अकोल्याचे खासदार बनले विद्यार्थी

श्रीकांत पाचकवडे
शनिवार, 20 मे 2017

सर्वसामान्य जनतेच्या अनेक समस्या कायद्याच्या कचाट्यात अडकलेल्या असतात. त्या साेडविण्यासाठी अापल्याला कायद्याचे ज्ञान असणे अावश्यक अाहे. कायद्याच्या शिक्षणातून जनहित जाेपासण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यासाठीच हा प्रयास आहे. या ज्ञानाचा सर्वसामान्यांच्या हितासाठी उपयाेग करणार आहे.
- संजय धाेत्रे, खासदार (अकाेला)

अकाेला - वेळ दुपारी दाेनची... शहरातील सीताबाई महाविद्यालयात दाेन-तीन वाहनांचा ताफा येताे...अाणि एका गाडीतून हातात लेटर पॅड घेऊन पांढऱ्या कपड्यातील ज्येष्ठ व्यक्ती उतरताे. काहीजण पुटपूटतात, बाेर्डाची गाडी आली. पण तेवढ्यात एकाची आेळख पटते, ताे म्हणताे.. अरे हे तर आपले संजूभाऊ आहेत. ते एलएलबीचा पेपर साेडवायला आल्याचे समजताच अनेकांना आश्चर्याचा धक्का बसताे.

शिक्षण घेण्यासाठी वयाचे बंधन नसते, असे म्हटले जाते. कायद्याचे सखाेल ज्ञान घेण्यासाठी भाजपचे ज्येष्ठनेते तथा अकाेल्याचे खासदार संजय धाेत्रे एलएलबीचे शिक्षण घेत आहेत. आज एलएलबीच्या चौथ्या सेमिस्टरची परिक्षा द्यायला ते आले हाेते. राजकारणात खासदारकीत त्यांनी विजयाची हॅटट्रीक साधली आहे. त्यामुळे पक्षाचा भार सुध्दा त्यांच्याच खांद्यावर आहे.

अकाेला, वाशिम व जिल्ह्यातील रिसाेड अशा भल्या माेठ्या मतदार संघात विस्तारलेल्या लाेकसभा मतदार संघाचे नेतृत्व करतांना व्यस्त राजकारणातून ते मागील अाठ दिवसांपासून परिक्षेची तयारी करीत आहेत. शालेय जिवनात सकाळी पाच वाजता उठून अभ्यास करण्याची त्यांची जुनीच सवय.

इंजिनिअरींग करतांनाही अभ्यासाचा हाच कित्ता गिरवित ते गुणवत्ता यादीत झळकले. त्यानंतर समाजकारण अाणि राजकारणात सक्रीय झाल्याने पुढचे शिक्षण घेता अाले नाही. राजकारण करीत असतांना कायद्याची गरज लक्षात घेता एलएलबी करण्याचा निर्णय घेतला. शिकण्याची त्यांनी जिद्द साेडली नाही. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न, त्यांच्या समस्या कायद्याच्या कचाट्यात अडकत असल्याने कायद्याचे ज्ञान संपादन करून सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्याचा त्यांचा ध्यास अाहे. शनिवार (ता.२०) त्यांनी एलएलबीच्या ‘चाैथ्या प्राेफेशनल इथीक्स’ सेमीस्टरची परिक्षा दिली अाहे.

सर्वसामान्य जनतेच्या अनेक समस्या कायद्याच्या कचाट्यात अडकलेल्या असतात. त्या साेडविण्यासाठी अापल्याला कायद्याचे ज्ञान असणे अावश्यक अाहे. कायद्याच्या शिक्षणातून जनहित जाेपासण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यासाठीच हा प्रयास आहे. या ज्ञानाचा सर्वसामान्यांच्या हितासाठी उपयाेग करणार आहे.
- संजय धाेत्रे, खासदार (अकाेला)

Web Title: Akola MP Sanjay Dhotre became a student