पालकमंत्र्यांना कंटाळून अधिकाऱ्याला हवी स्वेच्छानिवृत्ती

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 फेब्रुवारी 2018

अकोला (जि. अकोला) - बांधकाम विभागाच्या एका निविदा प्रकरणात जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवर दबावतंत्राचा वापर करून निविदा मंजूर करण्यासाठी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दबाव आणल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणात पालकमंत्र्यांनी जनता दरबारात जाहीर अपमान करून एखाद्या प्रकरणात अडकविण्याची धमकी दिल्याने अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार यांनी ग्रामविकास मंत्रालयाच्या प्रधान सचिवांना पत्र देऊन स्वेच्छानिवृत्ती मंजूर करण्याची मागणी केली आहे.

जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील एका निविदा प्रकरणात पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार यांच्यावर दबाव आणत निविदा मंजूर करण्यासाठी दबाव टाकला. मात्र, अशा प्रकारे निविदा मंजूर करणे नियमबाह्य होईल असे पालकमंत्र्यांना सविनियपूर्वक निदर्शनात आणून दिल्यावर त्यांनी चिडून सोमवारी (ता.12) जनता दरबारात असंसदीय व अपमानास्पद भाषेत बोलून जाहीर अपमान केल्याची तक्रार डॉ. पवार यांनी ग्रामविकास मंत्रालयाच्या प्रधान सचिवांकडे केली आहे "राज्याचा गृह राज्यमंत्री आहे, तुम्हाला कोणत्या प्रकरणात कसे अडकवायचे ते पाहतो, तुम्ही शासनाची नौकरी कशाला करता,' अशी धमकी डॉ. रणजित पाटील यांनी दिल्याचे डॉ. सुभाष पवार यांनी म्हटले आहे.

'पाटील यांनी दिलेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे माझ्यावर प्रचंड मानसिक दडपण आले असून माझे मानसिक खच्चीकरण झाले आहे. त्यामुळे यापुढे शासकीय सेवा करण्यास मी इच्छुक नसून आपली स्वेच्छा निवृत्ती मंजूर करावी,' अशी विनंती त्यांनी प्रधान सचिवांना दिलेल्या तक्रारीत केली आहे.

Web Title: akola news vidarbha news ranajit patil officer retirement