अकोला ठरतोय आत्महत्यांचा जिल्हा

योगेश फरपट
बुधवार, 30 ऑगस्ट 2017

अकोला - जिल्ह्यात सर्वाधिक शेततळ्यांची निर्मिती झाल्याने अकोल्याची ओळख शेततळ्यांचा जिल्हा, अशी झाल्याचा दावा राजकारण्यांनी केला होता. मात्र, आज त्याच जिल्ह्याची ओळख सर्वाधिक शेतकरी आत्महत्यांचा जिल्हा, अशी झाली आहे. चालू वर्षात ११०; तर गेल्या १७ वर्षांत एक हजार ९६१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे वास्तव आहे. 

अकोला - जिल्ह्यात सर्वाधिक शेततळ्यांची निर्मिती झाल्याने अकोल्याची ओळख शेततळ्यांचा जिल्हा, अशी झाल्याचा दावा राजकारण्यांनी केला होता. मात्र, आज त्याच जिल्ह्याची ओळख सर्वाधिक शेतकरी आत्महत्यांचा जिल्हा, अशी झाली आहे. चालू वर्षात ११०; तर गेल्या १७ वर्षांत एक हजार ९६१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे वास्तव आहे. 

देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा समजल्या जाणाऱ्या शेतीत राबणाऱ्या शेतकऱ्यांची काही वर्षांपासून दैनावस्था झाली आहे. निसर्गाचा लहरीपणा आणि सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांमुळे शेतीत काबाडकष्ट करूनही कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी पेलू न शकणारा बळिराजा नैराश्‍यग्रस्त होऊन आत्महत्येकडे वळत आहे. सरकारने जाहीर केलेले पॅकेज आणि योजना शेतकरी आत्महत्या थांबवण्यात निकामी ठरत आहे. 

अकोला जिल्ह्यात तत्कालीन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी मोठा गाजावाजा करीत ‘मिशन दिलासा’ हा अभिनव उपक्रम सुरू केला. सुरवातीच्या काळात लोकसहभागातून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांसाठी, तसेच नैराश्‍यग्रस्त शेतकऱ्यांसाठी रोजगाराची साधने उपलब्ध करून देण्यात आली. मात्र, त्यांच्या बदलीनंतर ‘नवा गडी नवा राज’प्रमाणे प्रशासनाने या उपक्रमाच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबवण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचे जिल्ह्यातील आत्महत्यांच्या आकडेवारीवरून दिसून येते.

शेततळ्यांचा जिल्ह्याची बदलली आेळख
मुख्यमंत्र्यांच्या ड्रीम प्राेजेक्ट असलेल्या जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत जिल्ह्यात जलयुक्त शिवारची चांगली कामे झाली. अकाेला, अकाेट, पातूर, मूर्तिजापूर या तालुक्यात सर्वाधिक शेततळी, सिमेंट बंधारे बांधण्यात आले. त्यामुळे या परिसरात २०१६-१७ मध्ये जास्तीत जास्त जलसाठा उपलब्ध हाेऊन मागील वर्षी पीक चांगलेही झाले. त्यामुळे अकाेल्यात पार पडलेल्या एका कार्यक्रमात खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच शेततळ्यांचा जिल्हा म्हणून अकाेल्याचा उल्लेख केला हाेता. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांनी ही आेळख मात्र पुसली जात आहे.

Web Title: akola news farmer suicide