शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय

अकोला - आंदोलनाची यशस्वी सांगता झाल्यानंतर आंदोलक शेतकऱ्यांना संबोधित करताना माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा.
अकोला - आंदोलनाची यशस्वी सांगता झाल्यानंतर आंदोलक शेतकऱ्यांना संबोधित करताना माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा.

अकोला - माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात शेतकरी जागर मंचने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी  आंदोलन केले. मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी या आंदोलनाची दखल घेत आंदोलकांच्या मागण्या तत्त्वतः मान्य केल्या आहेत. हा शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय असल्याचे सांगून  सिन्हा यांनी आंदोलन तूर्त मागे घेतले असल्याचे जाहीर केले. 

अकोला येथे सोमवार (ता.४) पासून शेतकरी जागर मंचचे आंदोलन सुरू होते. जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चानंतर आंदोलकांनी तेथेच ठिय्या दिला. सायंकाळी यशवंत सिन्हा आणि रविकांत तुपकरांसह शेतकरी जागर मंचचे पदाधिकारी आणि आंदोलक शेतकऱ्यांना पोलिस मुख्यालयात स्थानबद्ध केले. तेथे रात्री साडेनऊ वाजता सर्व आंदोलकांना मुक्त करण्यात आले. मात्र, जोपर्यंत मागण्यांवर सकारात्मक निर्णय होत नाही तोपर्यंत सिन्हा, तुपकरांसह सर्वच आंदोलक पोलिस मुख्यालयातच ठिय्या देऊन होते. सगल तीन दिवस सुरू असलेल्या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळत होता. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, तृणमूल  काँग्रेस,भारिप-बमसं, प्रहार, आपसह विविध संघटना आणि राजकीय पक्षांचा वाढता पाठिंबा बघता बुधवारी मुख्यमंत्र्यांनी यशवंत सिन्हा यांच्यासोबत चर्चा केली. सकाळी ११.००वाजता झालेल्या चर्चेनुसार काही मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय झाला नाही. त्यामुळे दुपारी ४ वाजतापर्यंतची वेळ देण्यात आली. यावेळेतही पेच सुटला नाही. त्यामुळे पुन्हा मुख्यमंत्र्यांनी अर्धातास वेळ  मागून घेतला. अखेर ४.३० वाजताच्या सुमारास मुख्यमंत्र्यांनी सर्व मागण्या तत्त्वतः मान्य केल्या आणि दीर्घकालीन मागण्यांबाबत लवकरच तोडगा काढण्याचे आश्‍वासन सिन्हा यांना दिले. मुख्यमंत्र्यांच्या आश्‍वासनानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी मागण्यांसदर्भात लेखी पत्र दिले. त्यानंतर सिन्हा यांनी आंदोलन तूर्तास स्थगित करीत असल्याचे जाहीर केले. पण, दिलेल्या आश्‍वासनाची पूर्तता  न केल्यास जेथून आंदोलन थांबविले, तेथूनच पुन्हा आंदोलन सुरू करण्याचा इशाराही सिन्हा  यांनी सरकारला दिला. 

मुख्यमंत्र्यांची झोप उडाली!
यशवंत सिन्हा, रविकांत तुपकर यांच्यासह आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी पोलिस  मुख्यालयातच ठिय्या दिला. त्यांच्या आंदोलनाची दोन दिवस शासनाकडून कोणतीही दखल घेण्यात आली नाही. मुख्यमंत्रीही या विषयावर बोलण्यास तयार नव्हते. मात्र, आंदोलनाला वाढता पाठिंबा बघता मुख्यमंत्र्यांची झोप उडाली. बुधवारी पहाटे ३.०० वाजता त्यांच्या प्रतिनिधीने शेतकरी जागर मंचचे प्रशांत गावंडे यांच्यासोबत फोनवरून संपर्क साधत सिन्हा यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलण्यास इच्छुक असल्याचे सांगितले. मात्र, सिन्हा त्यावेळी  झोपलेले असल्याने त्यांचे बोलणे झाले नाही. त्यानंतर पुन्हा सकाळी मुख्यमंत्र्यांचा फोन आला  व त्यावेळी सविस्तर चर्चा झाली. 

