अतिक्रमण निर्मुलनाच्या विषयाला सभागृहात धार्मिक रंग

akola mahapalika
akola mahapalika

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस नगरसेवकांचा सत्ताधाऱ्यांवर आरोप

अकोलाः शहरात एकीकडे अरुंद रस्त्यांमुळे वाहतुकीचा पेच निर्माण होत आहे. त्यामुळे रस्ते रुंदीकरण करण्यात येत आहे. दुसरीकडे रस्त्यावरच दुकाने थाटण्याची परवानगी व्यावसायिकांना देण्यात आल्याच्या मुद्दावरून महापौरांनी शहरातील सर्व रस्त्यांवरील अतिक्रमण काढण्याचा आदेश दिला. त्यावर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस नगरसेवकांनी महापाैरांवर थेट आरोप करीत या प्रकरणाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला.

भाजपचे गटनेते राहुल देशमुख यांनी रेल्वे स्थानक रोडवर अकोला क्रिकेट क्लब मैदानाला लागून रस्त्यावर श्‍वेटर विक्री करणाऱ्यांना परवानगी कशी देण्यात आली, हा मुद्दा उपस्थित केला. त्यालाच धरून अनिल गरड यांनी हिंदू दफनभूमीवर होत असलेल्या अतिक्रमणाचा प्रश्‍न उपस्थित केला. यात शिवसेनेचे राजेश मिश्रा यांनी उडी घेत गुलजापुरा परिसरातील अतिक्रमणाचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर महापौर विजय अग्रवाल यांनी सर्वच अतिक्रमण काढण्याबाबत आदेश दिला. त्यात शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांचाही समावेश होता. स्थायी समिती सभापती बाळ टाले यांनी शहरातील मुख्य रस्त्यांवर असलेल्या रोपवाटीकांचा प्रश्‍न उपस्थित केला. तेव्हा महापौरांना सर्व मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमण काढण्याचा आदेश देताच विरोधी पक्ष नेते साजिद खान यांनी भाजप कार्यालयात जाणारा रस्ता मोकळा करण्यासाठी वारंवार किरकोळ व्यावसायिकांवर कारवाई होत असल्याचा आरोप केला. कब्रस्तानच्या समस्यांकडे कुणी लक्ष देत नाही. गेट बंद आहे. डम्पिंग ग्राऊंडच्या कचऱ्यातून प्रेत न्यावे लागत असल्याचे सांगितले. त्यानंतर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवकांनी एकच गदारोळ सुरू केला. एमआयएमचे मो. मुस्तफा यांनी शिवसेना या मुद्द्याला धार्मिक रंग देत असल्याचा आरोप केल्याने वादविवाद सुरू झाला. त्यावर महापौरांनी ठरल्याप्रमाणे सर्व रस्त्यांवरील अतिक्रमण आठ दिवसात मोकळे करण्याचा आदेश अतिक्रमण निर्मुलन विभागाला दिला. साजिद खान पठाण यांनी किरकोळ व्यावसायिकांवर कारवाई करण्यापूर्वी त्यांना व्यवसायासाठी जागा देण्याची मागणी केली.

खड्डे बुजवा, अन्यथा आंदोलन
शहरातील रस्त्यांची स्थिती अतिशय वाईट झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या रस्त्यांची आठ दिवसात दुरुस्ती करण्यात न आल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा शिवसेना शहर प्रमुख तथा गटनेते राजेश मिश्रा यांनी सभागृहात दिला. काँग्रेस या आंदोलनाला पाठिंबा देईल, असे साजिद खान यांनी सांगितले. मंजुषा शेळके यांनी राजेश्वर मंदिरापुढील रस्त्याचा प्रश्‍न उपस्थित केला. मिश्रा यांनी जुने शहरातून बाजारपेठेत येणाऱ्या पुलासाठी पुढे रस्ता तयार करण्याकरिता तोडगा काढण्याची मागणी सभागृहात केली.

‘त्या’ कंत्राटदारावर होणार कारवाई
महिलांसोबत बोलताना अपशब्द वापरणाऱ्या कंत्राटदाराविरुद्ध कारवाईचा अहवाल पाठविण्यात आला असल्याचे महापाैरांनी सांगितले. या मुद्दा शिवसेनेचे शशिकांत चाेपडे यांनी उपस्थित केला होता.

शिक्षकांवरील कारवाईचा प्रस्ताव
मनपा शाळेत स्वतः ऐवजी नातेवाईकांना शिकविण्यासाठी पाठविणाऱ्या शिक्षक व मुख्याध्यापकांवर कारवाई करण्याचा प्रस्ताव पाठविण्याचा आदेश महापौरांनी दिला. याशिवाय नववी आणि दहावीसाठी शिक्षक का देण्यात आले नाही, असा प्रश्‍न सपना नवले यांनी उपस्थित केला. मात्र, शिक्षणाधिकारी उपस्थित नसल्याने त्यावर कुणीही उत्तर दिले नाही.

आरोग्य केंद्राचे स्थलांतर
डाबकी रोडसाठी मंजूर झालेल्या नवीन आरोग्य केंद्राचा कारभार कस्तुरबा गांधी रुग्णालयातून पोलिस वसाहत ब्रम्हांडनायक सोसायटी सभागृहात स्थलांतरित करण्यास सभागृहाने मंजुरी दिली. हा विषय नगरसेवक तुषार भिरड यांनी मांडला होता. पूर्व झोनमधील आरोग्य केंद्र मोठी उमरी परिसरात स्थलांतरीत करण्यासही सभागृहाने मंजुरी दिली. शहरात १० आरोग्य केंद्र मंजूर झाले आहेत.

प्रा. संजय खडसे यांनी सांभाळली बाजू
मनपा आयुक्त अजय लहाने यांची बदली झाली. प्रभार जिल्हाधिकाऱ्यांकडे असताना ते सुटीवर गेले. त्यांचा प्रभार सीईओंकडे. उपायुक्त लाच प्रकरणात अडकले. अतिरिक्त आयुक्त सुटीवर. अशा परिस्थितीत गुरुवारी होणाऱ्या सभेत आयुक्त पदाची जबाबदारी कुणाकडे सोपविणार हा उत्सुकतेचा विषय होता. अखेर उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्याकडे हा प्रभार सोपविण्यात आला. त्यांनी सभेत सक्षमपणे बाजू सांभाळली.

या विषयांवरही झाली चर्चा
० प्रभाग तेरामधील आरक्षित जागा नागरिकांच्या वापरासाठी हस्तांतरीत करण्याची मागणी आशीष पवित्रकार यांनी केली. हा विषय मंजूर झाला.
० डीपीसीमधून २०१८-१९ या वर्षाकरिता दलित्तेतर सुधार योजना आणि नगरोत्थनसाठी प्रत्येकी १५ कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर करण्यास मंजुरी.
० दलित वस्ती सुधार योजनेसाठी मिळालेल्या निधीतून कामांचे लोकसंख्यानिहाय प्रभागात वितरण करण्यास मंजुरी दिली.
० छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाच्या सौंदर्यिकरणाचे काम पुढे सुरू करण्यात यावे. तेरावा वित्त आयोगातील निधी संपला व चौदाव्या वित्त आयोगातील निधी शासनाने अमृत योजनेसाठी परस्पर वळविल्यामुळे निविदा प्रक्रिया पूर्ण होऊनही हे काम मार्गी लागू शकले नाही.
० अमृत योजनेतील पाणीपुरवठ्याच्या कामाचे कार्यरंभ आदेश देण्यात आले. भूमिगत गटार योजनेचे आदेश देण्याबाबत प्रक्रिया सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com