हजारो मेट्रिक टन चाऱ्याचा होतो कोळसा

अनुप ताले
शुक्रवार, 23 मार्च 2018

अकोला - अत्यल्प पाऊस, विदर्भ, मराठवाड्यातील कोरडे पडलेले जलसाठे आणि उन्हाचे चटके अशा परिस्थितीत जनावरांसाठी चारा उपलब्ध नसताना शेतातून निघणाऱ्या कचऱ्याच्या नावाखाली थेट चाऱ्यापासूनच कोळसा (व्हाइट चारकोल/गट्टू) निर्मिती केली जात आहे. त्यासाठी दररोज हजारो मेट्रिक टन चारा नष्ट केला जात आहे. दुष्काळी परिस्थितीत नष्ट होत असलेल्या या चाऱ्यामुळे पशुपालकांपुढचा चाऱ्याचा प्रश्‍न गंभीर होत आहे. अकोल्यात चाऱ्यापासून कोळसा तयार करणारे डझनभर कारखाने सुरू असून, राज्यात तीनशेच्या वर असे कारखाने असल्याची माहिती आहे.

राज्यात दगडी कोळशाचा पर्याय म्हणून, व्हाइट चारकोलचा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यासाठी लागणारे शेतातून सहज उपलब्ध होणारा जनावरांचा चारा वापरला जातो. जनावरांना चारा म्हणून, सोयाबीन, कडबा कुटार सर्वाधिक उपयोगात येतो; परंतु या चाऱ्याचा सर्वाधिक उपयोग कोळसा निर्मिती करण्यासाठी होत असल्याने जिल्ह्यासह राज्यभरात चाराटंचाईचे संकट उभे ठाकले आहे. याबाबत पशुसंवर्धन विभागाकडून आढावा घेतला असता, अकोल्यात जवळपास 10 ते 12 कारखाने सुरू असून, रोज 150 मेट्रिक टन चाऱ्यापासून कोळसा निर्मिती येथे होत असल्याची माहिती पुढे आली. एवढेच नव्हे, दुपटीने नफा देणाऱ्या या उद्योगाचे तीनशेहून अधिक कारखाने राज्यात सुरू असल्याने चार ते साडेचार हजार मेट्रिक टन चाऱ्याचा कोळसा (व्हाइट चारकोल/गट्टू) राज्यात होत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. शिवाय, व्हाइट चारकोल निर्मिती करणाऱ्या कारखान्यांना परवानगी देऊन शासनच पशुपालकांसमोर चाराटंचाईचे संकट निर्माण करण्यास कारणीभूत ठरत असल्याची विसंगती दिसून येत आहे.

सव्वा कोटी जनावरांचा पोटमारा
21 हजार मेट्रिक टन : दररोज होणारे व्हाइट चारकोलचे उत्पादन
2.10 कोटी किलो : चारा दररोज नष्ट
1.25 कोटी : जनावरांचा चारा चारकोलसाठी

Web Title: akola vidarbha news fodder coal