गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या वडिलांची दादागिरी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 जुलै 2017

पदाचा गैरवापर - प्रा. संजय देशमुख
गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील व त्यांचे वडील व्ही. एन. पाटील हे पदाचा गैरवापर करीत माझ्या संस्थेसोबतच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करीत आहेत. काल व्ही. एन. पाटील यांनी विद्यालयात कर्मचाऱ्याला मारहाण केली असून, प्राचार्यांनासुद्धा शिवीगाळ केली आहे. आमचा न्यायसंस्थेवर पूर्ण विश्वास असून, या संदर्भात लवकरच तक्रार करणार असल्याचे भाऊसाहेब देशमुख विद्यालयाचे अध्यक्ष प्रा. संजय देशमुख यांनी सांगितले.

अकोला - गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांचे वडील, माजी आमदार व्ही. एन. पाटील यांनी घुंगशी येथील भाऊसाहेब देशमुख विद्यालयातील कर्मचाऱ्याला शिवीगाळ करीत मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने डॉ. रणजित पाटील यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

रणजित पाटील यांचे मूळ गाव घुंगशी येथील विद्यालयाचे प्रकरणही गत काही वर्षांपासून गाजत आहे. या गावात व्ही. एन. पाटील आणि विज्युक्‍टा संघटनेचे पदाधिकारी असलेले प्रा. संजय देशमुख या दोघांचेही वेगवेगळे महाविद्यालय आहे. मात्र, शाळेतील पटसंख्या कमी होण्यावरून दोन्ही संस्थांमध्ये गत काही वर्षांपासून शीतयुद्ध सुरू आहे.

शनिवारी (ता. 1) गृहराज्यमंत्री डॉ. पाटील यांचे वडील, माजी आमदार व्ही. एन. पाटील यांनी संजय देशमुख यांच्या भाऊसाहेब देशमुख विद्यालयात तपासणी केली. विशेष म्हणजे या वेळी त्यांच्यासोबत माध्यमिक शिक्षण विभागातील आत्माराम राठोड हे अधिकारी उपस्थित होते. या वेळी व्ही. एन. पाटील यांनी महाविद्यालयाची तपासणी करत असताना शाळेचे प्राचार्य संजय आठवले हे मोबाईलमध्ये व्हिडिओ शूटिंग घेत होते. त्यावर व्हिडिओ शूटिंग कशाला घेता, असे म्हणत पाटील यांनी प्राचार्य व कर्मचाऱ्यांशी वाद घातला. हा वाद एवढा वाढला, की व्ही. एन. पाटील यांनी कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावली. त्यावर तुम्ही अनधिकृतपणे विद्यालयाची तपासणी करत असून, कर्मचाऱ्याला मारहाण करत असून, हा अधिकार कोणी दिला, असे प्राचार्यांनी म्हटल्याचे व्हिडिओत दिसत आहे. या संदर्भात व्ही. एन. पाटील यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.

अनधिकृतपणे दाखले घेतले - रणधीर पाटील
या संदर्भात व्ही. एन. पाटील यांचे सुपुत्र रणधीर पाटील यांच्याशी संपर्क केला असता, भाऊसाहेब देशमुख विद्यालयाला शिक्षण विभागाची मान्यता नसून, तरीही ते विद्यार्थ्यांकडून प्रवेशासाठी दाखले घेत असल्याच्या पालकांच्या तक्रारी आल्या आहेत. संबंधित विद्यालयाकडून दरवर्षीच असा प्रकार करण्यात येत असून, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून माझे वडील शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांसह तेथे गेले होते. या वेळी कोणताही वाद झाला नसून मारहाण झालेली नाही, असे त्यांनी सांगितले.

पदाचा गैरवापर - प्रा. संजय देशमुख
गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील व त्यांचे वडील व्ही. एन. पाटील हे पदाचा गैरवापर करीत माझ्या संस्थेसोबतच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करीत आहेत. काल व्ही. एन. पाटील यांनी विद्यालयात कर्मचाऱ्याला मारहाण केली असून, प्राचार्यांनासुद्धा शिवीगाळ केली आहे. आमचा न्यायसंस्थेवर पूर्ण विश्वास असून, या संदर्भात लवकरच तक्रार करणार असल्याचे भाऊसाहेब देशमुख विद्यालयाचे अध्यक्ष प्रा. संजय देशमुख यांनी सांगितले.

Web Title: akola vidarbha home ministers Ranjit Patil father bullying