एका सातबाऱ्यावर 30 किलोच अनुदानित बियाणे!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019

- महाबीजने दिलेले हरबरा बियाणे पेरावे तरी कुठे? 
- शेतकऱ्यांचा प्रश्‍न; गुणवत्ताही नाही; शासकीय यंत्रणांकडून थट्टा
- जास्तीत जास्त 60 किलोपर्यंतच्याच बियाण्यांना अनुदान
- महाबीजच्या तालुका कृषी केंद्रावर विक्री

अकोला : संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांची सध्या सर्वत्र कोंडी होत आहे. त्यात शासकीय यंत्रणांनीही शेतकऱ्यांची थट्टा मांडली. महाबीजच्या अनुदानित बियाण्यांवरून हे दिसून येत आहे. एका सातबाऱ्यावर 30 किलोच अनुदानित बियाणे उपलब्ध करून दिले जात आहे. त्यातही हे बियाणे गुणवत्तापूर्ण नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.

खरीपमध्ये सुरुवातीला पाऊस नसल्याने तर जाताजाता अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले. कर्जमाफीचा पत्ता नाही. पीक विमा मिळाला नाही. सरकारी मदतीचे हवेतच इमले बांधले जात आहे. सरकारी पातळीवर शेतकऱ्यांची अशी थट्टा सुरू आहे. त्यात महाबीज तरी कसे मागे राहणार. दोन वर्षांपूर्वीचा बियाणे अनुदान घोटाळा शेतकरी अद्याप विसरले नाही. आता तरी संकट काळात शासकीय यंत्रणा शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभ्या राहतील अशी अपेक्षा असताना महाबीजने रब्बीतील हरबरा पेरणासीठी एका सातबाऱ्यावर अवघे 30 किलो हरभरा बियाणे अनुदानावर उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. बाजार भावाच्या तुलनेत अनुदानीत बियाणे 50 टक्के कमी किमतीत शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले जात आहे. मात्र अवघ्या 30 किलोमध्ये कुठे पेरणी करावी, असा प्रश्‍न शेतकरी विचारू लागले आहेत.

तालुका कृषी केंद्रावर विक्री
शेतकऱ्यांना सन 2019-20 मधील रब्बी हंगामासाठी हरभरा बियाणे राष्ट्रिय अन्न सुरक्षा अभियान (एनएफएसएम) कडधान्य अंतर्गत अनुदानावर उपलब्ध करून दिले जात आहे. हे बियाणे महाबिजतर्फे त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या तालुक्यातील अधिकृत कृषी विक्री केंद्रांवर उपलब्ध करून देण्यात आले आहे.

Image may contain: tree, sky and outdoor

एका शेतकऱ्यांला 750 रुपये अनुदान
महाबीजतर्फे उपलब्ध करून देण्यात आलेल्या दहा वर्षांपूर्वीचे वाण जाकी 9218 करीत 30 किलोच्या एका बॅगेची किंमत 2100 रुपये ठेवण्यात आली आहे. त्यावर शेतकऱ्यांना 750 रुपये अनुदान दिले जाणार आहे. म्हणजे अनुदानित किंमतीसह एका शेतकऱ्याला १३५० रुपयात 30 किलो हरभरा मिळणार आहे. एका शेतकऱ्याचे नावे एकापेक्षा जास्त सातबारे असले तरी त्याला जास्तीत जास्त 60 किलोपर्यंतच्याच बियाण्यांना अनुदान दिले जाणार आहे.

शासनाकडून शेतकऱ्यांची थट्टा
रब्बीतील पेरणीसाठी शेतकरी बियाण्यांची जुळवाजुळव करीत आहे. छोट्या शेतकऱ्यांनाच जास्त अडचणी येत आहे. त्यांना पुरेशे बियाणे उपलब्ध होतील यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. मात्र महाबीजचे अनुदानित बियाणे एका सातबाऱ्यावर 30 किलोपेक्षा जास्त मिळणार नाही. या बियाण्यांची गुणवत्ता बघता पेरणीसाठी मात्राही जास्त लागते. त्यामुळे या अनुदानित बियाण्यांमधून शेतकऱ्यांना कोणताही दिलासा मिळणार नाही.
- मनोज तायडे, शेतकरी नेते, शेतकरी जागरमंच


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola mahabeej gave subsidy one farmer for 30 kg gram seed