जगात खरगोन, अकोला सर्वाधिक हॉट 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 एप्रिल 2019

सर्वाधिक 45.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद पश्‍चिम मध्य प्रदेशातील खरगोन येथे; तर सर्वाधिक दुसऱ्या क्रमांकाचे तापमान पश्‍चिम विदर्भातील अकोला येथे 45.1 अंश सेल्सिअस नोंदविले गेले. 

अकोला -  जगात सर्वाधिक हॉट शहरांमध्ये मध्य प्रदेशातील खरगोन; तर महाराष्ट्रातील अकोला शहराची नोंद झाली. उष्णतेच्या लाटेत होरपळत असलेल्या महाराष्ट्र, मध्य प्रदेशातील बुधवारचे तापमान संपूर्ण जगात सर्वाधिक ठरले. सर्वाधिक 45.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद पश्‍चिम मध्य प्रदेशातील खरगोन येथे; तर सर्वाधिक दुसऱ्या क्रमांकाचे तापमान पश्‍चिम विदर्भातील अकोला येथे 45.1 अंश सेल्सिअस नोंदविले गेले. 

हवामान खात्याने विदर्भ, मध्य प्रदेशात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. मंगळवारपासून उष्णतेच्या लाटेचे परिणामही जाणवू लागले आहेत. बुधवारी तर तापमानाने कहरच केला. पारा 45 अंशांपुढे पोचला. तापमान वाढीचा सर्वाधिक फटका विदर्भ, मध्य प्रदेशाला बसला. विदर्भातील बहुतांश सर्व शहरांत बुधवारी या उन्हाळ्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. त्यात अकोला, ब्रह्मपुरी, चंद्रपूर या शहरांचा समावेश होता. जगभरातील सर्वाधिक उष्ण शहरांमध्येही अकोल्याची नोंद झाली. बुधवारी मध्य प्रदेशातील खरगोन शहरात जगातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. येथे पारा 45.6 अंश सेल्सिअसपर्यंत पोचला. त्याखोलाखाल अकोल्यात सर्वाधिक दुसऱ्या क्रमांकाचे तापमान नोंदविले गेले. 

जगातील सर्वाधिक दहा उष्ण शहरे 
जगभरातील तापमानाची नोंद घेणाऱ्या "वर्ल्ड वेदर टुडे डॉट इन्फो' या संकेत स्थळावरील माहितीनुसार जगातील सर्वाधिक 10 उष्ण शहरांमध्ये खरगोन (45.6), अकोला (45.1), ब्रह्मपुरी (44.7), धार (44.5), चुरू (44.4), बारमेर (44.2), चंद्रपूर (44.2), सवाई माधवपूर (44.2) व पाकिस्तानमधील नवाबशाह (44.1) या शहरांचा समावेश आहे. 

यापूर्वी सर्वाधिक तापमानाची नोंद अमेरिकेत 
"वर्ल्ड वेदर टुडे डॉट इनफो' या संकेत स्थळावरील माहितीनुसार, यापूर्वी जगातील सर्वाधिक तापमान 10 जुलै 1913 रोजी अमेरिकेतील डेथ व्हॅली, कॅलिफोर्निया येथे 56.7 अंश असेल्सिअस नोंदविले गेले होते. त्यानंतर 7 जुलै 1931 मध्ये ट्युनिशियातील केबिली शहरात 55 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. अलीकडच्या काळात म्हणजे 31 जुलै 2012 रोजी कुवेत शहरातील सुलाईबे येथे 53.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती.

Web Title: Akola in Vidarbha at 45.1 degrees Celsius