सरपंचपदाबाबत राजकीय पक्षांचे दावे, प्रतिदावे

अनुप ताले
मंगळवार, 10 ऑक्टोबर 2017

भाजप, शिवसेना, कॉँग्रेसकडून सर्वाधिक जागा मिळाल्याचा दावा

अकोला : जिल्ह्यात झालेल्या २७२ ग्रामपंचायतीचे निवडणूक निकाल सोमवारी जाहीर झाले. मतदानापर्यंत पक्षविरहित असलेली ही निवडणूक निकालानंतर मात्र राजकीय पक्षांकडून ‘हायजॅक’ होताना दिसत आहे. थेट सरपंच निवडीमुळे जिल्ह्यातील राजकीय पक्षांनी घवघवीत यश मिळाल्याचा दावा केला आहे. त्यातही काँग्रेस, भाजप, शिवसेनेकडून सर्वाधिक जागांवर विजयी झाल्याचा दावा केला जात असून, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारिप-बमसंनेही पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या प्रमाणावर सरपंच निवडून आल्याचा दावा केला आहे.

जिल्ह्यातील ५४२ ग्रामपंचायतींपैकी अर्धापेक्षा अधिक म्हणजे २७२ ग्रामपंचायतीसाठी ८ ऑक्टोबर रोजी मतदान झाले. सोमवारी मतमोजणी आटोपली. प्रथमच सरपंच थेट जनतेतून निवडून देण्यात आले. त्यामुळे या निवडणुकीकडे नागरिकांसोबतच राजकीय वर्तुळाचेही लक्ष लागले होते. प्रत्यक्षात मात्र मतदानाच्या दिवसापर्यंत कोणत्याही राजकीय पक्षांनी त्यांचे किती उमेदवार आणि कोणत्या ग्रामपंचायतसाठी उभे आहेत, याबाबत दावा केला नव्हता. निवडणूक आयोगाने सरपंच निवडणूक राजकीय पक्षावर लढता येणार नाही, हे स्पष्ट केले असल्याने तसा दावाही कुणाला करता येणे शक्य नव्हते. 

सोमवारी निकालानंतर मात्र निवडून आलेल्या सरपंचांवर सर्वच राजकीय पक्षांनी दावे करण्यास सुरुवात केली. यात भाजप व काँग्रेस एक पाऊल पुढेच होते. भाजपने जिल्ह्यातील १४६ जागांवर पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सरपंच निवडून आल्याचा दावा केला आहे. तसा अहवालच प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांकडे पाठविण्यात आला. भाजपचा हा दावा शिवसेनेने खोडला आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: akola news gram panchayat elections sarpanch politics