अनुदाना अभावी रखडली पशुगणना! 

अनुप ताले
शनिवार, 19 ऑगस्ट 2017

२०१२ च्या पशुगणनेनुसार जिल्ह्यातील पशुसंख्या 
तालुका पशुसंख्या (कुक्कुट वर्गीयसह) 
अकोला १,२५,२५० 
अकोट ६३,७४८ 
बाळापूर ५७,४३३ 
बार्शीटाकळी ८४,७८४ 
मूर्तिजापूर ६२,४५७ 
पातूर ५३,३३६ 
तेल्हारा ६२,२६४ 
एकूण ५,१४,२७२

अकोला : सन २०१२ नंतर देशामध्ये सर्वच राज्यात जुलै २०१७ मध्ये पंचवार्षीक पशुगणना होणे अपेक्षीत होते. मात्र, केंद्राचे अनुदान आणि पशुगणनेचे निर्देश पशुसंवर्धन प्रशासनाला प्राप्त झाले नसल्याने, आॅगस्ट संपत आला असूनही पशुगणना झाली नाही. महत्त्वाचे म्हणजे, या पाच वर्षात झालेली महागाई, व यांत्रिकीकरणामुळे मोठ्या प्रमाणात पशुसंख्या रोडावल्याची शक्यता आहे. 

देशातील पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकसीत व्हावा तसेच शेतकऱ्यांना या व्यवसायातून आर्थिक स्थैर्य मिळावे, याकरिता शासनाकडून वेळोवेळी विविध योजना व अनुदान स्वरुपात उपक्रम राबविले जातात. त्याकरिता दर पाचवर्षांनी पशुगणना केली जाते. त्यानुसार या योजना, उपक्रमांची आखणी केली जाते. देशात ही पंचवार्षिक पशुगणना एकाच वेळी सर्व राज्यात गाव पातळीवर केली जाते. मागील पशुगणना जुलै २०१२ मध्ये झाली होती. त्यानुसार अकोल्यात देशी, संकरित पाळीव, नर-मादी अशी पाच लाख १४ हजार २७२ पशुंची नोंदणी झाली होती. परंतु, या पाच वर्षात सर्वच स्थरावर महागाईने उचांक गाठल्याने, पशूखाद्य व संगोपनाचा खर्चही प्रचंड वाढला आहे. त्याप्रमाणात दुध उत्पादन किंवा त्यामधून लाभदायी आर्थिक मोबदला प्राप्त होत नाही. म्हणून, शेतकरी केवळ भरपूर दुध देणाऱ्या पशूंच्या संगोपनावरच भर देत आहते. तसेच शेतीमध्ये पशुंएेवजी यात्रिक वापरावर भर दिला जात असल्याने, बैलांची आवश्यकता कमी झाली आहे. त्यामुळे होणाऱ्या पशुगणनेतून मोठ्या प्रमाणात पशुसंख्या रोडावल्याचे दिसून येऊ शकते. 

केंद्राचे अनुदान मिळताच महाराष्ट्रासह सर्व राज्यात पंचवार्षिक पशुगणना करण्यात येईल. त्याकरिता आम्ही सर्व तयारी पूर्ण केली असून, जवळपास ९ हजाराहून अधिक प्रगणकांची नेमणूक निश्चित केली आहे. अद्यापर्यंत केंद्राकडून निर्देश प्राप्त झाले नसल्याने, पशुगणना सुरू झाली नाही. याबाबत २७, २८ आॅगस्ट रोजी दिल्ली येथे केंद्राची बैठक होणार आहे. शेतकरी केवळ दुधाळ व संकरीत पशुसंगोपनावर भर देत आहेत. त्यामुळे १० ते १५ एेवजी दोन संकरित गाई किंवा म्हशी पाळल्या जात आहेत. तसेच यात्रिकीकरणसुद्धा वाढले आहे, त्यामुळे पशुसंख्या रोडावण्याची शक्यता नाकारता येत नाही. 
- डॉ. जी.पी. राणे, अतिरीक्त पशुसंवर्धन आयुक्त, पूणे 

२०१२ च्या पशुगणनेनुसार जिल्ह्यातील पशुसंख्या 
तालुका पशुसंख्या (कुक्कुट वर्गीयसह) 
अकोला १,२५,२५० 
अकोट ६३,७४८ 
बाळापूर ५७,४३३ 
बार्शीटाकळी ८४,७८४ 
मूर्तिजापूर ६२,४५७ 
पातूर ५३,३३६ 
तेल्हारा ६२,२६४ 
एकूण ५,१४,२७२

Web Title: Akola news animal counting