निष्कृष्ट ज्वारीचे वितरण; पालकमंत्र्यांनी केली पाहणी

सुगत खाडे
शुक्रवार, 23 जून 2017

मलकापूर परिसरातील रास्त धान्य दुकानातील प्रकार

मलकापूर परिसरातील रास्त धान्य दुकानातील प्रकार
अकाेला - शहरातील एका रास्त भाव धान्य दुकानातून निष्कृष्ट ज्वारीचे वितरण हाेत असल्याची तक्रार गुरूवारी (ता. २२) दुपारी नागरिकांनी थेट जिल्ह्याचे पालकमंत्री डाॅ. रणजित पाटील यांच्याकडे केल्यानंतर पालकमंत्र्यांनी स्वतः रेशन दुकानात जावून निष्कृष्ट ज्वारीचे वितरण थांबविले. त्यानंतर जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, तहसीदार राजेश्वर हांडे यांना बाेलावून नागरिकांना चांगल्या प्रतिच्या ज्वारीचे वितरण करण्याचे आदेश दिले. पालकमंत्र्यांनी दुकानात स्वतः दुकानात जावून ज्वारीचे वितरण थांबवल्यामुळे पुरवठा विभागाची ‘निष्कृष्ट’ कार्यपद्धती चव्हाट्यावर आली आहे.

शहरातील रेशन दुकानांमधून गरीब नागरिकांना शासकीय दरात ज्वारी वितरण करण्यात येत आहे. गुरुवारी (ता. २२) दुपारी सुद्धा शहरातील महिला शिवणकला साेसायटीच्या मलकापूर परिसरातील दुकान क्रमांक १२१ मधून निष्कृष्ट ज्वारीचे वितरण करण्यात येत हाेते. ही ज्वारी खाण्या याेग्य नसल्यामुळे ज्वारी घेण्यासाठी रेशन दुकानात गेलेल्या नागरिकांनी निष्कृष्ट ज्वारीच्या वितरणासंबंधी जिल्ह्याचे पालकमंत्री व गृहराज्यमंत्री डाॅ. रणजीत पाटील यांना फाेन द्वारे माहिती दिली. त्यामुळे पालकमंत्री डाॅ. पाटील ज्वारी वितरण करण्यात येणाऱ्या रेशन दुकानात पाेहचले. यावेळी त्यांनी ज्वारीची पाहणी केली असता ज्वारी खूपच निष्कृष्ट दर्जाची असल्यामुळे ती खाण्यायाेग्य नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. यावेळी ज्वारी घेण्यासाठी दुकानात गेलेल्या महिलांनी पालकमंत्री डाॅ. रणजित पाटील यांना रेशनच्या दुकानातून वाटप करण्यात येणाऱ्या निष्कृष्ट ज्वारीच्या बाबतीत माहिती दिली. महिलांच्या तक्रारी व ज्वारीची गुणवत्ता खराब असल्याचे लक्षात येताच पालकमंत्री डाॅ. पाटील यांनी याबाबत जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्याशी फाेन द्वारे संपर्क साधला. त्यामुळे जिल्हाधिकारी सुद्धा मलकापूर परिसरातील संबंधित रेशन दुकानात पाेहचले. त्यांच्या पाठाेपाठ तहसीलदार राजेश्वर हांडे, नायब तहसीलदार महेंद्र अत्राम सुद्धा रेशन दुकानात पाेहचले व ज्वारी पाहणी केली. यावेळी दुकानातून वाटप करण्यात येणारी ज्वारी ही निष्कृष्ट दर्जाची असल्यामुळे तिचे वितरण बंद करण्याचे आदेश देत नागरिकांना तत्काळ चांगल्या दर्जाच्या ज्वारीचे वितरण सुरू करण्याचे आदेश पालकमंत्री डाॅ. पाटील यांनी संबंधितांना दिले. रेशन दुकानातून निष्कृष्ट ज्वारीचे वितरण करण्यात येत असल्याची बाब याघटनेनंतर पुन्हा एकदा समाेर आली आहे.

निष्कृष्ट ज्वारीचा पंचनामा
पालकमंत्री डाॅ. रणजित पाटील यांच्या आदेशाने संबंधित दुकानातून ज्वारीचे वाटप थांबवण्यात आले. त्यानंतर पुरवठा विभागातून ज्वारीचे पाेते बदलुन घेण्यासाठी ज्वारीचा पंचनामा सुद्धा करण्यात आला. यावेळी दुकानातील जवळपास १० कट्टे ज्वारी ही निष्कृष्ट दर्जाची असल्याचे लक्षात आले. त्यामुळे ही ज्वारी पुरवठा विभागामार्फत बदलुन देण्यात येईल.

तीन दिवसात सादर करावा लागेल अहवाल
आठवड्यातून माेजक्याच दिवशी दुकान उघडणे, दुकान वेळेवर न उघडणे, धान्याचे वितरण करतांना नागरिकांना ज्वारी खरेदी करण्याची सक्ती करणे, अशा स्वरूपाच्या तक्रारी मलकापूर परिसरातील महिला शिवणकला साेसायटीच्या दुकानदारासंदर्भात पालकमंत्र्यांकडे करण्यात आल्या आहेत. त्यामुळे संबंधित तक्रारींची सत्यता पडताळून तहसीलदारांनी यासंबंधिचा अहवाल तीन दिवसात सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी दिले आहेत. अहवालानंतर संबंधित दुकानदाराविरूद्ध कारवाई करण्यात येईल.

इतर दुकानांची सुद्धा हाेणार तपासणी
जिल्ह्यातील इतर रास्त भाव धान्य दुकानांमधून निष्कृष्ट दर्जाच्या ज्वारीचे वितरण हाेत असल्याची शक्यता आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील इतर रेशन दुकानांची सुद्धा तपासणी करून नागरिकांच्या तक्रारी साेडवण्यात येतील. अशी माहिती जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी ‘सकाळ’शी बाेलतांना दिली.

मलकापूर परिसरातील महिला शिवणकला साेसायटीच्या रेशन दुकानाची पाहणी केली असता त्यामधून निष्कृष्ट दर्जाच्या ज्वारीचे वितरण हाेत असल्याची बाब समाेर आली. त्यामुळे दुकानदाराला ज्वारी बदलुन देण्याचे आदेश तहसीलदर हांडे यांना दिले आहेत. याव्यतिरीक्त दुकानदारा विराेधात विविध प्रकारच्या तक्रारी असल्याने यासंबंधीचा अहवाल तीन दिवसात मागितला आहे.
- आस्तिककुमार पाण्डेय,  जिल्हाधिकारी, अकाेला.

Web Title: akola vidarbha news jwari cheaking by guardian minister