कापूस विकायचा आहे तर मग घाई करा, कारण नोंदणीकरिता उरले फक्त पाच दिवस

सकाळ वृत्तसेवा
Friday, 22 May 2020

एकीकडे कापूस उत्पादक शेतकरी शासनाने त्याच्याकडील कापूस खरेदी करावा म्हणून आंदोलन करीत असताना दुसरीकडे शासनाने शेतकऱ्यांकडे कापूस खरेदी करण्याची मर्यादा निश्चित करून दिली आहे. त्यानुसार शेतकऱ्यांकडील कापूस खरेदीसाठी 26 मेपर्यंत म्हणजे अवघ्या पाच दिवसांत नोंदणी करावी लागणार आहे.

अकोला : एकीकडे कापूस उत्पादक शेतकरी शासनाने त्याच्याकडील कापूस खरेदी करावा म्हणून आंदोलन करीत असताना दुसरीकडे शासनाने शेतकऱ्यांकडे कापूस खरेदी करण्याची मर्यादा निश्चित करून दिली आहे. त्यानुसार शेतकऱ्यांकडील कापूस खरेदीसाठी 26 मेपर्यंत म्हणजे अवघ्या पाच दिवसांत नोंदणी करावी लागणार आहे.

अकोला जिल्ह्यात कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात कापूस शिल्लक आहे. तो कापूस शासनाने खरेदी करावा म्हणून शेतकरी संघटनेच्या माध्यमातून कापूस जाळा आंदोलन करण्यात येत आहे. हे आंदोलन सुरू असतानाच शासनाने सीसीआय व बाजार समितीतर्फे कापूस खरेदीसाठी वेळ निश्चित करून दिली आहे. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार अकोला जिल्ह्यात सीसीआय व फेडरेशनमार्फत कापूस खरेदीसाठी वेळ निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार 26 मेपर्यंत शेतकऱ्यांना त्यांच्याकडील कापूस विक्रीसाठी नोंदणी करता येणार आहे. पावसाळ्याचे दिवस बघता हे नियोजन करण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे.

32,500 शेतकऱ्यांचा कापूस खरेदी
कापूस फेडरेशन तसेच सी.सी.आय. मार्फत किमान आधारभूत किंमत खरेदी अंतर्गत कापूस खरेदी सुरू आहे. कापूस खरेदीसाठी शेतकऱ्यांकडून जिल्ह्यातील सर्व कृपी उत्पन्न बाजार समितीमध्ये नोंदणी करण्यात येत आहे. जिल्ह्यात कापूस फेडरेशनकडून आजपर्यंत एकूण 4338 शेतकऱ्यांचा 121985 क्विंटल कापूस खरेदी करण्यात आलेला आहे. सी.सी.आय कडून 28199 शेतकऱ्यांचा 860168 क्विंटल कापूस खरेदी करण्यात आलेला आहे. अजूनही काही शेतकऱ्यांकडील असलेला कापूस खरेदी करणे बाकी आहे.

बार्शीटाकळी केंद्रावर 29 पर्यंतच खरेदी
सी.सी.आय.चे बार्शीटाकळी कापूस खरेदी केंद्रावर ज्या शेतकऱ्यांनी कापूस खरेदीकरिता नोंदणी केली असून, त्यांचा कापूस खरेदी करणे बाकी आहे, त्या शेतकऱ्यांचे कापसाची खरेदी ही सी.सी.आय. तसेच बाजार समिती प्रशासनाव्दारे नियोजन करून 29 मे रोजी सायंकाळी 5 पर्यंत करण्यात येणार आहे. त्यानंतर बार्शीटाकळी कापूस खरेदी केंद्र बंद करण्यात येणार आहे. संबधित शेतकऱ्यांनी दिलेल्या दिवशी कापूस विक्रीसाठी केंद्रावर आणावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांकडील कापूस पावसाळा सुरू होणे पूर्वी खरेदी करणे बाबतची कार्यवाही करण्याबाबत प्रशासनाकडून कापूस फेडरेशन व सी.सी.आय यांना वेळोवळी सूचित करण्यात आले आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे अजून कापूस विक्रीसाठी शिल्लक आहे, त्या शेतकऱ्यांनी 26 मेपर्यंत नोंदणी करावी.
-डॉ.प्रवीण एच.लोखंडे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, अकोला 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola If you want to sell cotton, then hurry up, because there are only five days left for registration