अकोला-खंडवा रेल्वे विस्तारीकरण वांध्यात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 जून 2018

अमरावती - मेळघाट व्याघ्रप्रकल्पाच्या गाभा (कोअर) क्षेत्रातून जाणाऱ्या अकोला ते खंडवा रेल्वेमार्गाच्या विस्तारीकरणाला वन्यजीवप्रेमींनी तीव्र विरोध केला आहे. गाभा क्षेत्रातून या मार्गाला न नेता पर्यायी मार्ग देण्याची मागणी पुढे आली. 

अमरावती - मेळघाट व्याघ्रप्रकल्पाच्या गाभा (कोअर) क्षेत्रातून जाणाऱ्या अकोला ते खंडवा रेल्वेमार्गाच्या विस्तारीकरणाला वन्यजीवप्रेमींनी तीव्र विरोध केला आहे. गाभा क्षेत्रातून या मार्गाला न नेता पर्यायी मार्ग देण्याची मागणी पुढे आली. 

वन्यजीवप्रेमी संघटनांच्या प्रतिनिधींची रविवारी अकोट येथील कृउबासच्या सभागृहात बैठक  झाली. या वेळी अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशीम, यवतमाळ आणि नागपूर येथील वन्यजीवप्रेमी उपस्थित होते. नुकतीच दिल्ली येथील एका बैठकीत अकोला-खंडवा रेल्वेच्या विस्तारीकरणाला मंजुरी देण्यात आली आहे. ही मंजुरी वन्यप्राणी, वन्यजीवांच्या मुळावर उठत असून पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे.

या बैठकीत शासनाच्या निर्णयावर आक्षेप घेण्यात आले. धोकाग्रस्त वाघ्र अधिवासातून रेल्वेचे विस्तारीकरण वन्यप्राण्यांसाठी घातक असून, वनसंपदा धोक्‍यात आली आहे, असे मत वन्यजीवप्रेमींनी व्यक्त केले.

विस्तारीकरणासाठी विभागाची मंजुरी न घेता नियमांना बगल  दिल्याचा आरोपही बैठकीत मनीष जेस्वानी यांनी केला. प्रा. इंद्रप्रताप ठाकरे यांनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे यातील धोके आणि उपाय सांगितले.  सध्या या वनक्षेत्रातून जाणारा रेल्वेमार्ग मीटरगेजचा आहे. मुळात फार पूर्वीपासून हा मार्ग अस्तित्वात आहे. गेल्या वर्षापर्यंत यावरून प्रवासी रेल्वेगाड्याही धावत होत्या. केवळ विस्तारीकरणाच्या कामासाठी ही वाहतूक बंद करण्यात आली.

हा मार्ग ब्रॉडगेजमध्ये रूपांतरित झाल्यास उत्तर व दक्षिण भारताला जोडणारा कमी लांबीचा नवा मार्ग उपलब्ध होऊ शकतो. हा  मार्ग दक्षिणेतील हैद्राबाद ते राजस्थानातील अजमेर या प्रस्तावित रेल्वेमार्गाचा भाग आहे.

त्यातील हैद्राबाद ते अकोला व अजमेर ते खंडवा या मार्गाचे विस्तारीकरण झाले आहे. समस्या केवळ अकोला ते खंडवा या मार्गाच्या विस्तारीकरणातच आहे. हा मार्ग मेळघाट व्याघ्रप्रकल्पाच्या  कोअर वनक्षेत्रातून जातो. त्यामुळे या मार्गाच्या विस्तारीकरणाला पर्यावरणप्रेमींचा तीव्र विरोध  आहे. त्याऐवजी वनक्षेत्राला वळसा घालून जाणारा पर्यायी मार्ग तयार करावा, अशी मागणी पर्यावरणप्रेमींची आहे.

पर्यायी मार्ग
सध्याच्या मार्गाचेच विस्तारीकरण केले तर या व्याघ्रप्रकल्पातील केवळ नऊ गावांनाच त्याचा फायदा होईल. परंतु, हा मार्ग वनक्षेत्राला वळसा घालून नेल्यास अकोला-खंडवा अंतर २९ किमी ने वाढेल. पण, आसपासच्या ५० ते ६० गावांतील लोकांना फायदा मिळू  शकतो, अशी भूमिका वन्यजीवप्रेमींनी घेतली आहे. हा पर्यायी रेल्वेमार्ग अडेगाव बु. पासून हिवरखेडकडे निघेल व अकोला जिल्ह्यातील सोनाळा, टुनकी, जळगाव जामोद या प्रमुख गावावरून जाऊन मध्य प्रदेशात प्रवेश करेल. मध्य प्रदेशातील उसरणी, खाकरा कालन, खडकी  या गावांवरून तुकईथड रेल्वेस्थानकाच्या अगोदर जुन्या रेल्वेमार्गाला मिळेल.

प्रस्तावित रेल्वे विस्तारीकरणामुळे वन्यजीवांचे अपघात वाढतील, तस्करीला प्रोत्साहन मिळेल. त्यामुळे सदर रेल्वे बाहेरून न्यावी. त्याचा फायदा अकोला जिल्ह्यातील काही मोठ्या शहरांना  होऊ शकतो.
- डॉ.  जयंत वडतकर, राज्य जैवविविधता मंडळ सदस्य.

Web Title: Akola khandava railway Expansion in problem