प्रदूषणमुक्त दिवाळीसाठी विद्यार्थी घेणार शपथ 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 ऑक्टोबर 2017

जिल्ह्यात १५ हजारांवर शाळा-महाविद्यालयात शपथ 
अकोला जिल्ह्यातील १५ हजारांवर शाळा व महाविद्यालयांमध्ये एकाचवेळी शपथ दिली जाणार आहे. याबाबतचे पत्र शालेय शिक्षण विभागाकडून शिक्षणाधिकारी प्राथमिक यांना ६ आॅक्टोबर रोजी प्राप्त झाले आहे.

अकोला : दिवाळी सणात मोठ्याप्रमाणावर फटाके उडविले जातात. त्यातून ध्वनी आणि वायुप्रदूषण होत असल्याने आरोग्यावर घातक परिणाम होतात. प्रदूषण नियंंत्रण मंडळाने गत काही वर्षात केलेल्या जनजागृतीमुळे फटाके उडविण्याचे प्रमाण बरेच कमी झाले आहे. तरीही विद्यार्थ्यांमध्ये व्यापक जनजागृतीची आवश्‍यकता असल्याने राज्यभरातील शाळांमध्ये १० आॅक्टोबरला सकाळी १०.१५ वाजता एकाच वेळी विद्यार्थ्यांना शपथ दिली जाणार आहे. 

दिवाळी सण आणि आतषबाजीचा आनंद लुटण्याच्या नादात पर्यावरणाला मोठी हानी पोहोचविली जाते. लहान मुलं, रूग्ण, वृद्ध यांनाही फटाक्याच्या आवाजाचा त्रास होतो. फटाक्यातील बारुदमधून निघणारे विषारी वायू हवा प्रदूषित करते. त्यातूनही मोठ्याप्रमाणावर आरोग्यावर परिणाम होतात. कधी-कधीतर डोळे जाण्यापर्यंतचे परिणाम झालेले आहेत. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिवाळी सणात फटाके उडविले जाणार नाहीत, यासाठी व्यापक जनजागृती मोहीम हाती घेतली. त्याचा सकारात्मक परिणामही दिसून आला आहे. त्यामुळे गतवर्षी फटाके उडविण्याचे प्रमाण कमी झाले होते. अद्यापही मोठ्या प्रमाणावर जनजागृतीची गरज आहे. फटाकेमुक्त दिवाळी ही संकल्पना प्रत्यक्षात राबविण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. त्याकरिता १० आॅक्टोबरला एकाचवेळी राज्यभरात विद्यार्थ्यांना प्रदूषणमुक्त दिवाळीची शपथ दिली जाणार आहे. या उपक्रमात मुख्यमंत्र्यांसह राज्यातील बहुतांश मंत्रीसुद्धा सहभागी होणार आहेत. मुबंईत त्यासाठी खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, दूरदर्शन व आकाशवाणीवरून त्याचे प्रसारण करण्यात येणार आहे. 

 

Web Title: akola marathi news pollution free diwali pledge