या मागण्या केल्या मान्य
 -बोंड अळीमुळे झालेल्या नुकसानाची शेतकऱ्यांना भरपाई दिली जाईल. 
 -मूग, उडीद, सोयाबीनची ऑनलाइन नोंदणी झाली आहे, त्या शेतकऱ्यांच्या घरी जाऊन पंचनामे केल्यावर शासनाच्या नियमाप्रमाणे माल शासन खरेदी करेल. 
 -ज्या शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना माल विकला असेल, त्या शेतकऱ्यांकडे प्रमाणित व कायदेशीर पुरावा असेल त्यांना शासनाच्या नियमाप्रमाणे हमीभाव देण्यात येईल. 
 -अकोला व वाशीम जिल्ह्यातील मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे खातेदार असलेल्या ६२,७४९  शेतकऱ्यांचा ग्रीन लिस्टमध्ये समावेश आहे. त्यापैकी ५५,४१४ शेतकऱ्यांच्या खात्यावर २३० कोटी २६ लाख इतकी रक्कम जमा करण्यात आली आहे. उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. 
- कृषिपंपांची वीज जोडणी न तोडण्याचे महावितरणच्या अधीक्षक अभियंत्याना कळविण्यात  आले. 
 -सोने तारणमाफीच्या जाचक अटी दूर करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. शासनाकडून लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. 

पोलिस मुख्यालयात प्रथमच आंदोलन
राज्याच्या इतिहासात प्रथमच एखादे आंदोलन पोलिस मुख्यालयात झाले. तब्बल तीन दिवस चाललेल्या या आंदोलनाने पोलिस मुख्यालयाला दिल्लीतील ‘जंतर-मंतर’चे स्वरूप आले होते.

ममता बॅनर्जींचा संदेश 
तृणमूल काँग्रेसचे खासदार दिनेश त्रिवेदी यांनी अकोला येथे येऊन यशवंत सिन्हा यांची भेट घेतली. त्यांच्या फोनवरून तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बनर्जी यांनी शेतकऱ्यांना संदेश  दिला. शेतकऱ्यांच्या मागण्या न्याय्य आहेत. तो तुमचा हक्कच आहे. तो तुम्हाला मिळालाच पाहिजे. त्यासाठी तृणमूल काँग्रेस शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे त्या फोनवरून बोलताना म्हणाल्या. 

तुपकरांचे कौतुक
शेतकऱ्यांच्या आंदोलनात तिन्ही दिवस सक्रिय सहभाग घेणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी येथील नेतृत्वाची पोकळी भरून काढली आहे. त्यांच्या नेतृत्वाचे माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी भाषणातून कौतुक केले. तुपकर यांच्यात राष्ट्रीय नेतृत्व करण्याचे  गुण असल्याचे ते म्हणाले. 

मागण्या तत्त्वतः मान्य झाल्या असल्या तरी दीर्घकालीन मागण्या पूर्ण होईपर्यंत आमचा हा लढा सुरूच राहील. सरकारने या मागण्या मान्य करण्यात हलगर्जीपणा दाखविला, तर पुन्हा आंदोलन करण्यासाठी मी अकोला येथे येईल. 
- यशवंत सिन्हा, माजी अर्थमंत्री

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी सत्ता बाजूला ठेवून उभे राहणार असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांवर अन्याय होईल, संकट येईल, तेव्हा शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहील.   
- प्रतापराव जाधव, खासदार, बुलडाणा

देश स्वतंत्र झाला तरी शेतकरी स्वतंत्र झाला नाही. शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्याची खरी सुरुवात आजपासून अकोला येथून झाली आहे. 
- दिनेश त्रिवेदी, खासदार तृणमूल काँग्रेस

शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठीचा हा लढा आहे. या लढ्याला अकोल्यातून एक दिशा मिळाली आहे.
- शंकरअण्णा धोंडगे, शेतकरी नेते

राज्यात प्रत्येक गोष्टीत भ्रष्टाचार सुरू आहे. देशाचा माजी अर्थमंत्री, भाजपचा एक ज्येष्ठ नेता अकोल्यात आंदोलन करीत असताना भाजपचा एकही मंत्री फिरकला नाही, त्यांना त्याची लाज-शरमही वाटली नाही. 
- प्रीती मेमन, प्रदेश प्रमुख, आप

देशातील आंदोलनाचे केंद्र बिंदू अकोला ठरले आहे. आंदोलनांवरचा शेतकऱ्यांचा उडालेला विश्वास या आंदोलनाने वाढला आहे. ही लढाई आता संपली नाही, सुरू झाली आहे. 
- रविकांत तुपकर, स्वाभिमानी शेतकरी संघटना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com