कंटेनरची दुचाकीला धडक; दोघांचा मृत्यू

अनिल दंदी
सोमवार, 19 फेब्रुवारी 2018

"राष्ट्रीय महामार्गावर अपघातांच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत असून, भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालविल्यामुळे अपघाताच्या घटना घडतात. विशेष म्हणजे महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरु असल्याने मार्ग अरुंद झाल्याने अपघाताचे निमित्त ठरु शकते."
- विनोद ठाकरे, ठाणेदार, बाळापूर, पोलिस ठाणे.

राष्ट्रीय महामार्गावरील बाळापूर जवळील घटना

बाळापूर (अकोला) : भरधाव अज्ञात कंटेनरने समोरील दुचाकीला जोरदार धडक देवून झालेल्या अपघातात दुचाकी वरील दोघे जण जागीच ठार झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्गावर आज (सोमवार) दुपारी एक वाजताच्या सुमारास खामगांव-बाळापूर सिमेवर पिवळ्या नाल्या लगत घडली. या प्रकरणी बाळापूर पोलिसांनी अज्ञात ट्रक चालका विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

प्राप्त माहितीनुसार, अकोला माळीपूरा येथील किशोर मनोहर नांदे (35) व अजय गंगाधर माळेकर (40) हे दोघेही एम एच 30 व्ही 1400 या क्रमांकांच्या दुचाकीवरून खामगांवहून अकोल्याकडे येत होते. दुपारी एक वाजताच्या सुमारास त्यांची दुचाकी राष्ट्रीय महामार्गावरील खामगांव-बाळापूर सीमेवर पोचताच पाठिमागून भरधाव येणाऱ्या अज्ञात कंटेनरने दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यामुळे दोघेही ट्रकच्या खाली येऊन दोघांचाही मृत्यू झाला. अपघातस्थळावरून कंटेनरने पोबारा केला.

घटनेची माहीती मिळताच महामार्ग व बाळापूर पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. खामखेडचे सरपंच प्रदिप इंगळे, अश्वजीत शिरसाट, संजय उमाळे यांनी घटनास्थळी जाऊन मदत कार्य राबविले. बाळापूर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक विठ्ठल वाणी यांनी अपघातास कारणीभूत ठरलेल्या कंटेनरचा शोध घेत महामार्ग पिंजून काढला. अपघातांमुळे महामार्गावर दोन्ही बाजूची वाहतूक विस्कळीत झाली होती.

राष्ट्रीय महामार्गावरील खामगांव (ग्रामिण) व बाळापूर पोलिस ठाण्याची हद्द दर्शविणाऱ्या फलका जवळच अपघात झाल्याने कारवाई कोण करणार? असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, बाळापूर ठाणेदार विनोद ठाकरे यांनी सामंज्यस्य दाखवत मृतदेह बाळापूर ग्रामीण रुग्णालयात रवाना करण्याचे आदेश पोलिसांना दिले.

Web Title: akola news accident two dead in national highway