम्याच्या प्रतीक्षेतील शेतकऱ्यांची संख्या मोठी
फळ बागांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतात पंचनामे करण्यात आले होते. त्यानंतर सप्टेंबरमध्ये दाव्याची संपूर्ण रक्कम मिळणे अपेक्षित होते. पंचनामे झाल्यानंतर सुमारे तीनशे पेक्षा जास्त शेतकरी विमा रक्कम मिळण्यासाठी प्रतीक्षेत होते.

अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ
केळी पीक विम्यासाठी न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये दावा करणाऱ्या शेतकऱ्यांना अधिकारी उडवाउडवीचे उत्तरे देत टाळण्याचा प्रयत्न करीत होते. नियमानुसार विमा मिळावा म्हणून शेतकरी मागणी करीत असतानाही त्यांना प्रतिसाद न मिळाल्याने शेतकऱ्यांचा संयम सुटला.

लेखी आश्‍वासनानंतर आंदोलन मागे
पीक विम्या दाव्याची रक्कम मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या कार्यालयात प्रबंधक महादेव पांडे, प्रशासकीय अधिकारी उज्वल कोरपे यांच्यासह कर्मचाऱ्यांना कोंडून ठेवले होते. अखेर गुरुवार, 21 नोव्हेंबरपर्यंत सर्व शतेकऱ्यांचे दावे कंपनीकडून कोणतेही कारण न सांगता अदा करण्यात येतील, असे लेखी आश्‍वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola Farmers Protest Against Crop Insurance Office