अकोटमध्ये २० लाखांचे फटाके जप्त

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 ऑक्टोबर 2017

यासाठी झाली कारवाई
स्फोटक वस्तू ठेवताना आवश्‍यक ती काळजी घ्यावी लागते. ही काळजी कशी घ्यावी, यासंदर्भात पोलिस विभाग, जिल्हाधिकारी कार्यालयासह अग्निशमन दलालाचीही परवानगी घेणे आवश्‍यक आहे. त्यासोबतच ही सर्व'माहिती संबंधित विभागांना देऊन त्याची निगा राखण्यासाठी आवश्‍यक त्या उपाययोजना करण्याची हमी व तशी व्यवस्था केल्याचीही हमी द्यावी लागते. परंतु, रमण श्रावगी याने तशी कुठलीच कारवाई केली नसल्याची माहिती आहे.

अकोला : जिल्ह्यातील अकोट तहसील कार्यालयाजवळ लागून असलेल्या फटाकांच्या गोदामावर पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने शनिवारी रात्री छापा टाकला. या छाप्यामध्ये २० लाखांचे फटाके जप्त केले असून चौघांवर गुन्हे दाखल केला आहे. एेन दिवाळीच्या चार दिवसाआधी झालेल्या या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे.

पोलिस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख सहायक पोलिस निरीक्षक हर्षराज अळसपुरे यांना गुप्त माहिती मिळाली. या माहितीच्या आधारावर ते आपले पथक घेऊन अकोट शहरातील तहसील कार्यालयाजवळ असलेल्या नगर पालिकेच्या शाळा क्र. एकजवळील शौकत अली चौकामध्ये गेले. या चौकातील गोदामामध्ये साठवूण ठेवलेल्या २० लाख रुपयांची फटाके त्यांनी जप्त केलीत. त्यासोबतच रमण सितारा श्रावगी (५५, रा. झिंगरवाडी, गोलबाजार, अकोट), सरिता रमण श्रावगी (५०, रा. झिंगरवाडी, गोलबाजार, अकोट), दिलीप चुन्नीलाल राठोड (५८, रा. कागारपुरा, अकोट), सुहास प्रल्हाद वाघ (३४, रा. शिवाजीनगर, मोठे बारगण, अकोट) यांच्यावरही कारवाई केली आहे. या कारवाईमुळे अकोट शहरातीलच नव्हे तर ग्रामीण भागातील फटकांच्या आवाजावर निर्बंध येणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मोठ्या प्रमाणात झालेल्या या कारवाईने सर्वत्र आश्‍चर्य व्यक्त केल्या जात आहे.

विशेष म्हणजे, चार दिवसाआधी सर्वोच्च न्यायालयासह दिल्ली उच्च न्यायालयानेही दिवाळीच्या दिवशी फटाके फोडण्यावर निर्बंध लावला आहे. त्यासोबतच मुंबई उच्च न्यायालयानेही सरकारला सुचित केले आहे. त्यामुळे राज्यातीलच नव्हे तर देशातील राजकीय आतिषबाजी चांगलीच सुरू झाली होती. विशेष म्हणजे, न्यायालयांनी दिलेल्या या निर्णयांविरोधात नागरिकांमधूनच संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

चायना मांजाचीही झाली होती कारवाई
रमण श्रावगी याच्यावर विशेष पथकाने याआधीही चायना मांजा विकत असल्यावरून कारवाई केली होती. त्याच्यावरची ही जिल्ह्यातील मोठी कारवाई होती. तेव्हापासून रमण श्रावगी पोलिस त्याच्यावर ‘वॉच’ ठेऊन असल्याचे समजते. तो फटाके विक्रीचाही व्यवसाय करीत असल्याची माहिती समजताच विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांनी संपूर्ण माहिती काढल्यानंतर दुसरी कारवाई केली. 

Web Title: akola marathi news diwali crackers worth 20 lac seized