बच्चू कडू यांच्याविरोधात भाजपची पोलिसांत तक्रार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 जून 2017

भगतसिंह यांनी ब्रिटीशांवर जसा बॉम्ब टाकला. तसा बॉम्ब आम्ही मुख्यमंत्र्यांच्या घरावर टाकू' असे खळबळजनक विधान आमदार बच्चू कडू यांनी केले आहे.

अकोला : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरावर बॉम्ब टाकण्याची धमकी देणारे आमदार बच्चू कडू यांच्याविरोधात भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी अमरावती जिल्ह्यातील बडनेरा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. या तक्रारीनंतर आता भाजप विरुद्ध प्रहार संघटना असा सामना रंगण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. 

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी भाजप सरकारविरोधात प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी आंदोलनाचा एल्गार पुकारला आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्यावर बोलताना 'आमच्यात शेतकरी मायबापाचं रक्त आहे. भगतसिंह यांनी ब्रिटीशांवर जसा बॉम्ब टाकला. तसा बॉम्ब आम्ही मुख्यमंत्र्यांच्या घरावर टाकू' असे खळबळजनक विधान आमदार बच्चू कडू यांनी केले आहे.

त्यांच्या या विधानावर भाजपने आक्रमक भूमिका घेत थेट आता कायद्याची लढाई सुरू केली आहे. आमदार कडू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरावर बॉम्ब टाकण्याची धमकी दिली आहे. बच्चू कडू यांच्या या दहशतवादी मानसिकतेविरोधात गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करावी, अशी तक्रार भाजप प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी, भाजपचे अमरावती महानगराध्यक्ष जयंत डेहणकर यांच्या नेतृत्वात बडनेरा पोलिसांकडे नोंदवण्यात आली आहे. 

Web Title: akola news Bacchu Kadu booked by bjp in amravati police