राज्यातील हे दुसऱ्या क्रमांकाचे प्रदूषित शहर

विवेक मेतकर
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

- अकोला शहराची हवा होतेय ‘विषारी’
- उपाययोजनांच्या ठावठिकाणा नाही
- नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परीणाम
- ऑक्सिजन पार्कही अपुरेच

अकोला  ः केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाची देशातील सर्वात प्रदूषित शहरांची यादी प्रकाशित होऊन वर्ष झाले. नंतर ‘शुध्द हवा संकल्प मिशन २०२२’ यामध्ये अकोला शहराचा राज्यात सर्वात प्रदूषित दुसरे शहर म्हणून ओळख अधोरेखित झाली. मात्र, एक-दोन ऑक्सिजन पार्कशिवाय आतापर्यंत कूठल्याही ठोस उपाययोजना करण्यात आल्या नसल्याचे विदारक चित्र आहे.
शहरातील विविध भागात रस्ता दुरूस्ती व निर्मितीचे बऱ्याच दिवसापासून असल्याने प्रदूषणात आणखी वाढ होत आहे. त्याच बरोबर वाहनांमधून सोडले जाणारे कार्बन मोनॉक्साइड, हायड्रोकार्बन्स, नायट्रोजन ऑक्साइड या घटकांमुळे प्रदूषणाची तीव्रता वाढत आहे. धुलीकणांचा सामना करण्यासाठी चेहऱ्यावर मास्क लावले तरी त्यातूनही आरपार जाऊन शरीरात प्रवेश करण्याची क्षमता त्यात असल्याने ही समस्या भविष्यात मोठे भयानक स्वरुप धारण करण्याची शक्यता आहे. एकंदरीतच खराब रस्ते आणि इंधनाचे ज्वलन त्यासोबतच धूलिकणांच्या प्रदूषणानामुळे अकोलेकरांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याचे चित्र आहे.

आरोग्य धोक्यात
अ‍ॅलर्जी, दमा, खोकला, श्वासोच्छवासाचे विकार असे तात्पुरते आजार बळावतात. विशेषत: ऋतू बदलताना हा परिणाम जाणवतो. हे तात्कालिक आजार असतात, पण सतत प्रदूषित हवेत काम करणाऱ्यांच्या फुप्फुसांवर परिणाम होतो. फुप्फुसांची ताकद कमी होते, फुप्फुसाचे गंभीर विकार होतात आणि क्षयरोग बळावण्याची शक्यता असते.

घरही असुरक्षीत
प्रत्येकाला आपलं घर अतिशय सुरक्षित वाटतं. पण, घरामध्ये असलेले डास हाकलवायचे कॉईल, झुरळ मारायची औषधी, एअर फ्रेशनर या सगळ्यामुळेही प्रदूषण होते. या सगळ्याची माहिती लोकांना देणं, त्यांना जागरूक करणं हेही आवश्यक आहे. मात्र, नेहमी धोक्याची पातळी उलटून गेल्यावरच उपाययोजना केली जातात, माहिती दिली जाते, सर्वेक्षण केली जातात. पण, त्याची आवश्यकता पहिल्या पायरीपासून असते हे समजण्याची वेळ आता अकोलेकरांवर आली आहे.

राजकीय इच्छाशक्तीचा अभाव
आतापर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाच्या अजेंड्यावर हवेच्या गुणवत्तेचा उल्लेख होताना दिसत नाही. इतका हा विषय दुर्लक्षित झाला आहे. एक्यूआयमुळे कुठे, किती प्रदूषण आहे हे लोकांना समजेल. ब्रॉन्कायटिस, श्वसनाचे आजार, दम्याचे अ‍ॅटॅक ही प्रदूषणामुळे होणाऱ्या आजारांची प्राथमिक लक्षणे आहेत. फुप्फुसामध्ये गेलेला एकही प्रदूषित कण उलट मार्गे येऊ शकत नाही. मात्र, याचे गांभीर्य राज्यकर्त्यांनाही दिसत नाही.

अपुरे ऑक्सिजन पार्क
शहरात जेमतेम दोन-तीन ठिकाणी संस्थांनी ऑक्सिजन पार्कची निर्मिती केली आहे. यामुळे अकोलेकरांना नक्कीच फायदा होईल. परंतु लोकसंख्येच्या तुलनेत ते ही अपुरे आहेत. ऑक्सिजन पार्कची आवश्यकता समजून घेत असताना बराच काळ लोटून जाईल. तेव्हा मात्र, वेळ गेलेली असेल. त्यासाठी वेळीच शहरात वेगवेगळ्या ठिकाणी ऑक्सिजन पार्क उभारणे गरजेचे आहे. 

रामबाण औषध तुळस
तुळस हे भारतातील एक पवित्र आणि औषधी गुणांनी भरलेले एक बहुपयोगी रोपटे आहे. धार्मिक दृष्ट्या जेवढे तुळशीचे महत्त्व आहे, त्याहून कित्येक पटीने वैज्ञानिक दृष्ट्या तुळस लाभदायक आहे. प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी झाडे लावण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, इतर झाडांच्या तुलनेत तुळस ही दिवसातले वीस तास ऑक्सिजन हवेत सोडत असल्याने तुळस हा अकोल्याच्या विषारी हवेला नियंत्रणात आणण्यासाठी रामबाण उपाय ठरू शकतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola is the second most polluted city in the state