अकोला: जिल्‍ह्यात पाच ठिकाणी कापूस खरेदीला प्रारंभ 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 ऑक्टोबर 2017

दोन ठिकाणी उडीद-मूग खरेदी 
जिल्ह्यात हमीभावाने उडीद आणि मूग खरेदीसाठीचे चारही केंद्र सुरू झाले आहेत. यापूर्वी तेल्हारा आणि अकोला येथे हमीदराने नाफेडचे केंद्र सुरू झाले होते. बुधवारी मूर्तिजापूर आणि अकोट येथे हमीदराने उडीद-मुगाच्या खरेदीला सुरुवात झाली आहे.  

अकोला : जिल्ह्यात कापूस खरेदीला पाच केंद्रांवर बुधवारपासून (ता.२५) सुरुवात झाली. जिल्ह्यात कानशिवणी आणि अकोला येथे कॉटन फेडरेशनतर्फे कर अकोला, तेल्हारा आणि मूर्तिजापूर येथे सीसीआयतर्फे कापूस खरेदी केली जात आहे. पहिल्याच दिवशी कापला ४३६० रुपये प्रती क्विंटल दर मिळाला. 

कापूस खरेदीबाबत सीसीआयसोबत पणन महासंघाने सोमवारी करार केला. त्यानुसार बुधवारपासून कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याचे आदेश राज्य सरकारने पणन महासंघाला दिले होते. त्यानुसार आजपासून जिल्ह्यात पाच ठिकाणी हमी भावाने कापूस खरेदीला सुरुवात झाली. कापसाच्या वाणानुसार हमीभाव निश्‍चित करण्यात आलेला आहे. यामध्ये बन्नी व ब्रह्म या जातीला ४ हजार २२0 रुपये प्रतिक्विंटल, तर एच-४, एच-६ ला ४ हजार २२0 व एलआरए ५१६६ या जातीला ४ हजार १२0 रुपये हमीभाव राहणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, अकोला तालुक्यातील दोन्ही केंद्रांवर पहिल्या दिवशी प्रति क्विंटल ४३६० रुपये दर शेतकऱ्यांना मिळाला. यंदाच्या हंगामात पेरणीपासून पावसाची तूट असल्यामुळे कपाशीची पेरणी उशिरा झाली. त्यामुळे जिल्ह्यात अपेक्षित उद्दिष्टाच्या ९० टक्केच कापूस पेरणी झाली. जिल्ह्यात जवळपास एक लाख ३० हजार हेक्टरवर कापसाची पेरणी झाली आहे. 

आॅनलाइन नोंदणीनंतरच खरेदी 
कापसाच्या विक्रीपूर्व बाजार समित्यांमध्ये ऑनलाइन नोंदणी करावी लागणार आहे. यासाठी सात-बारा उतारा, बँक खाते क्रमांक व आधार क्रमांक द्यावा लागणार आहे. त्याशिवाय शेतकऱ्यांच्या कापसाची खरेदी होणार नाही. यापूर्वी शेतकऱ्यांना केवळ सात-बारा द्यावा लागत होता; परंतु आता ऑनलाइन नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे. 

कापसाला बोनस मिळण्याची अपेक्षा 
गुजरात सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना कापसाला ५00 रुपये बोनस जाहीर केला आहे. ते बघता महाराष्ट्रातही किमान एक हजार रुपये बोनस सरकारने जाहीर करावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. सध्या कापसाला बाजार मिळणारा दर आणि उत्पादनावर होणारा खर्च बघता बोनस जाहीर न झाल्यास राज्यातील कापूस उत्पादन ठप्प होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

दोन ठिकाणी उडीद-मूग खरेदी 
जिल्ह्यात हमीभावाने उडीद आणि मूग खरेदीसाठीचे चारही केंद्र सुरू झाले आहेत. यापूर्वी तेल्हारा आणि अकोला येथे हमीदराने नाफेडचे केंद्र सुरू झाले होते. बुधवारी मूर्तिजापूर आणि अकोट येथे हमीदराने उडीद-मुगाच्या खरेदीला सुरुवात झाली आहे.  

Web Title: Akola news cotton purchase in Akola