जगातील कोणतीही गोष्ट अशक्‍य नाही; UPSC उत्तीर्ण नेहाचा कानमंत्र

योगेश फरपट
गुरुवार, 8 जून 2017

मनात जिद्द आणि आत्मविश्वास असेल आणि एखादी गोष्ट करायचं ठरवलं तर परीक्षाच काय जगातील कोणतीच गोष्ट अशक्‍य नाही. स्पर्धा परीक्षेच्या यशासाठी हुशारी महत्वाची नसून मेहनत गरजेची असते. त्यामुळे स्पर्धा परीक्षेचा सामना धैर्याने करा यश तुमचेच आहे, असे नुकतीच युपीएससी परिक्षा उत्तीर्ण झालेल्या नेहा देवीसिंग राठोडने सांगितले.

अकोला - मनात जिद्द आणि आत्मविश्वास असेल आणि एखादी गोष्ट करायचं ठरवलं तर परीक्षाच काय जगातील कोणतीच गोष्ट अशक्‍य नाही. स्पर्धा परीक्षेच्या यशासाठी हुशारी महत्वाची नसून मेहनत गरजेची असते. त्यामुळे स्पर्धा परीक्षेचा सामना धैर्याने करा यश तुमचेच आहे, असे नुकतीच युपीएससी परिक्षा उत्तीर्ण झालेल्या नेहा देवीसिंग राठोडने सांगितले.

नेहा हिंगणे या जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्‍यातील आहे. तिने युपीएससीच्या परीक्षेत ऑल इंडिया 702 रॅंक मिळवली. वडील देवीसिंग राठोड हे पाटबंधारे विभागात अभियंता म्हणून कार्यरत आहेत. बुलडाणा तालुक्‍यातील पळसखेड हे आईचे माहेर आहे. लहानपणी आजी आजोबांकडे जायची तेव्हा आजींकडून नैतिक मूल्यांवर आधारित गोष्टी ऐकत असल्याचे तिने सांगितले. आईवडीलांनी मला "तू हे कर, तू ते कर', असे कधी सांगितले नाही, असे नेहा म्हणाली. "पालकांनी योग्य दिशा दाखवली मात्र कधी आपले विचार लादले नाहीत. त्यामुळे मी स्वच्छंदपणे जगत शाळा, महाविद्यालयात चांगले गुण मिळविले. लहानपणी नातेवाईक व वडिलांकडून सिव्हिल सर्व्हिसेसबाबत बरेचदा चर्चा होत होती. त्यामुळे अधिकारी पदाबाबत आकर्षण होतेच. प्राथमिक शिक्षण राज्यात विविध ठिकाणी झाले असले तरी बारावीत विज्ञान शाखा निवडली. त्यानंतर इंजिनिअरिंग फिल्ड निवडले. 2013 मध्ये बीटेक केल्यानंतर खऱ्या अर्थाने युपीएससीची तयारी सुरू केली', अशी नेहाने सांगितले. "सुरवातीला योग्य दिशा मिळावी म्हणून काही दिवस पुण्यात क्‍लास लावला. पण त्यानंतर दिल्लीत जावून युपीएससीची जोमाने तयार केली. युपीएससी उत्तीर्ण व्हायला एक दोन वर्षे उशिर झाला असला तरी मी युपीएससी उत्तीर्ण झाल्याचे समाधान आहे. प्रयत्न केल्यास कोणतीही गोष्ट अशक्‍य नाही. आपली इच्छाशक्ती जर प्रबळ असेल तर जगातील कोणतीही गोष्ट कठीण नाही', असा संदेश नेहाने दिला. "भविष्यात मिळालेल्या संस्काराच्या आधारावर निश्‍चित समाजासाठी चांगले काम करेल' असेही नेहाने सांगितले.

विद्यार्थ्यांना संदेश शिक्षणाचा उपयोग हा प्रत्येक परिस्थितीचा सामना करण्यासाठी व्हायला पाहिजे. कठीण प्रसंगात धैर्याने सामना करा. एखाद्यावेळी अपयश आलेतरी निराश होवू नका. पुढचा प्रयत्न करा नक्की यशस्वी व्हाल असे सांगत "हिंमत ठेवा, यश तुमचेच' आहे, असा विश्वास युपीएससी उत्तीर्ण झालेल्या नेहा राठोड यांनी व्यक्त केला.

नेहाने सांगितलेले यशाचे गमक

  • ध्येयाची निवड
  • वेळेचे नियोजन
  • मेहनत करण्याची तयारी
  • प्रचंड आत्मविश्वास
Web Title: akola news marathi news breaking news neha rathod