यशवंत सिन्हांसह शेकडो शेतकरी स्थानबद्ध

यशवंत सिन्हांसह शेकडो शेतकरी स्थानबद्ध
यशवंत सिन्हांसह शेकडो शेतकरी स्थानबद्ध

शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर अकोला येथे आंदोलन; जिल्हाधिकारी कार्यालयापुढे ठिय्या

अकोलाः शेतकरी जागर मंचच्या झेंड्याखाली अकोला येथे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांच्यासह शेकडो शेतकऱ्यांनी आज (सोमवार) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून ठिय्या दिला. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलनावर ठाम राहण्याचा निर्धार केल्यामुळे सायंकाळी ५.१५ वाजताच्या सुमारास सिन्हा यांच्यासह शेकडो शेतकऱ्यांवर पोलिसांनी स्थानबद्धतेची कारवाई करीत त्यांना पोलिस मुख्यालयात नेले.

शेतकरी जागर मंचच्या वतीने अकोला येथे रविवारी (ता.३) कापूस-सोयाबीन-धान (कासोधा) परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेतच यशवंत सिन्हा यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. मोर्चानंतर तेथेच ठिय्या देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सोमवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास गांधी-जवाहर बागेतून यशवंत सिन्हा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचल्यानंतर सिन्हा आणि तुपकरांसह काही शेतकऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी चर्चेसाठी बोलावले होते. मात्र, त्यांनी रस्त्यावरच ठिय्या देत जिल्हाधिकाऱ्यांना चर्चेसाठी बाहेर बोलाविले. दुपारी ४ वाजताच्या सुमारास जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, पोलिस अधीक्षक राकेश कलासागर यांनी बाहेर येऊन मोर्चेकरांशी चर्चा केली. त्यांच्या मागण्यांबाबत माहिती दिली. कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात जमा होण्यास सुरुवात झाली असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. उर्वरित मागण्या या धोरणात्मक असल्याने जिल्हा प्रशासनाच्या स्तरावर सोडविता येणार नाही, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्यावर मोर्चकरांचे समाधान न झाल्याने यशवंत सिन्हा यांनी आंदोलन पुढे सुरू ठेवण्याचा निर्णय घेत प्रशासनाला सायंकाळी ५ वाजेपर्यंत मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून निर्णय घेण्याची वेळ दिली. या वेळेत कोणताही निर्णय झाला नाही. अखेर ५.१५ वाजताच्या सुमारास पोलिसांनी यशवंत सिन्हा, रविकांत तुपकर यांच्यासह शेकडो शेतकऱ्यांना ताब्यात घेवून त्यांना पोलिस मुख्यालयात स्थानबद्ध केले. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या शेतकरी नेत्यांमध्ये यशवंत सिन्हा आणि रविकांत तुपकर यांच्यासह जगदीश मुरुमकार, मनोज तायडे, प्रशांत गावंडे, कृष्णा अंधारे, गजानन अमदाबादकर, सै. वासिफ, विजय देशमुख, ज्ञानेश्वर सुलताने, दिलीप मोहोड, सम्राट डोंगरदिवे, धनंयज मिश्रा, अविनाश नाकट, विलास ताथोड, शिवाजी म्हैसने, शेख शाबीर आदींसह बहुसंख्य शेतकऱ्यांचा समावेश होता.

आंदोलनाची धग ग्रामीण भागात
यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या शेतकरी आंदोलनाची धग अकोला जिल्ह्यातील ग्रामीण भागातही पोहोचली. मूर्तिजापूर येथे शेतकरी संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष सुरेश जोगडे यांच्या नेतृत्त्वात रास्ता रोको करण्यात आला. टायर जाळून राष्ट्रीय महामार्ग अडविण्याचा प्रयत्न झाला. याशिवाय कुरणखेड, चोहट्टा बाजार, बोरगाव मंजू, निंबा फाटा येथे शेतकरी रस्त्यावर उतरले.

जिल्हाधिकाऱ्यांचा सविस्तर खुलासा
शेतकरी जागर मंचच्या आंदोलनादरम्यान करण्यात आलेल्या मागण्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचा सविस्तर खुलासा जागर मंचच्या अध्याक्षांकडे सोपविला. त्यात योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्‍वासन देण्यात आले. मात्र, त्यावर आंदोलकांचे समाधान झाले नाही.

या मागण्यांसाठी केले आंदोलन
१) नाफेडचे सर्व नियम विनाविलंब बदलावे व सरसकट शेतकऱ्यांचे सर्व उत्पादन हमीभावाने खरेदी करावे.
२) सर्व धान्यांकरिता भावांतराची योजना तत्काळ लागू करावी
३) बोंडअळीमुळे नुकसान झालेल्या क्षेत्राचे ताबडतोब सर्वेक्षणाचे आदेश देऊन, सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी.
४) शेतकऱ्यांचे वीजबिल मागे घेऊन, वीजजोडण्या न तोडण्याचे आदेश पारित करावे.
५) पीकविम्यासंदर्भात विमा कंपनी, शेतकरी जागर मंच व इतर सर्व शेतकरी संघटनांनी एकत्रित बसून, सर्वसामान्य तोडगा काढावा.
६) जिल्हा विनाविलंब दुष्काळग्रस्त जाहीर करावा. मागील तीन वर्षांत केलेल्या आर्थिक मदतीच्या घोषणा पूर्ण कराव्या. दुष्काळग्रस्त गावांना जाहीर केलेले दुष्काळी अनुदान त्वरित अदा करावे.
७) सोनेतारण कर्जाच्या माफीसंदर्भात उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाने आदेशित केल्याप्रमाणे सरकारने विनाविलंब नवीन शासनादेश पारित करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा.
८) कोणत्याही अटी न लावता ३० जून २०१७ पर्यंतचे थकलेले शेतकऱ्यांचे सर्व प्रकारचे कर्ज माफ करावे. फसव्या कर्जमाफीला शासनाने दिलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव बदलावे.
९) विविध प्रवर्गातील शेतकऱ्यांच्या मुलांचे मागील तीन वर्षांपासून देय असलेल्या शिष्यवृत्ती राज्य सरकारने तात्काळ वितरित कराव्यात.

शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर शासनाकडून गांभीर्याने विचार झाला नाही. आता रस्त्यावर उतरून मागण्या मान्य करून घेण्याची वेळ आली आहे. मागण्या मान्य झाल्याशिवाय माघार नाही.
- रविकांत तुपकर, स्वाभिमानी शेतकरी संघटना

आंदोलकांना मुंबई पोलिस कायद्यानुसार स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई करून त्यांना सोडून देण्यात येईल.
- राकेश कलासागर, पोलिस अधीक्षक, अकोला जिल्हा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com