दलालाच्या गुलामगिरीतून 17 शेतकऱ्यांची सुटका

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 डिसेंबर 2017

अकोला/मूर्तिजापूर - सततची नापिकी अन्‌ बेरोजारीमुळे दलालाच्या तावडीत सापडलेले 17 शेतकरी व शेत मजुरांची आठ दिवसांच्या गुलामगिरीतून सुटका करण्यात आली. बंदिस्तांपैकी एका शेतकऱ्याने नातेवाइकाशी मोबाईलवर संपर्क साधल्यावर हा प्रकार समोर आला होता. त्यानंतर माना पोलिसांनी मंगळवारी त्यांची तेलंगण राज्यातून सुटका केली.

निसर्गाच्या चक्रव्यहात अडकलेला शेतकरी कुटुंबाचा गाडा चालविण्यासाठी मिळेल ते काम करण्यास तयार आहेत. असेच काहीसे मुर्तिजापूर तालुक्‍यातील करुम व पापड या गावातील शेतकऱ्यांचेही होत आहे. जादा रोजंदारी मिळणार म्हणून यवतमाळच्या मधुकर चव्हाण नावाच्या व्यक्तीने दोन्ही गावातील 17 शेतकऱ्यांना 18 डिसेंबर रोजी तेलंगणात नेले. यात एका महिलेचाही समावेश होता. मधुकर चव्हाणने या शेतकऱ्यांना तेलंगणातील मामाढगी (जि. संघरेड्डी) गावातील येला रेड्डी नामक व्यक्तीच्या शेतात मजुरीला लावले. उसाच्या शेतात दिवसभर राबल्यावर त्यांना मजुरी देण्याएवजी एका खोलीत डांबून मारहाण करण्यात आली. दिवसभराचे काम अन्‌ एकवेळचे जेवण, शिवाय मारहाण हा प्रकार रोजचाच झाला.

भाषा कळत नसल्याने या शेतकऱ्यांना नेमका पत्ता नव्हता. पण, त्यातील एका शेतकऱ्याने संधी मिळताच मोबाईलवर नातेवाइकाशी संपर्क साधला अन्‌ संकटाची माहिती दिली. हा प्रकार ऐकल्यावर नातेवाइकांनी थेट माना पोलिस स्थानक गाठले. पोलिसांनी सायबर विभागाच्या मदतीने बंदिस्त शेतकऱ्यांचा ठाव ठिकाणा लावला. अकोला पोलिस पथक अदनुर पोलिसांच्या सहाय्याने मामाढगी गावात आज पोचले. त्यांनी या शेतकऱ्यांना दलालाच्या गुलामगिरीतून मुक्त केले.

गावात आनंदोत्सव
गुलामगिरीतून सुटका झालेल्या शेतकऱ्यांची आज घरवापसी झाली. त्यामुळे करुम व पापड गावातील लोकांनी सुटकेचा निश्वास सोडत आनंदोत्सव साजरा केला.

Web Title: akola vidarbha news farmer release in agent