सोयाबीन बोनसचे घोडे नेमके अडले कुठे?

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 नोव्हेंबर 2017

पंधरवड्यापूर्वी मंजुरी आदेश अन् पालकमंत्र्यांची ग्वाही
 

अकोला : गतवर्षीपासून रखडलेल्या सात कोटींच्या सोयाबीन बोनसकरिता पंधरवड्यापूर्वी शासनाने मंजूरी दिली होती. दुसऱ्याच दिवशी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनीही शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात बोनसची रक्कम जमा होण्याची ग्वाही दिली होती. पंधरा दिवस उलटूनही पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात बोनस जमा झाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहण्याची बतावणी करणारी सरकार शेतकऱ्यांसाठी खरच अच्छे दिन आणित आहे का, अशी चर्चा आता शेतकऱ्यांमध्ये सुरू आहे. 

आॅक्टोबर २०१६ ते डिसेंबर २०१६ या कालावधीत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल २०० रुपये प्रमाणे व २५ क्विंटलच्या मर्यादेत बोनस शासनाने देऊ केले होते. त्यानुसार राज्यात पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना १०८ कोटी ६४ लाख २९ हजार व अकोला जिल्ह्यात २२ हजार ९२७ पात्र  लाभार्थ्यांना ७ कोटी ५६ लाख ४९ हजार २७४ रुपये बोनस मंजूरीचे आदेश २५ आॅक्टोबर २०१७ रोजी शासनाने पारीत केले.

याबाबत पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक गोपाल माळवे व पणन महासंघाचे जिल्हा मार्केटिंग अधिकारी बी.एस. ढाकरे यांचे उपस्थितीत आढावा बैठक घेतली. त्यामध्ये बोनसची रक्कम अकस्मात निधीतून वितरीत करण्याची तरतूद असल्याचे सांगून, लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात बोनसची रक्कम जमा केली जाणार असल्याचे जाहीर केले होते. परंतु, जिल्हा प्रशासनाकडे बोनसची रक्कम उपलब्ध झाली नसल्याने, शेतकरी अजूनही लाभापासून वंचित आहेत. त्यामुळे शेतकरी व शेतकरी संघटनांकडून रोष व्यक्त होत आहे, तसेच बोनसची रक्कम अडकली कुठे? अशी जोरदार चर्चा होत आहे.

वर्षभरापासून रखडलेल्या सोयाबीन बोनसला २५ आॅक्टोबर रोजी शासनाने मंजूरी दिली. पात्र २२ हजार ९२७ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अकस्मात निधीतून बोनसची रक्कम जमा करण्याचे आदेशही होते. आदेशाला जवळपास १५ दिवस पूर्ण होत आहेत. तरीसुद्धा बोनसची रक्कम शेतकरी तसेच जिल्हा प्रशासनाकडे का प्राप्त झाली नाही.
- प्रशांत गावंडे, शेतकरी जागर मंच, अकोला

सोयाबीन बोनसकरिता पात्र लाभार्थ्यांची माहिती
बाजार समिती     पात्र लाभार्थी     सोयाबीनचे प्रमाण (क्वि.)     बोनसची रक्कम
अकोला     १२७५९     २१२१७४     ४२४३८८००
अकोट     २७१५     ४६३१५     ९२६३०३८
तेल्हारा     १३३०     २२१७१     ४४३४२६२
बाळापूर     २४३     २८७२     ५७४४७२
बार्शीटाकळी ७१     ७७४     १५४९१०
मूर्तिजापूर     ५५२२     ९००७८     १८००९७९८
पातूर     २८७     ३८८९     ७७७९९४
एकूण     २२९२७     ३७८२४६     ७५६४९२७४

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :

    Web Title: akola news agriculture farmers soya crop bonus hindrance